शनी अंशत:च पावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2016 02:58 AM2016-01-16T02:58:18+5:302016-01-16T02:58:18+5:30

महिलेने चौथऱ्यावर चढून शनीदर्शन घेतल्यापासून देवस्थानच्या अध्यक्षपदाचा सन्मान महिलेला मिळणे, येथपर्यंतच्या घटनांचे वर्तुळ एक पाऊल पुढे टाकणारे म्हणून पाहिले पाहिजे.

Saturn partially faked! | शनी अंशत:च पावला !

शनी अंशत:च पावला !

Next

- अनंत पाटील

महिलेने चौथऱ्यावर चढून शनीदर्शन घेतल्यापासून देवस्थानच्या अध्यक्षपदाचा सन्मान महिलेला मिळणे, येथपर्यंतच्या घटनांचे वर्तुळ एक पाऊल पुढे टाकणारे म्हणून पाहिले पाहिजे.

शनी दर्शनासाठी चौथऱ्यावर तरुणी चढल्यामुळे चर्चेत आलेल्या शनिशिंगणापुरमध्ये नवा इतिहास घडला. ४०० वर्षानंतर प्रथमच विश्वस्तपदी २ महिलांची निवड आणि एकीची थेट अध्यक्षपदी वर्णी, या घटना एकापाठोपाठ घडल्या. नवनियुक्त अध्यक्षा अनिता शेटे यापुढेही परंपरा जोपासल्या जातील, असेच सांगत आहेत. तरीही चौथऱ्यावर महिला चढल्यापासून थेट अध्यक्षपदाचा सन्मान महिलेला मिळणे, येथपर्यंतच्या घटनांचे वर्तुळ समानतेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकणारे म्हणूनच पाहिले पाहिजे.
मुळात शिंगणापूर परंपरेवर टिकलेले आणि वाढलेले देवस्थान आहे, याची नोंद आधी घेतली पाहिजे. या गावाशी निगडीत अनेक कथा आहेत. काहींना त्यात ओतप्रोत श्रद्धा आढळते, तर काहींना अंधश्रद्धेचा कडेलोट! तरीही व्यवस्था थांबल्याचे कधी घडले नाही. कालपरत्वे काही बदल मात्र निश्चित झाले आहेत. घरांना दार नसलेले गाव, ही गावाची ओळख राज्यभर अभिमानाने सांगितली जाते. तशीच महिलांना दुय्यम स्थानाची परंपरा अयोग्य असूनही येथे जोपासली जाते. परंपरा मोडणे, हा आपल्या अस्तित्वाला धोका असल्याचा मनातील खोलवर पोहोचलेला समज मोडून काढणे, आता कठीण होऊन बसले आहे. त्यात विश्वस्त आणि अध्यक्षपदाचा मान महिलांना मिळत असेल तर या घटनेचे स्वागतच केले पाहिजे. खरेतर बदलांसाठी दार सताड उघडे झाले नसले, तरी किलकिले झाले, याची दखल घेतलीच पाहिजे. पुन्हा या परंपरांना गावकीचे आणि भावकीच्या राजकारणाचा पोत आहे, हे देखील विसरता येत नाही.
विश्वस्त निवडीच्या तोंडावरच शनिशिंगणापुरात अनेक गोंधळ सुरू झाले होते, ही दुर्लक्षण्याजोगी बाब नक्कीच नाही. त्याला राज्यातील सत्ताबदलाचीही किनार होती. यासाठी या तालुक्याच्या राजकारणाचा संदर्भ तपासून पहावा लागतो. ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांचा तालुक्यावर आणि पर्यायाने देवस्थानवरही प्रभाव राहीला आहे. गडाख शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र शंकरराव गडाख अनपेक्षितपणे पराभूत झाले. काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले बाळासाहेब मुरकुटे मोदी लाटेत आमदार झाले. आमदार बदलताच तालुक्याची अख्खी व्यवस्थाच बदलण्याचा संकल्प झाला. सहकारी संस्था, ग्रामपंचायतींपर्यंत हे लोण पोहोचले. पण गडाखांचे सहकारातील वर्चस्व मोडीत काढणे सोपे नव्हतेच. घडलेही तसेच! त्यात शिंगणापूर देवस्थान विश्वस्त निवड आली. याच काळात शिंगणापूर विविध घटनांनी चर्चेत आले होते. सरकार बदलले म्हणून देवस्थानातील सत्ताही बदलणार, याचा भाजपा आमदार मुरकुटेंना ठाम विश्वास होता.
मुरकुटे समर्थक देवस्थानचे कारभारी म्हणूनच वावरू लागले होते. पण घडले विपरीत! राज्यात सत्ता भाजपाची असूनही विश्वस्तपदी बहुतांश गडाख समर्थकांची वर्णी लागली. या निवडींमध्ये ‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाचा थेट हस्तक्षेप नसला तरी प्रभाव असतो. ‘सीएमओ’ने राजकारण बाजूला सारुन गडाखांवर विश्वास दाखवला, असा अर्थ काढला गेला. ही विश्वस्त निवडच बेकायदेशीर आहे, अशी सांगण्याची वेळ सध्या सत्ताधारी भाजपा आमदारावर आली आहे. दर्शनासाठी महिला-पुरुष भेदाभेदावरुन यापूर्वी अनेकदा आंदोलने झाली आहेत. त्यावेळी महिलांना चौथऱ्यावर प्रवेश नसेल, तर पुरुषांनाही चौथऱ्याखालूनच दर्शनाचा नियम करुन चाणाक्षपणे ‘समानता’ राबविली गेली होती. आता महिलेकडे अध्यक्षपद सोपवून पुढील पाऊल गाठले गेले आहे. ४०० वर्षांची परंपरा मोडीत काढताना काही वर्षे लागतील, याचा अंदाज अनेकांना आहे. ते एका दिवसात शक्य नाही. महिला अध्यक्ष झाल्यामुळे एका दिवसात महिलांना चौथऱ्यावर चढून दर्शन मिळेल, ही अपेक्षाच फोल आहे. अनिता शेटेंच्या मनसुब्यातून ती स्पष्ट झाली, असो! काहीच न बदलल्यापेक्षा काहीतरी बदलले, हे महत्वाचे! आज शनी महिलांना अंशत: पावला, पुढील पाऊल लवकर पडो !

 

Web Title: Saturn partially faked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.