सावंतांचे खेकडे.. अन् जय महाराष्ट्र !

By सचिन जवळकोटे | Published: January 5, 2020 06:45 AM2020-01-05T06:45:09+5:302020-01-05T06:46:19+5:30

लगाव बत्ती...

Savant crabs .. And Jai Maharashtra! | सावंतांचे खेकडे.. अन् जय महाराष्ट्र !

सावंतांचे खेकडे.. अन् जय महाराष्ट्र !

Next

- सचिन जवळकोटे

गेल्या चार-पाच दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच वाक्य कानोकानी कुजबुजलं जातंय. ते म्हणजे, ‘सावंतांना ठाकरेंचा जय महाराष्ट्र!’... आता ‘तानाजींची मातोश्री भेट’ ही स्टोरी कपोलकल्पित असल्याचा दावा त्यांचे समर्थक घसा फाटेपर्यंत करताहेत; मात्र ‘कुठंतरी ठिणगी पेटल्याशिवाय धूर थोडाच भडकतो?’ यावरही कैक शिवसैनिकांचा विश्वास. त्यामुळं ‘मातोश्री’च्या दरबारात यापुढं ‘तानाशाही’ला किती स्थान राहणार, याचा रागरंग ओळखून आतापासूनच एकेक सहकारी बाजूला सरकण्याच्या तयारीत. राहता राहिला विषय खेकड्यांचा. ‘वाकाव’चे तानाजी धरणातल्या खेकड्यांच्या डायलॉगबाजीमुळे एका रात्रीत फेमस झालेले. आयुष्यभर या 'खेकडयांचं टोपलं' डोक्यावर घेऊन फिरण्याची वेळ आलेली. ‘तानाजीं’ना याच खेकड्यांनी खुर्चीवरून खाली खेचलं. आता हे खेकडे धरणातले की त्यांच्या अवती-भोवती फिरणाºया वर्तुळातले, याचा शोध त्यांनाच घ्यावा लागणार. लगाव बत्ती...

झालं असेल तर कसं..
..काहीच घडलं नसेल तर कसं ?

‘सावंत’ जेव्हा आपल्या नव्या ‘सीएम’ना भेटायला ‘मातोश्री’वर गेले तेव्हा तिथं नेमकं काय घडलं, हे फक्त त्यांना अन् त्यांनाच माहीत. तरीही आतल्या ‘कुसंवादा’ची बातमी बाहेर वा-यासारखी कशी पसरत गेली, हे बाहेर गाडीत बसलेल्या दोघा-तिघांनाच ठाऊक. सेनेच्या टॉप लेव्हल गोटात चर्चा अशी की, ‘तानाजी’ जेव्हा ‘मातोश्री’हून बाहेर पडले अन् गाडीत येऊन बसले तेव्हा त्यांनी आतमध्ये नेमकं काय-काय घडलं, हे मोठ्या कौतुकानं सांगितलं.
त्यानंतर त्यांच्या या विश्वासू चेल्यांनीही मोठ्या थाटात हीच घटना अजून चार जणांपर्यंत पोहोचवली. ‘यापुढं खुर्चीसाठी पुन्हा इथं पाऊल टाकणार नाही!’ हा आपल्या नेत्याचा डायलॉग चेल्यांसाठी ‘लय भारीऽऽ’ वाटला असला तरी ‘मातोश्री’कारांचा ‘ठिकायऽऽ जय महाराष्ट्र’ हा संदेश त्यांना समजलाच नाही. ‘आपले  नेते  कुणालाही काहीही कसं बोलू शकतात’, हे सांगण्याच्या नादात चेल्यांनी स्वत:च्याच गटाच्या भवितव्याची मात्र पुरती वाट लावून टाकली; कारण ‘ठाकरेंचा जय महाराष्ट्र’ किती घातक असतो, हे या नव्या मंडळींना माहीत नसलं तरी वर्षानुवर्षे पक्षात राहिलेल्या जुन्या कट्टर सैनिकांना याचं गांभीर्य झटकन् उमजलं. त्यामुळं असं झालंच असेल तर ‘तानाशाही’च्या पॉलिटिकल करिअरला लाख-लाख शुभेच्छा. आता ‘लाख’ हा शब्द त्यांच्या गटाला ‘बंडलां’मध्ये अभिप्रेत असेल तर मात्र त्यांना ‘मातोश्री’ शेवटपर्यंत समजलीच नाही म्हणावी. कारण, तिथं म्हणे अजूनही ‘लक्ष्मी’च्या ‘उदो’पेक्षा ‘सरस्वती’चा ‘ईगो’ खूप महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळं लवकरच पंख छाटण्याची प्रक्रिया सुरू झाली तर पिसं मोजत बसण्याशिवाय हाती राहणार नाही काहीच.

