आधी भारतीयांना वाचवा..
By admin | Published: March 5, 2017 11:20 PM2017-03-05T23:20:35+5:302017-03-05T23:20:35+5:30
लोकशाही आणि मानवी अधिकारांचे आश्वासन आपल्या लिखित राज्यघटनेतून जगाला देणारा अमेरिका हा इतिहासातला पहिला देश आहे;
लोकशाही आणि मानवी अधिकारांचे आश्वासन आपल्या लिखित राज्यघटनेतून जगाला देणारा अमेरिका हा इतिहासातला पहिला देश आहे; मात्र त्याच्या इतिहासात संगतीहून विसंगतीच अधिक दिसल्या आहेत. बेंजामिन फ्रँकलिन, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, अलेक्झांडर हॅमिल्टन आणि जेम्स मॅडिसन यांच्यासारखे त्याच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते व घटनाकार देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकीकडे ब्रिटिशांशी लढत असतानाच दुसरीकडे गुलामांचा व्यापार करीत होते. आफ्रिकेतून कृष्णवर्णीयांना पकडून आणून त्यांचे बाजार भरविणारे हे गुलामांचे व्यापारी आपल्या जनतेला मात्र स्वातंत्र्य आणि समतेची वचने देत होते. अमेरिकेतील ही विसंगती संपायला फार काळ जावा लागला. अब्राहम लिंकनसारख्या अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आलेल्या आजवरच्या नेत्यांत सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या नेत्याला त्यासाठी आपला बळी द्यावा लागला. नंतरच्या काळातही कृष्णवर्णीयांविरुद्धचा भेदभाव आणि त्यांच्या हत्त्या सुरूच होत्या. १९६० च्या दशकापर्यंत कू क्लक्स क्लॅनसारखी गौरवर्णीयांची अतिरेकी संघटना त्यात कृष्णवर्णीयांच्या हत्त्या करीतच होती. पुढील काळात मानवी अधिकारांचा जो जागतिक जागर झाला, त्यामुळे या हत्त्याकांडांना काहीसा पायबंद बसला. २००९ च्या निवडणुकीत त्या देशाने बराक ओबामा या कृष्णवर्णीय नेत्याला अध्यक्षपदी निवडून दिले तेव्हा तो त्या देशाने त्याच्या या हिंस्त्र इतिहासाच्या घेतलेल्या पश्चात्तापाचाही एक भाग होता; मात्र आता ओबामांच्या जागी ट्रम्प आले आणि त्या देशातील वर्णवर्चस्ववादाने पुन्हा उसळी घेतली असल्याचे सांगणाऱ्या घटना तेथे घडू लागल्या आहेत. ट्रम्प हे स्वत:च स्त्री स्वातंत्र्याचे विरोधक, वर्णवर्चस्ववादी, विदेशी व कृष्णवर्णीयांवर रोष असणारे, मुस्लीम धर्मविरोधक व कमालीचे अहंमन्य पुढारी आहेत. ‘विदेशी वंशाच्या लोकांपासून अमेरिकेचा बचाव करण्याच्या’ त्यांच्या घोषणेमुळे त्या देशातील तथाकथित राष्ट्रवाद्यांच्या अतिरेकी कारवायांना ऊत आला आहे. यावेळचा या अतिरेक्यांचा राग अमेरिकेत व्यापार, व्यवसाय वा अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्यासाठी आलेल्या विदेशी वंशाच्या उच्चशिक्षितांवर आहे. त्यात भारतीय वंशाचे तरुण फार मोठ्या संख्येने आहेत. दि. २२ फेब्रुवारीला या अतिरेक्यांपैकीच एका माथेफिरूने श्रीनिवास कुचीभोतला या भारतीय अभियंत्याची कन्सास या शहरात गोळ्या घालून हत्त्या केली. त्या हत्त्येने जग हादरले. खुद्द अमेरिकेच्या केंद्रीय विधिमंडळाने एक मिनिट स्तब्ध राहून त्याला मूक श्रद्धांजली वाहिली. त्याच्या हत्त्येविषयीची माहिती त्या देशाचे परराष्ट्र खाते भारताला देत असतानाच साउथ कॅरोलिना या राज्यातील लँकेस्टर परगण्यात राहणाऱ्या हर्निश पटेल या ४३ वर्षे वयाच्या भारतीयाला तेथील अतिरेक्यांनी त्याच्या घरासमोर गोळ्या घालून ठार केले आणि आता दि. ३ मार्चला दीप रॉय या ३९ वर्षे वयाच्या शीख तरुणाला ‘गो बॅक टू यूवर कंट्री’ असे म्हणत प्रत्यक्ष वॉशिंग्टन शहरात गोळ्या घालून जखमी केले. रॉयने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे हे येथे नोंदविले पाहिजे. अमेरिकेतील नोकऱ्या व व्यवसाय हे विदेशी पळवितात आणि आम्हाला ओरबाडतात असा प्रचार करणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणाबाजीची ही प्रत्यक्ष परिणती आहे. ‘हा देश आमचा (म्हणजे फक्त कॉकेशियन वंशाच्या लोकांचा) आहे. येथे तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही, सो गेट आउट आॅफ अवर कंट्री’ असे सांगून केल्या गेलेल्या या हत्त्या आहेत. त्या सामान्य खुनाच्या गुन्हेगारीसारख्या नसून एका मोठ्या राजकीय व्यूहाचा भाग आहेत. जर्मनीत हिटलर सत्तेवर आला तेव्हा तेथील ज्यूंची अशीच हत्त्या करण्याचे व तो देश ज्यूमुक्त करण्याचे धोरण त्याने आखले. साठ लाखांवर ज्यूंना मारून त्याने ते कठोरपणे अंमलातही आणले. त्याआधी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर तेथील क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य व समतेचे नाव घेत देशातील सरंजामदार, शेतमालक आणि धर्मगुरु यांची गावोगाव गिलोटिन उभारून हत्त्या केली. तो कित्ता पुढे अनेक जमातवादी देशांनी आपल्या राज्यात गिरविला. रशिया आणि चीनने कम्युनिझमला विरोध म्हणजे देशाला विरोध असे सांगत कोट्यवधी लोकांना ठार केले. मध्य आशियात आज सुरू असलेला धर्मांध हिंसाचारही याच प्रकारात बसणारा आहे. त्यामुळे ‘आम्ही म्हणजेच देश किंवा आमचा नेता म्हणजेच सारे काही’ असे म्हणणाऱ्या व्यक्ती व संघटनांपासून सगळ्याच लोकशाहीवादी शक्तींनी सावध होणे आवश्यक आहे. असे सावधपण आता भारतीयांमध्ये येण्याचीही गरज आहे. धर्मांधता, वर्णांधता वा जात्यंधता या बाबी जेवढ्या हानिकारक व हिंस्त्र तेवढीच विचारांधताही हिंसाचारी असते. असो, आताचा प्रश्न अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांविषयीचा आहे. ट्रम्प यांनी आपल्या मोदींशी फोनवर फार गोड बातचित केल्याच्या बातम्या अलीकडे प्रकाशित झाल्या. त्या वाचून होत नाही तोच दोन भारतीय तरुणांची ट्रम्पच्या देशात हत्त्या झाली तर एकजण त्यांच्या वंशवादापायी गंभीररीत्या जखमी झाला. ट्रम्प यांचा गोड बोलण्याचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या देशातील भारतीयांचे जीवन सुरक्षित व आश्वस्त करण्यात जोवर होत नाही तोवर त्यांच्यापासून व जगभरच्या अतिरेकी, आत्मग्रस्त संघटनांपासून सावध होणे ही काळाची गरज आहे.