सातारनामा ! ; रसद तोडली..कुमक खचली.. .. आता गडाभोवती वेढा !
By सचिन जवळकोटे | Published: October 8, 2017 09:29 AM2017-10-08T09:29:40+5:302017-10-08T09:29:54+5:30
कैक सैनिक जीवानिशी फरार जाहले. आता तर मुख्य गडाभोवतीच ‘वेढा’ पडला. अवघ्या तीन दिवसांत आक्रीत घडले. राजे... घात झाला!
गेल्या महिन्यात ‘राजे गडावर पोहोचले,’ तेव्हा सातारा राजधानीत जणू विजयोत्सव साजरा झाला; परंतु विजयादशमीनंतर पुन्हा अज्ञातवासाचे वेध लागले. साम्राज्य गिळंकृत करण्याच्या मोहिमा पर मुलखात आखल्या जाऊ लागल्या. अगोदर ‘आनेवाडी’च्या खजिन्यावर हल्ला जाहला. रोजची ‘रसद’ तोडली गेली. त्यानंतर रात्रीच्या घनघोर युद्धात ‘कुमक’ खचली. कैक सैनिक जीवानिशी फरार जाहले. आता तर मुख्य गडाभोवतीच ‘वेढा’ पडला. अवघ्या तीन दिवसांत आक्रीत घडले. राजे... घात झाला!
थोरल्या बारामतीकरांचं ‘लिफ्ट करा देऽऽ’
‘थोरल्या बारामतीकरांच्या गाडीत जागा मिळाली, याचा अर्थ स्वर्ग अवघा दोन बोटं शिल्लक राहिला,’ असं समजणाºया थोरल्या राजेंच्या समर्थकांना दुसºयाच दिवशी ‘आनेवाडी’च्या जमिनीवर उतरावं लागलं. कोणत्याही परिस्थितीत हा खजिना दुसºयाच्या ताब्यात द्यावाच लागणार, याची जाणीव त्यांना झाली. अशातच इथल्या आधुनिक महाभारताचे कºहाडी सूत्रधार ‘संजय’ हे धाकट्या राजेंसोबतच असल्याचा सांगावा मिळाला. याचा कांगावाही झाला. ‘संजय’ कोणत्या आमदाराचे नातेवाईक आहेत, कोणत्या नेत्यासोबत नाक्यावरचे वाटे ठरलेत.. हे गुपितही म्हणे कºहाडातील ‘राज-विजय’ हेरांनी थोरल्या राजेंच्या कानात सांगितलं. कºहाडातून परतताना थोरल्या बारामतीकरांनी गाडीत फलटणकरांसोबत काय चर्चा केली असावी, याचेही आडाखे बांधले गेले.
तुटक-तुटक घटना एकत्र जोडल्या गेल्यानंतर एकच चित्र स्पष्ट झालं.... ते म्हणजे, ‘आनेवाडीची रसद’ तोडण्याची व्यूहरचना खूप वरच्या पातळीवरून आखली गेलीय. रणांगणात धाकटे राजे फक्त इथं दिसण्यासाठी राहिले.. रसद तोडण्यामागच्या मोहिमेचे खरे कर्ते करविते ‘नीरा-क-हा’ खो-यातलेच ठरले. पूर्वीच्या काळी एखादा किल्ला जिंकताना हेच सूत्र अवलंबलं जायचं. किल्ल्यापर्यंत पोहोचणारी अन्न-धान्याची रसद खालीच तोडून टाका. काही दिवसांत किल्ला आपोआप ताब्यात येतो. आता बोला... साताºयातील किल्ला पडणार की लढा सुरूच राहणार?
‘मनी अन् मसल’ या दोन गोष्टी राजकारणात नेहमीच पॉवरफुल्ल. त्यापैकी थोरल्या राजेंच्या ताब्यातील ‘टोलनाका’ हिसकावून घेऊन ‘मनी’ला धक्का देण्याचा प्रयत्न झाला. हे कमी पडलं की काय म्हणून त्यांची दुसरी ‘मसल’ पॉवरही शुक्रवारी मध्यरात्री बंगल्यातल्या राड्यात जणू हतबल झाली.
‘साता-यावर माझी दहशत... परंतु प्रेमाची!’ हे थोरल्या राजेंचं आवडतं वाक्य. राजधानीतील त्यांचा दरारा हाच म्हणे त्यांचा आजपर्यंतच्या राजकारणातला प्लस पॉर्इंट... ‘लोकसभेला पावणेपाच लाखांचं लीड’ हे म्हणे त्याचंच गमक; परंतु ‘त्या’ मध्यरात्री ‘सुरुचि’चा उंबरठा ओलांडून थोरले आत गेले, तेव्हा माजला अक्षरश: हल्लकल्लोळ. घडत गेल्या ध्यानी मनी नसलेल्या घटना. दहशतीचं वारं फिरत चालल्याचं कळून चुकलं अनेकांना.