आता याच घटनेची दुसरी बाजूही पाहणं गरजेचं. ‘सावंत’ नेहमीप्रमाणं ‘मातोश्री’वर जाऊन ‘सीएम’ना भेटले. शुभेच्छा दिल्या. स्वत:वरच्या अन्यायाबद्दल काहीच न बोलता शांतपणे हसत-खेळत बाहेर पडले, हे त्यांच्या स्वभावाला न साजेसं मान्य केलं तरीही आतली ‘ब्रेकिंग न्यूज’ मग मीडियापर्यंत कुणी पोहोचवली? कारण या ‘बातमी’मुळं ‘सावंतां’पेक्षाही अधिक ‘मातोश्री’च्या दराºयाला धक्का बसलेला. कुणीतरी ‘सरदार’ दरबारात येतो काय अन् थेट ‘उद्धोराजें’ना खडसावून जातो काय, हे कुठल्याच शिवसैनिकाला न पटलेलं. त्यामुळं ‘सावंतां’ना आपल्या ‘अस्तनीतले निखारे’ अन् ‘झारीतले शुक्राचार्य’ शोधून काढावेच लागणार... तसेच आजही ‘ठाकरे फॅमिली’ आपल्यासोबतच आहे, हे सिद्ध करण्यासाठी जिल्ह्यात ‘सीएम’चा एखादा मोठा कार्यक्रम घ्यावा लागणार. असं झालं तरच त्यांची ‘तानाशाही’ राहील ‘परंडा अन् माढा’सोबत दोन्हीही जिल्ह्यांत.

सावंतां'चं नेमकं कुठं चुकलं?

सोलापूरच्या सेनेला गद्दारीचा शाप तसा जुनाच. पालिकेतल्या मेंबरांपासून ते आमदारकीपर्यंतची बरीच तिकिटं दोन-पाच बंडलांमध्ये विकणारे ‘संपर्क’ नेते कट्टर सैनिकांनी पाहिलेले. ‘चपटी अन् रश्श्या’च्या बदल्यात फुटकळ लोकांनाही खुर्चीवर बसविणारे कर्ते-करविते अनुभवलेले. मात्र ‘सावंतां’च्या ताब्यात इथला पक्ष आल्यानंतर त्यांनी खूप चांगले बदल केले. ‘मिंधेगिरी’च्या मानसिकतेतून कार्यकर्त्यांना बाहेर काढून वेळप्रसंगी ‘अकलूजकरां’च्या विरोधात शड्डू ठोकण्याची ताकदही सहकाºयांना दिली. यंदाच्या विधानसभेला त्यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेण्यास ‘मातोश्री’कारांना भाग पाडले. मात्र यात एक रुपयाचाही कुठं ‘व्यवहार’ झाला नाही, असं बरेच जण मोठ्या अभिमानानं सांगतात. कारण ‘सावंतां’ना आजच्या घडीला पैशाची गरज नसावी.
मात्र ‘आपला गट’ तयार करण्याच्या नादात त्यांनी पक्षात अनेक हितशत्रू तयार करून ठेवले. त्यांनी निवडणुकीत मोठ्या धाडसानं घेतलेले सारेच निर्णय या मंडळींनी निकालानंतर कुचकामी करून टाकले. ‘बार्शी, करमाळा, मोहोळ, माढा अन् मध्य’मधील त्यांच्या हक्काच्या उमेदवारांनी पुरता अपेक्षाभंग केला. काहीजण अवसानघातकी तर काहीजण विश्वासघातकी निघाले.त्यामुळं मुंबईतल्या ‘शिंदे-कदम-शेवाळें’सह कैक नेत्यांच्या हाती आयतं कोलीत मिळालं.
अशातच त्यांची ‘जीभ’ त्यांच्यासाठी सर्वात मोठी शत्रू ठरली. सहा महिन्यांची ‘लाल बत्ती’ मिळाल्यानंतर या राजकीय ‘विद्यावाचस्पतीं’नी जी नवनवीन मुक्ताफळं उधळली, त्यातून ते विनाकारण ‘कुचेष्टेचे धनी’ बनले. अशातच केवळ ‘बार्शी अन् करमाळा’ येथील ‘थोरले काकां’चे विश्वासू सरदार फोडून ते थांबले नाहीत, तर सार्वजनिक सभेतही शारीरिक व्यंगाबद्दल खालच्या पातळीवर बोलून ‘बारामतीकरां’ची नाराजीही ओढवून घेतली. या साºयाचाच परिपाक म्हणजे ‘मातोश्री’कारांचे एकेकाळचे लाडके ‘तानाजीराव’ नव्या सरकारमध्ये चक्क ‘माजी मंत्री’ बनले. 

