...अब तक दोस्ती देखी, अब दुश्मनी देख लेना !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:49 AM2022-01-28T05:49:32+5:302022-01-28T05:51:25+5:30
भाजप-शिवसेनेतील अगाध मैत्री हा महाराष्ट्राचा इतिहास; दोघांमधील कट्टर वैर हे वर्तमान! आता ‘कोणाचा भगवा अधिक खरा?’ यावरून भांडण पेटताना दिसतं आहे!
यदु जोशी
‘उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसी?’ - अशी डिटर्जंट पावडरची एक (जुनी) जाहिरात आहे. त्याच धर्तीवर ‘‘कोणाचा भगवा अधिक खरा?’’- असा वाद सध्या भाजप-शिवसेनेमध्ये सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाषण भाजपला झोंबलं. देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्याच दिवशी हल्लाबोल केला. ‘शिवसेनेचं असं का होतं?’, असा सवाल याच ठिकाणी गेल्या आठवड्यात केला होता. उद्धव यांनी पक्षाची ठेव बाळासाहेबांकडून स्वीकारली. मात्र, बाळासाहेबांच्या या फिक्स्ड डिपाॅझिटवरचं केवळ व्याज खात राहायचं असं त्यांनी केलं नाही. बाळासाहेबांचे गुण उद्धव यांच्यात नाहीत अशी टीका करणाऱ्यांना त्यांनी कृतीतून उत्तर दिलं. बाळासाहेबांनंतर शिवसेना संपणार किंवा (तेव्हाचं) कृष्णकुंज ती हायजॅक करणार हे दावे त्यांनी खोटे ठरविले. परवाच्या भाषणात त्यांनी भाजपवर केलेले तीव्र शाब्दिक हल्ले आणि त्याची तितक्याच तीव्र शब्दात फडणवीसांनी केलेली परतफेड लक्षात घेता आगामी काळ अधिक संघर्षाचा दिसतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची किनार अर्थातच त्याला असेल.
नगरपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिल्याचं परवाच्या भाषणात ठाकरे यांनी मान्य केलंच, शिवाय या परिस्थितीसाठी आपण स्वत:ही गुन्हेगार आहोत अशी कबुली त्यांनी दिली. इतकं जाहीर आत्मचिंतन ठाकरेंकडून यापूर्वी कधी झालेलं नाही. ठाकरे केवळ ‘डिलिव्हरिंग एंड’ला किंवा ‘डिक्टेटिंग टर्म’मध्ये असतात... ‘रिसिव्हिंग एंड’ला राहणं त्यांना कमीपणाचं वाटत असावं. या टीकेच्या पार्श्वभूमीवर, उद्धवजींनी, ‘होय ! मीदेखील गुन्हेगार आहे’ असं म्हणणं याला महत्त्व आहे. यापुढची प्रत्येक अन् प्रत्येक निवडणूक सारख्याच गांभीर्याने लढण्याचा संकल्प त्यांनी सोडला आहे.
युतीमध्ये शिवसेनेची २५ वर्षे सडली असं उद्धव ठाकरे आज नव्यानं म्हणालेले नाहीत. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप आमनेसामने असतानाही ते तसं बोलले होते पण, २०१९ च्या लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीतही ते भाजपसोबतच होते. ‘वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजितो दात, जात ही मर्दाची’ या शब्दात कल्याण-डोंबिवलीच्या प्रचारात फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं होतं. पुढे तेच फडणवीस लोकसभा, विधानसभेला शिवसेनेसोबत बसलेच ना ! दोन्ही प्रसंग घडले तेव्हा दोघे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले होते. आता तर मांडी सुटलेली आहे. भाजप-शिवसेनेतील अगाध मैत्री हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, दोघांमधील कट्टर वैर हे वर्तमान आहे. त्यामुळे ‘अब तक दोस्ती देखी, अब दुश्मनी देख लेना’ असं चाललं आहे. आजवरच्या घटनाक्रमांचा साक्षीदार म्हणून दोघांसाठी एवढंच की, ‘दुश्मनी जम के करो पर, इतनी गुंजाईश रहे, कल जो हम दोस्त बन जाये, तो शर्मिंदा न हो.’
पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी सर्वात महत्त्वाची आहे ती उत्तर प्रदेशची निवडणूक. उद्या समजा ही निवडणूक भाजपनं जिंकलीच तर, काय होईल?, ‘इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात इंदिरा गांधी या एकच पुरुष आहेत’ असं उपरोधानं वा कौतुकानं म्हटलं जायचं. मोदी हे झब्बा-पैजामा- जॅकेटमधील इंदिरा गांधी आहेत. असं म्हणतात की, इंदिराजी त्यांच्या शत्रूंना अर्धे मारून ठेवत, मोदी तर पूर्णच मारतात. एक लक्षात घ्या की, महाराष्ट्रातील सत्तांतर, सध्याची परिस्थिती यावर मोदी अजून काहीही बोललेले नाहीत पण, उत्तर प्रदेशचा निकाल त्यांच्या बाजूनं लागला तर, त्यांच्या टार्गेटवर महाराष्ट्र नक्कीच असेल. त्यावेळी बरेच संदर्भ बदललेले दिसू शकतील. कोण जुने हिंदुत्ववादी, कोणाचा जन्म आधीचा, कोणाचे नगरसेवक, आमदार आधी निवडून आले याचा हिशेब विचारण्याचं काम सध्या भाजप-शिवसेना करीत आहे. एकमेकांच्या जन्मकुंडल्या तपासत आहेत. तीन पक्षांचं सरकार चालवताना उद्धव ठाकरे यांची कसरत होत आहे. शिवसेनेचा आत्मा जिथे आहे त्या मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम जवळ आहे. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील. भाजप व काँग्रेस स्वबळावर लढेल असं दिसतं. शिवसेना आजही भाजपसोबत जावू शकते असे अस्पष्ट संकेत देत, कधी फडणवीसांशी बंदद्वार चर्चा करत, उद्धव ठाकरे हे मित्रपक्षांवर दबाव आणत आले आहेत पण, परवाच्या त्यांच्या भाषणानं त्यांनी दबावाचं हे अस्त्र बोथट केलं. मनसेसोबत भाजप युती करणार नाही असं सांगून चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेवरच्या दबावाचं अस्त्र उगाच बोथट करून घेतलं. एकमेकांविरुद्ध शस्त्र परजण्याच्या नादात राजकीय चुकाही होतात, त्या अशा !
(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक, आहेत)