एकदा थँक्यू तर म्हणून बघा... 

By किरण अग्रवाल | Published: May 16, 2021 11:40 AM2021-05-16T11:40:26+5:302021-05-16T11:49:49+5:30

Say Thank You : डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस असोत, की सफाई कर्मचारी 'त्यांच्या' सेवेचे मोल अनमोल; 

Say Thank you so much to Doctors, nurses and police | एकदा थँक्यू तर म्हणून बघा... 

एकदा थँक्यू तर म्हणून बघा... 

googlenewsNext
ठळक मुद्देटाळ्या, थाळ्या वाजवून झाल्या,   आता मानसिक बळ गरजेचेसामाजिकतेची भावना वाढीस लावायची असेल तर यासंबंधीचे आत्मचिंतन गरजेचे ठरावे. 

- किरण अग्रवाल

कोरोनाच्या महामारीने कुटुंबा कुटुंबातच विलगिकरणाची वेळ आणली आहे हे खरेच, पण म्हणून नात्यांचे बंध सैलावू नयेत. ही वेळ जशी नाती जपण्याची, परस्परांना धीर देण्याची आहे तशीच या संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी झटणाऱ्या सेवार्थीं घटकांचे मनोबल उंचावण्याचीही आहे. होते आहे का ते आपल्याकडून, हा यासंदर्भातील प्रश्न आहे; जो प्रत्येकाने स्वतःलाच विचारून प्रामाणिकपणे त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. समाजातील सर्वंकष सामाजिकतेची भावना वाढीस लावायची असेल तर यासंबंधीचे आत्मचिंतन गरजेचे ठरावे. 

शासकीय असोत की खासगी  रुग्णालये व कोविड सेंटर्स, तेथील वैद्यकीय दल स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांवर उपचार करीत आहेत. जीवघेण्या उकाड्यात असह्य ठरणारी पीपीई किट घालून ही हाडामांसाची माणसं अहर्निश सेवा बजावत असून प्रत्येक जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉक्टरांसोबत परिचारिका भगिनीही परिश्रम घेत आहेत, पण नुकताच परिचारिका दिन झाला त्यादिवशी किती जणांनी या भगिनींना धन्यवाद म्हटले? बाहेरचे त्रयस्थ जाऊ द्या, पण शेजारपाजारच्या वा गल्लीतल्या लोकांनी तरी तिला म्हटले का कि, ताई तू खूप चांगली सेवा करते आहेस;  स्वतःची काळजी घे बरं! 

आज प्रत्येक कुटुंब चिंतेत आहे, चहुकडे भय दाटले आहे. कोरोनाच्या रूपाने मृत्यू कुणाला कुठे गाठेल याची शाश्‍वती राहिलेली नाही. ज्या कुटुंबात एखादा बाधित आहे त्याला यातील चटके काय असतात ते ठाऊक आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील मावश्या, वार्ड बाय,  रुग्णवाहिका चालक; यांचे कुटुंबीय तर रोजच हे चटके अनुभवत आहेत; कारण शेकडो बाधितांशी त्यांचा नित्याचा संपर्क येत आहे. पोलीस बांधवही आपल्या आरोग्य व सुरक्षेसाठी अहोरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावत आहेत. ड्युटीवर जाणाऱ्या या घटकाची व त्यांच्या कुटुंबियांची काय मानसिकता असेल व ते किती तणावात असतील याची कल्पनाच न केलेली बरी. कोरोना बाधितांच्या सानिध्यात राहायला किंवा त्याला आवश्यक त्या सेवा पुरवायला जिथे कुटुंबातील रक्ताची माणसे भीतीपोटी सतरांदा विचार करताना दिसतात तिथे ही सेवार्थी मंडळी रिस्क घेऊन काम करत आहेत. कालच जागतिक कुटुंब दिन झाला, तेव्हा कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून समर्पित भावाने झटणाऱ्या या घटकाला कोणी थँक्यू म्हटले का? 

दोन दिवसांपूर्वी अक्षयतृतीयेचा सण आपण साजरा केला, पण आपण घरात गोड-धोड खात असताना हा घटक मात्र सुट्टी न घेता रुग्णालयात वा रस्त्यावर 45 अंश सेल्सिअस तापमानात घामेघूम होत कर्तव्य बजावत होता. घंटागाड्यांवरील तसेच सफाई कर्मचारी बांधवांचे घ्या, आपल्या दारापर्यंत येऊन सर्व कचरा वाहून नेण्याचे काम ते प्रतिदिनी करीत आहेत. ना हात मोजे, ना तोंडाला मास्क, पायात गम बूटही नाहीत; अशा स्थितीत ते सेवारत आहेत. त्यांच्या जीवाला धोका नाही का ? पण त्यांनी कुठे कुरकुर केल्याचे ऐकिवात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील असो, की जिल्हा परिषद व महापालिकेसारख्या सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी; 
ड्युटी जरी असली तरी, जीव मुठीत घेऊन ते कर्तव्य बजावत आहेत. 

विभक्ततेतुन आकारास आलेल्या चौकोनी कुटुंबात कर्त्या व्यक्तींच्या बाधितावस्थेमुळे ओढवलेली अडचण तर अतिशय अस्वस्थ करणारी आहे परंतु समाजातील काही संस्था व व्यक्ती अशा कुटुंबांना जेवणाचा डबा पोहोचवण्याचे सत्कार्य करीत आहेत. अशांच्या कर्तव्य निष्ठेचे व सामाजिक भानाचे उतराई होत, ते भेटल्यावर त्यांना साधे थँक्यू तर म्हणून बघा; त्याने त्यांची इम्युनिटी नक्कीच वाढेल व अंतिमतः ते आपल्याच कामी येतील. दाखवणार आहोत का आपण हा मनाचा मोठेपणा? मागे पंतप्रधानांनी आवाहन केले म्हणून आपण टाळ्या व थाळ्या वाजवल्या, पण आता त्या वेळेपेक्षा अधिक भयानक स्थितीचा सामना करावा लागत आहे. अजून तर पुढे तिसऱ्या लाटेला सामोरे जायचे आहे. अशा स्थितीत ज्यांच्या बळावर आपण कोरोना विरुद्धचे युद्ध लढत आहोत, त्या योद्ध्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे मनोबल उंचावणे हे समाजाचे कामच नव्हे, तर जबाबदारीही आहे. तेव्हा चला, जागो तभी सबेरा म्हणत;  तमाच्या तळाशी दिवे लावूया ...

(लेखक हे लोकमतच्या अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

kiran.agrwal@lokmat.com

Web Title: Say Thank you so much to Doctors, nurses and police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.