सोशल मीडियावर
‘माने अन् सावंत’

‘ठाकरे सरकार’चा मंत्रिमंडळ विस्तार महिनाभर का रखडला, माहिताय का तुम्हाला? वाटल्यास ‘माने’ अन् ‘सावंत’ यांच्या कार्यकर्त्यांना विचारा. त्यांनी ‘सोशल मीडिया’वर ज्या पद्धतीनं अचाट धुमाकूळ घातलाय, तो पाहता महिनाभरात आतल्या गोटात नेमकं काय घडलं असेल, याचा अंदाज येतोय. ‘मातोश्री’वर म्हणे ‘दिलीपराव अन् तानाजीरावां’ना मोठ्या सन्मानानं बोलावून घेतलेलं. ‘तुम्हाला कुठलं खातं पाहिजे, ते सांगा. त्यानंतर बाकीची खाती घड्याळ अन् हातवाल्यांना देता येतील’, असं त्यांना सांगितलं गेलं तेव्हा दोघंही तत्काळ म्हणाले, ‘आम्हाला कॅबिनेट-बिबिनेटमध्ये इंटरेस्ट नाही. थेट सहउपमुख्यमंत्री पदच पाहिजे.’ हे ऐकताच पक्षाचे वरिष्ठ नेतेही खुश झाले. ते म्हणाले, ‘तुम्ही म्हणाल तसं. तुमचा शब्द आम्ही मोडूच शकत नाही. तुमच्यासाठी हे पद लवकरात लवकर तयार करू!’

(ता.क. : असाही मजकूर ‘सोशल मीडिया’वर फिरू शकतो. अशा पोस्टवर यापुढं किती विश्वास ठेवायचा, याचा विचार करण्याची वेळ आलीय. लगाव बत्ती...)

जाता-जाता : ‘मातोश्री’वर ‘सावंत’ नेमकं काय बोलले, याच्याशी म्हणे ‘करमाळा अन् बार्शी’तील जनतेला काहीच देणं-घेणं नाही. त्यांना म्हणे फक्त निवडणुकीत ते काय बोलले, एवढंच आठवतंय, ‘बागल अन् सोपलांचा कारखाना मी चालवायला घेईन!’... आता तेवढे वाईच बघा की तानाजीरावऽऽ... कारण देवगणचा ‘तानाजी’ पिक्चरही येऊन जायची वेळ आली. परंतु या दोन कारखान्यांवर ‘सावंत प्रायव्हेट लिमिटेड’ची माणसं कुठं दिसेनात की!.. लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Savant crabs .. And Jai Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.