सत्तातुराणां न भयं, न लज्जा; लोकशाहीची उघड उघड थट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:00 AM2019-04-12T06:00:34+5:302019-04-12T06:01:23+5:30
ना जनाची, ना मनाची. कोणीही, कोणत्याही पक्षात जातो. सगळेच पक्ष अशा सत्तातुरांचे कसलाही विधिनिषेध न बाळगता पायघड्या घालून स्वागत करतात. लोकशाहीची थट्टा यापेक्षा वेगळी काय असू शकते? मतदारांना गृहीत धरणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणे हाच यावर उपाय.
सत्ता भल्याभल्यांना बिघडवते... असे म्हणतात ते उगाच नाही. या विधानाचा कळसाध्याय गाठला जळगाव येथे झालेल्या हाणामारीने. भाजपने तिकीट नाकारलेल्या स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांनी आपल्याच पक्षाच्या व्यासपीठावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या देखत भाजपचे माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बदडले. भांडणे सोडवायला गेलेल्या मंत्री महाजन यांनीही स्टेजवर चढू पाहणाऱ्यांना खाली ढकलून दिले. काही पोलीसही या धक्काबुक्कीचे शिकार झाले.
बिहार, उत्तर प्रदेशात शोभून दिसावे असे हे चित्र शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणाऱया सुसंस्कृत महाराष्ट्राने पाहिले. ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ असे बिरुद मिरवणाऱ्या भाजपच्याच व्यासपीठावर ‘पार्टी विथ डिफरन्सेस’ चव्हाट्यावर आले. सत्तेसाठी वाट्टेल ते करायला निघालेल्या भाजप आणि अन्य पक्षांसाठी असे हेवेदावे नवे नाहीत. याआधी सत्तेवर असणाऱया काँग्रेस-राष्ट्रवादीत हे प्रकार घडायचे, आता ते भाजपमध्ये घडत आहेत. शिवसेनेतही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समोर पर्यावरणमंत्री रामदास कदम खा. अनिल देसाई यांच्या अंगावर धावून गेल्याची घटना जुनी नाही. कमरेचे काढून डोक्याला गुंडाळले की राजकीय नेते किती स्वैरपणे वागू शकतात हे जळगावच्या घटनेने स्पष्ट झाले. जगात सगळ्यात जुनी लोकशाही असणाऱया अमेरिकेत आजपर्यंत एकाही नेत्याने पक्षांतर केल्याची एकही घटना नाही. आपल्याकडे मात्र पक्षच्या पक्ष, त्यातील नेते मतदारांची पर्वा न करता पक्षपर्यटन करत राहतात.
काँग्रेस, राष्ट्रवादीचा भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी म्हणून सतत उल्लेख करत भाजपने सत्ता मिळवली आणि आता त्याच पक्षातले भ्रष्टाचाराचे आरोप असणारे अनेक नेते भाजपमध्ये घेऊन पावन केले. काँग्रेसमुक्त भाजप करता करता काँग्रेसयुक्त भाजप कधी झाली हे त्यांनाही कळले नाही. सगळे संकेत खुंटीला टांगून भाजप कशी वागत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे पालघर. या लोकसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाचे काम करणाऱया चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये घेऊन निवडून आणले. आताच्या वाटाघाटीत ती जागा शिवसेनेला सुटली तर याच गावितांना भाजपने शिवसेनेत पाठवले. मतदारांनी गावितांना काँग्रेसचे म्हणून मतदान केले की भाजपचे म्हणून? आणि आता शिवसेनेचे म्हणून मतदान करायचे का? एखाद्या पक्षावर विश्वास ठेवून जनता उमेदवार निवडून देते आणि तोच उमेदवार त्याच मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून दुसऱया पक्षात जातो. आरोप-प्रत्यारोपांनी एकमेकांच्या पक्षाचे कपडे फाडणारे नेतेदेखील कसलाही विधिनिषेध न बाळगता अशा आयाराम-गयारामांना आपल्या पक्षात घेऊन पावन करतात. हे सगळे चीड आणणारे आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुत्रप्रेमात आकंठ बुडाले आणि स्वत:चे काँग्रेसने दिलेले पद विसरून भाजपच्या व्यासपीठावर जाऊन मुलाचा प्रचार करू लागले. तो करण्यास त्यांना पक्षातल्या कोणीही विरोध केला नाही आणि विरोधी पक्षाची पांघरलेली झूल बाजूला सारून जाण्याचे सौजन्य त्यांनीही दाखवले नाही.
ज्या पक्षाने उपमुख्यमंत्रीपद दिले त्याच राष्ट्रवादीला बाजूला सारून विजयसिंह मोहिते पाटील भाजपचा प्रचार करतात, आमची २५ वर्षे युतीत सडली म्हणणारी शिवसेना भाजपच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करू लागते. ज्या किरीट सोमय्या यांनी स्वत:च्या पक्षासाठी शिवसेनेला अंगावर घेतले त्यांना पक्षनिष्ठेचे फळ म्हणून घरी बसण्याची वेळ येते. पक्षाच्या निष्ठावंतांनी आजन्म सतरंज्याच अंथरायच्या व त्यावर आयाराम-गयारामांनी बसायचे हे त्या त्या पक्षातल्या निष्ठावंतांसाठी संतापजनक आहे. विविध पक्षांनी अशा सत्तातुरांना सहनशील मतदारांच्या नाकावर टिच्चून पायघड्या घालायच्या, यासारखे लाज आणणारे दुसरे काही असूच शकत नाही. कोट्यवधींचा चुराडा करून निवडणुकांचा फार्स तरी कशासाठी? त्यापेक्षा या सत्तातुरांनी विविध पदांच्या बोल्या लावून ती पदे विकत घ्यावीत, येणारा पैसाही आपापसात खुशाल वाटून घ्यावा. प्रगतीशील, सामाजिक भान असणाºया महाराष्ट्रात हे सगळे घडत आहे, याची खदखद जनतेने मतपेटीतून काढल्याशिवाय या सत्तातुराणांचे डोळे उघडणार नाहीत.