सौदी प्रिन्सना देशात मद्यविक्री का हवी आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:52 AM2024-01-31T10:52:42+5:302024-01-31T10:54:07+5:30
Saudi Arabia: अलीकडच्या काळात सौदी अरेबिया हा देश किती झपाट्यानं कात टाकतोय, हे आपण पाहिलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत प्रतिगामी मानला जाणारा हा देश आता आपली प्रतिमा बदलू पाहतोय. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं त्यांनी हा निर्णय घेतला.
अलीकडच्या काळात सौदी अरेबिया हा देश किती झपाट्यानं कात टाकतोय, हे आपण पाहिलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत प्रतिगामी मानला जाणारा हा देश आता आपली प्रतिमा बदलू पाहतोय. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीनं त्यांनी हा निर्णय घेतला. आपल्या देशात त्यांनी अनेक सोयी-सवलती देऊ केल्या. महिलांना मुक्त वातावरणात जगता यावं यासाठी त्यांच्याभोवती आवळलेले फास आणि काच कसे कमी करता येतील यासाठी आवर्जून प्रयत्न केले. महिलांच्या शिक्षणासाठी तर अधिक मोकळीक दिली गेलीच, पण नोकऱ्या आणि उद्योगधंद्यामध्येही त्या कशा पुढे येतील, सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कसा वाढेल यासाठीही महिलांना प्रोत्साहन दिलं गेलं. त्याचा सकारात्मक परिणाम सौदी अरेबियामध्ये दिसतो आहे. अर्थातच या सगळ्या प्रयत्नांचं सौदीमध्ये नागरिकांनीही स्वागत केलं.
हे जे बदल अलीकडच्या काळात दिसताहेत त्यामागे आहेत सौदीचे प्रधानमंत्री आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान. त्यांनी नुकताच आणखी एक ‘धक्कादायक’ निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियासारख्या ठिकाणी मद्यविक्री करणं, मद्य प्राशन करणं किंवा त्यासंबंधी काही ‘गैरकृत्यं’ केली तर ते किती महागात पडू शकतं, हे गुन्हेगारांनाही माहीत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करताना तेही शंभर वेळा विचार करतात, पण आता खुद्द सौदी अरेबियानंच काही अटी आणि शर्तींवर मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. तब्बल ७० वर्षांनंतर म्हणजे १९५२नंतर पहिल्यांदाच तिथे मद्यविक्रीसाठी पहिलं स्टोअर सुरू झालं आहे. सौदीसाठी हे आणखी एक पुढचं पाऊल मानलं जात आहे. अर्थात सध्या तरी सगळ्यांनाच या मद्यपानाचा आस्वाद घेता येणार नाही. बिगर मुस्लीम आणि त्यातही डिप्लोमॅट्स म्हणजे परदेशी मुत्सद्यांसाठी त्यांनी ही ‘खास’ सोय उपलब्ध करून दिली आहे. आपलं ओळखपत्र दाखवून त्यांनाच फक्त मद्य, बीअर किंवा वाइन खरेदी करता येणार आहे.
सौदी अरेबियामध्ये मद्यपानाला बंदी का घालण्यात आली त्याचीही एक मोठी कहाणी आहे. सौदी अरेबियाचे राजे अब्दुल अजीज यांनी १९५२मध्ये सौदीत मद्यविक्री आणि मद्यपानाला बंदी घातली होती. त्यामागे एक मोठं कारण आहे. राजे अब्दुल अजीज यांचे पुत्र प्रिन्स मिशारी यांचा जेद्दाह येथे एका पार्टीत ब्रिटिश राजनैतिक अधिकारी सिरील ओसमॅन यांच्याशी वाद झाला. दोघांनीही मद्य प्राशन केलेलं होतं. छोट्याशा बाचाबाचीचं नंतर भांडणात रूपांतर झालं आणि रागाच्या भरात प्रिन्स मिशारी यांनी सिरीलला गोळी मारली. त्यातच त्यांचा अंत झाला. प्रिन्स मिशारी या प्रकरणात दोषी आढळले, पण सौदीत ‘ब्लड मनी’चा कायदा आहे. या कायद्यानुसार खून झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या जवळच्या व्यक्तींनी जर संमती दिली तर भल्या मोठ्या रकमेच्या भरपाईच्या बदल्यात त्याचा गुन्हा माफ केला जाऊ शकतो. सिरीलच्या पत्नीनं नुकसानभरपाई म्हणून भली मोठी रक्कम घेऊन प्रिन्स मिशारी यांना माफ केलं होतं. त्यानंतरच सौदीमध्ये मद्यबंदी करण्यात आली होती.
या घटनेनंतर प्रिन्स मिशारीही शांत झाले होते आणि आपलं पुढील आयुष्य त्यांनी बऱ्यापैकी अलिप्ततेत घालवलं असं मानलं जातं. २३ मे २००० रोजी अमेरिकेत त्यांचा मृत्यू झाला होता. हा झाला इतिहास, पण सौदीत आता पुन्हा मद्यविक्री सुरू करण्याचं कारण काय?
प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना आपल्या देशाला अगदी विकसित राष्ट्रांच्या पंगतीत जरी नाही, तरी पश्चिमी देशांच्या मांडीला मांडी लावून आपल्याला बसता येईल आणि तेही आपल्या शेजारी आनंदानं येऊन बसू शकतील इतपत आपल्या देशाला आणून ठेवायचं आहे. त्यासाठीच त्यांची इतकी धडपड सुरू आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरब राष्ट्रांकडील तेल कधी ना कधी संपेल, त्याला ओहोटी लागेल, त्याला पर्यायही तयार होतील, त्यावेळी आपल्या देशाचं काय होईल, असा भविष्याचा विचार करुनही काही पावलं त्यांनी उचलायला सुरुवात केली आहे. त्याचंच प्रतीक म्हणून आपल्या देशात त्यांनी विकासाचे अनेक प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. २०३०पर्यंत त्यांना सौदी अरेबियाला जागतिक पातळीवरील बिझिनेस आणि टुरिझम हब बनवायचं आहे.
कुठे बंदी, तर कुठे चलती!
कुवैतमध्ये १९६५पासून मद्यविक्रीला बंदी आहे. त्यामुळे तिथे काही लोकांनी परफ्यूम प्यायला सुरुवात केली होती, तर काहींनी प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या अल्कोहोलचाही मद्यासारखा वापर केला होता. त्यात काही जणांचा मृत्यू झाला होता. सोमालियात काही विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट धर्माच्या व्यक्तींनाच मद्यपानाला परवानगी आहे. लिबिया, बांगलादेश आणि इराण येथेही मद्यविक्रीला बंदी आहे, पण स्मगलिंगच्या माध्यमातून येथे मद्यविक्रीच्या संदर्भात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.