म्हणे, दहा पोरे जन्माला घाला!

By admin | Published: December 28, 2016 02:56 AM2016-12-28T02:56:37+5:302016-12-28T02:56:37+5:30

विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांना प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान ४ मुले जन्माला यायला हवी आहेत. रा.स्व.संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांना ५ मुले जन्माला येणे

Say, ten potters are born! | म्हणे, दहा पोरे जन्माला घाला!

म्हणे, दहा पोरे जन्माला घाला!

Next

विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडियांना प्रत्येक हिंदू कुटुंबात किमान ४ मुले जन्माला यायला हवी आहेत. रा.स्व.संघाचे माजी सरसंघचालक कुप्प.सी. सुदर्शन यांना ५ मुले जन्माला येणे आवश्यक वाटत होते. तर आताच्या ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांना त्यात दुपटीची भर घालून ‘प्रत्येक हिंदू स्त्रीने दहा मुलांना (मुली नकोत) जन्म देणे गरजेचे वाटत आहे’ नागपूर या संघाच्या राजधानीत भरलेल्या धर्मसंस्कृती महाकुंभाचा समारोप करताना या वासुदेवानंदांनी साऱ्या हिंदूंना व विशेषत: त्यातील स्त्रियांना हा धर्मादेश ऐेकवला आहे. धर्माचा हा आदेश शिरोधार्ह मानून हिंदू महिलांनी तो पूर्ण करण्यासाठी उत्साहाने पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले नाहीत, एवढेच. ‘हम दो हमारे दो हे सरकारी आवाहन हिंदूविरोधी आहे. ते हिंदूंची देशातील संख्या कमी करणारे आहे, सबब त्याकडे दुर्लक्ष करा व दहा पोरे जन्माला घाला’ असे या ब्रह्मचाऱ्याचे सांगणे आहे. आठव्या शतकात झालेल्या श्रीमद् आद्य शंकराचार्यांच्या पदाची उंची आणि महती त्यांच्या पश्चात जी घसरत गेली ती आताच्या शंकराचार्यांनी पुरती तळापर्यंत नेली आहे. त्यांना धर्माचे नेते म्हणून आपल्या जबाबदाऱ्या समजत नाहीत, समाजाचे सेवक म्हणून त्यांच्याकडे येणारे उत्तरदायित्वही कळत नाही. झालेच तर त्यांना ब्रह्मचर्याएवढ्याच गृहस्थाश्रमाच्या मर्यादाही कळत नाहीत. त्यातून त्यांना हिंदूच नव्हे तर कोणत्याही धर्मातील स्त्रियांच्या शरीरस्वास्थ्याविषयी काहीएक सहानुभूती वा आस्थाही नाही. सध्या देशात एक पुरुष व एक स्त्री अशा मॉनॉगॉमस कुटुंबांचा कायदा आहे आणि तो हिंदूंएवढाच अल्पसंख्यकांनाही लागू करा अशी मागणी आहे. जास्तीची मुले वाढविणे हे गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही आता आपत्तीजनक वाटू लागले आहे. मुलांचे पालनपोषण, शिक्षण व रोजगार या आजच्या पालकांसमोरच्या मोठ्या समस्या आहेत. मात्र त्याची काळजी करण्याची या वासुदेवानंदांसारख्या शंकराचार्य म्हणविणाऱ्यांना गरज नाही. जे स्वत:ला जमत नाही वा करायचे नाही ते जगाला करायला सांगून मोकळे होणे हा तसाही सगळ््या गादीधारक गुरुंचा प्रस्थापित व्यवसाय आहे. या गादीधारकांना लाभणारे भगतही दुर्दैवाने आपल्या साक्षर समाजात भरपूर आहेत. त्यातले काही या शंकराचार्यांच्या आदेशानुसार कामाला लागले असण्याची शक्यताही नाकारता येणारी नाही. (संघाच्या सुदर्शन यांनी जेव्हा पाच पोरांचा आदेश आपल्या स्वयंसेवकांना दिला तेव्हा केरळातल्या एका भगिनीने त्यांना पत्र पाठवून आपली व्यथा कळविली होती. त्या पत्रात ‘आता माझे वय झाले आहे, अन्यथा मी आपला आदेश अमलात आणला असता’ असे तिने म्हटले होते.) भारतीय समाज हा मुळातच बऱ्यापैकी धर्मश्रद्ध व गुरु परंपरेला वंदन करणारा आहे. त्याला आपले गुरू हे दैवत स्थानीच वाटत आले आहेत. गुरूची आज्ञा वा संदेश हा या समाजाला धर्माज्ञेएवढाच पूज्य वाटत आला आहे. अशा समाजात अंधश्रद्धा नेहमीच बळकट असतात. या भाबडेपणाचा फायदा घेणारे व त्यावर आपली धनसंपदा वाढविणारे आणि आपल्या गाद्या बळकट करीत नेणारे बुवा आणि बाबा आता देशाच्या चांगल्या परिचयाचे झाले आहेत. तरीही शंकराचार्य या नामाभिधानाला हिंदू समाजात आजही मोठी प्रतिष्ठा व सन्मान आहे. हे नाव लावणाऱ्यांनी जास्तीतजास्त जबाबदारीच्या व समाजभानाच्या दृष्टीने वागले व बोलले पाहिजे ही अपेक्षा स्वाभाविक म्हणावी अशी आहे. त्यातून ही माणसे जेव्हा मुख्यमंत्री व त्यांच्यासारख्या महत्त्वाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाषणे करतात तेव्हा त्यांनी किमान आपले वक्तव्य हास्यास्पद व टिंगलीचा विषय होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. वासुदेवानंद महत्त्वाचे नसतात, त्यांनी धारण केलेले शंकराचार्य हे नाव कमालीच्या आदराचे असते. किमान त्या नावाला जागून आपण जबाबदारीने बोलले पाहिजे हे या वासुदेवानंदाला समजले पाहिजे. या माणसांना त्यांची जबाबदारी कळत नसेल तर मुख्यमंत्र्यांसारख्या तेथे हजर नेत्यांनी त्यांना खोडून काढण्याचे धाडस दाखविले पाहिजे. राज्यकर्ते असे धाडस करणार नसतील तर वासुदेवानंदाला तेही सामील आहेत असेच म्हणणे भाग पडेल. धर्मसंसद किंवा महाकुंभ यासारख्या सर्वसामान्यांच्या मेळाव्यात अशी माणसे का आणली जातात, हाच त्यांच्या आयोजकांना आपण विचारावा असा प्रश्न आहे. धर्माचा आचार्य हा नुसता धार्मिक असून चालत नाही. त्याला एका सामाजिक उत्तरदायित्वाचीही जोड असावी लागते. त्याला राजकारण आणि समाजव्यवस्था यांचेही भान असावे लागते. त्याहून महत्त्वाची बाब, त्याला आपल्या समाजातील स्त्रियांच्या आताच्या अवस्थेचीही पुरेशी माहिती असावी लागते. ती न घेता तिच्यावर दहा पोरांना जन्म देण्याची अशी सक्ती लादणे ही बाब ती घालू पाहणारे वासुदेवानंद हे इसम शंकराचार्याच्या नामाभिधानाला पुरेसे योग्य नाहीत, असेच म्हणणे भाग आहे.

Web Title: Say, ten potters are born!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.