गोड बोला, सहिष्णू वागा !
By admin | Published: January 14, 2016 04:03 AM2016-01-14T04:03:34+5:302016-01-14T04:03:34+5:30
पुण्याच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातून जगाला कोणता संदेश द्यायचा असेल तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असा द्यायला हवा.
- विजय बाविस्कर
पुण्याच्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनातून जगाला कोणता संदेश द्यायचा असेल तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असा द्यायला हवा.
तिळ-गूळ घ्या, गोड बोला...
या पाच शब्दांत व संदेशात केवढे मोठे तत्त्वज्ञान व स्नेह साठवलेला आहे. देशात असहिष्णुतेवर मोठी चर्चा सुरू असताना, या पाच शब्दांच्या मंत्राला मोठे महत्त्व आले आहे. खरे तर ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ असे म्हणण्याचा हा काळ आहे. देशातील साहित्यिकांनी असहिष्णुतेच्या कारणावरून ‘पुरस्कार वापसी’ सुरू केली असताना, पिंपरीत होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. सबनीस यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे भाजपाने संमेलनातून सबनीसांना ‘वापस’ करण्याचा इशारा दिला होता. सबनीसांनी दिलगिरी व्यक्त करीत, या वादावर पडदा टाकला व मराठीच्या उत्सवाचा रस्ता मोकळा केला याचे स्वागत केले पाहिजे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनीही हा वाद मिटविण्यासाठी नेमकेपणाने संतुलित परिपक्व भूमिका मांडून यशस्वी मध्यस्थी केली. ‘मोदींचा अनादर करणे हा माझा हेतू नव्हता. मोदी हे पाकिस्तानात आपले शिर तळहातावर घेऊन गेले होते. तेथे त्यांच्या जिवाला धोका संभवू शकला असता, या कळकळीतून आपण मोदींबाबत ते वक्तव्य केले’ असे सबनीस यांचे म्हणणे आहे. सबनीस यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे व ते त्यांनी घेतले. त्यांनी पंतप्रधानांचा जो एकेरी उल्लेख केला तो मात्र अनेकांना खटकला. मतभेद स्वागतार्ह; पण एकमेकांच्या सन्मानाचा संकोच करायला नको, हे तत्त्व सबनीस यांनीही पाळायला हवे होते, असे अनेकांचे म्हणणे आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांना सबनीस यांचे वक्तव्य खटकले; पण सबनीस यांच्याबाबत सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅड. संजीव पुनाळेकर यांनी केलेले ‘टिष्ट्वट’ भाजपा, राज्यकर्ते व साहित्यिक या सर्वांनीच दुर्लक्षिले हे मात्र अनाकलनीय व आश्चर्यकारक आहे. ‘सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला’ असा सल्ला पुनाळेकर यांनी ‘टिष्ट्वट’द्वारे दिला. हा सल्ला की धमकी, असा थेट प्रश्न पडावा, अशी दुर्दैवी उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे या विचारवंतांची हत्या मॉर्निंग वॉकदरम्यान घडली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांना ‘मॉर्निंग वॉक’ला जाण्याचा सल्ला देऊन पुनाळेकर काय सुचवू इच्छितात? सबनीस यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणे जेवढे आक्षेपार्ह आहे, तेवढाच गंभीर हा गर्भित इशारा आहे; पण सबनीसांमागे मोठी संघटना नसल्याने याचा जाब पुनाळेकरांना कोण विचारणार? सबनीस यांच्या दिलगिरीनंतर त्यांच्या वक्तव्यावरुन सुरू झालेला गदारोळ थांबण्याची अपेक्षा असली, तरी पुनाळेकरांच्या टिष्ट्वटबाबत आतातरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. संमेलन निर्विघ्नपणे पार पडेल, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे संमेलनाच्या मांडवातून मकर संक्रांतीचा कोणता संदेश द्यायचा असेल, तर तो ‘गोड बोला, सहिष्णू वागा’ हाच असायला हवा. कृतीही सहिष्णू हवी. गोडव्याचा हा संदेश केवळ संक्रांतीच्या सणापुरता अपेक्षित नाही. आपल्या राज्यघटनेलाही हेच तत्त्व अभिप्रेत आहे. प्रत्येक व्यक्तीचा, धर्माचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करत आपण सामोपचाराने पुढे जाऊ, असे संविधान सांगते. प्रसंगी प्रखर, कठोर, परखड व रोखठोक बोलण्याची गरज असते. समाजहितासाठी ते आवश्यकही असते. पण, त्यात एक सभ्यता, विवेक व सुसंस्कृतता असावी. संक्रांतीचा सण देशात विविधतेने साजरा होतो. हा सण परस्परांतील माधुर्य वाढविण्याचा संदेश देतो. संक्रांतीच्या दिवशीच ‘भूगोल दिन’ही आहे. भूगोल हा विषय मानव व पर्यावरण यांच्यातील सहबंध सांगतो. ‘माणूस’ व ‘पर्यावरण’ यांना जोडतो. जोडणे हा जर निसर्गाचा स्वभावधर्म असेल, तर आपण दुराव्याची भाषा का करावी? संमेलनातून मने जोडणारा संवाद घडावा व तो पुढे जावा, ही माफक अपेक्षा आहे.