साता-यात म्हणे राजघराण्याची मोगलाई
समोरच्या बंगल्यात शिरल्यानंतर नेहमीच्या स्टाईलनं चुटकी वाजवत ‘कुठायंत धाकटे राजे? बाहेर बोलवा त्यांना... काढा रे बंदूक !’ असा इशारा थोरले राजेंनी दिला. मात्र, समोर उभारलेल्या राजू भैय्यांनी आक्रमकपणे पुढं सरसावत ‘तुमची मोगलाई लागून गेलीय का?’ असा संतप्त सवाल केला. अरेऽऽरे.. इतिहासाचं किती हे दुर्दैव? ज्या शिव छत्रपतींनी आयुष्यभर ‘मोगलाई’ विरोधात झुंज दिली, त्यांच्याच वंशजांना एक कार्यकर्ता थेट ‘मोगलाई’ची उपमा देतोय... हा दोष पायरी ओलांडणाºया त्या कार्यकर्त्याचा की आततायी धाडस दाखविणाºया राजेंचा ? असो. या शब्दानंतरच राडा सुरू झाला. दोन्ही राजेंचे कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले. थोरल्या राजेंच्या गटाचा हल्ला परतावून लावताना धाकट्या राजेंभोवतीच्या जमावाचा उद्रेक अत्यंत त्वेषाचा होता. त्यांची आक्रमकता धक्कादायक होती. थोरल्या राजेंसाठी जणू हे अनपेक्षितच होतं. आजपावेतो, ‘आपण आवाज चढवायचा... बाकीच्यांनी थरथर कापत मुजरा करायचा,’ ही थोरल्यांची परंपरा होती. परंतु आपल्या गटाच्या अंगावर धावून येणारी नवी पिढी राजेंसाठी विस्मयजनक होती. डोळे विस्फारणारी होती.
पेव्हर ब्लॉकपासून ‘डॉग’ फूड प्लेटपर्यंत अनेक वस्तूंचा मारा..
धाकट्या राजेंच्या गटाचा जोश पाहून उपस्थित असलेल्या एकमेव पोलिस अधिकाºयानं थोरल्यांना बळं-बळं गाडीत बसविलं म्हणून कदाचित अनर्थ टळला. थोरल्यांची गाडी निघून जाताना बंगल्यातून फेकल्या गेलेल्या वस्तूही विचित्र होत्या. पेव्हर ब्लॉकच्या तुकड्यापासून ‘डॉग’च्या फूड प्लेटपर्यंत जे हाती येईल ते गाडीच्या दिशेने फेकलं गेलं.. हे कमी पडलं की काय म्हणून हवेत गोळीबारही झाला. यातून एक मात्र निष्पन्न झालं. ‘मनी’ बरोबरच ‘मसल’चीही वाट लावण्याचं तंत्र धाकट्या वाड्यात आत्मसात केलं गेलंय. गेल्या चार दिवसांत ‘डीसीसी’मध्ये फलटणच्या राजेंसोबत धाकट्या राजेंच्या कैक तास ज्या गुप्त बैठका झाल्या, त्याचा तर हा परिपाक नसावा ?
जाऊ द्या ना बाळासाहेब...
सध्या धाकट्या राजेंच्या छावणीत बाळासाहेबांचा वट्ट म्हणे भलताच वाढलाय. बाळासाहेब म्हणजे आपल्या खंदारेंचा बाळू मेंबर हो ऽऽ. दिवाणखान्यात बसून कागदी चमत्कार करणा-या ‘अवी-जया’पेक्षा भर चौकात चार-चौघांना अंगावर घेणारा बाळू धाकट्या राजेंना अधिक भावला असावा. पालिकेत ‘का रेऽऽ ला जा रेऽऽ’ म्हणत सत्ताधाºयांना सळो की पळो करून सोडणारा बाळू या राजेंना विश्वासू वाटत असावा. नाही तरी ‘टग्याला पुरून उरणारा महाटग्या’ कोणत्याही नेत्याला नेहमी हवाच असतो.
.. तर सांगायचा मुद्दा म्हणजे, थोरल्या राजेंकडून ‘टोल नाका’ काढून घेण्याच्या किचकट प्रक्रियेत ‘संजय’ राहिलेच बाजूला... हे बाळासाहेबच म्हणे जास्त उत्साहित बनलेले. नाक्यावरील नव्या टग्यांची म्होरकेगिरी करण्यासाठी म्हणे त्यांचे हात शिवशिवू लागलेले. नाक्यावरच्या गल्ल्यात खुळखुळणारा आवाज म्हणे कानाला मोहवू लागलेला. मात्र, या नाक्याचा विचित्र इतिहास बाळोबांना माहीत नसावा. अनोखी परंपरा ठावूक नसावी. सुरुवातीला हा नाका चालवायला घेतलेल्या ‘संदीपदादां’ना बरेच महिने एका केसमध्ये ‘आत’ बसावं लागलं होतं. त्यातून ते निर्दोषही सुटले. त्यानंतर हा नाका चालविणारे ‘विकास अण्णा’ही आजपावेतो ‘आत’ मध्येच. सध्या ज्यांच्या ताब्यात नाका आहे, ते ‘अशोकराव’सुद्धा नुकतंच ‘आतल्या भिंती’ बघून आलेले... त्यामुळं या नाक्याच्या गल्ल्यात हात घालणं म्हणजे कोटेश्वर मैदानाजवळ ‘जयादादा’ला दम देण्याएवढं नक्कीच सोपं नसावं. जाऊ द्या ना बाळासाहेब...