...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’!

By Shrimant Mane | Published: September 16, 2023 11:03 AM2023-09-16T11:03:24+5:302023-09-16T11:03:57+5:30

जगभर एक गोष्ट निश्चित मानली जाते, की या ब्रह्मांडात आपण पृथ्वीतलावरील माणसे एकटेच नाही. त्या तिथे पलीकडे कुणीतरी नक्की आहे.

...saying, 'Koi Mil Gaya' from the corpses of a thousand years ago! | ...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’!

...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’!

googlenewsNext

- श्रीमंत माने
( संपादक, लोकमत, नागपूर)  

जेमी मोसान नावाच्या परग्रहांवरून येणाऱ्या कथित उडत्या तबकड्यांचा तज्ज्ञ असलेल्या मेक्सिकन पत्रकाराने परवा जगभर खळबळ उडवून दिली. अवघ्या मीटरभर उंचीच्या, हातांना तीनच बोटे असलेल्या, त्यातील एका बोटात कसल्याशा धातूची अंगठी असलेल्या आणि माणसांच्या तुलनेत अधिक लांबुळक्या मानेचे दोन मृतदेह त्याने मेक्सिकन कॉंग्रेस या संसदेपुढे सादर केले. हे मृतदेह माणसाचे नाहीत तर परग्रहांवरून पृथ्वीवर आलेल्या एलियन्सचे असल्याचा शपथेवर दावा केला. त्या मृतदेहांचे एक्स रे काढले गेले, ते काढतानाचे व्हिडीओ तयार झाले आणि ते जगभर व्हायरल झाले. हे मृतदेह आपल्याला २०१७ साली पेरू देशातल्या कुस्कू प्रांतात आढळल्याचे, मेक्सिकोच्या राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठात त्यांचे रेडिओकार्बन डेटिंग केले असता त्या किमान हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे आणि त्याचबरोबर त्यांचे डीएनए मानवी डीएनएशी अजिबात जुळत नसल्याचाही दावा करण्यात आला. यापैकी एका मृतदेहाच्या पोटात अंड्यासारखा अवयव असल्याने प्रचंड सनसनाटी झाली.

मोसान व त्याच्या सहकाऱ्यांचा हा असा पहिला दावा नाही. २०१५ मध्येही त्याने असाच दावा केला होता. नाझका लाईन्स या युनेस्को वारसास्थळाजवळ आढळलेली अशीच एक ममी त्याने एलियन्सची असल्याचे सांगितले. तिच्याही हाताला तीनच बोटे होती. प्रत्यक्षात, तो मृतदेह एका लहान बालकाचा निघाला. त्या मृतदेहाची दोन बोटे तोडण्यात आली होती, असे स्पष्ट झाले. जेमी मोसान हा छद्मविज्ञानाचा वापर करीत असल्याचा आरोप तेव्हापासून होतो. कदाचित असा अविश्वासाचा डाग असल्यामुळेच त्याने यावेळचा दावा शपथेवर केला असेल. तरीदेखील त्यावर विश्वास ठेवायला कुणी तयार नाही. जगभर एक गोष्ट निश्चित मानली जाते, की या ब्रह्मांडात आपण पृथ्वीतलावरील माणसे एकटेच नाही आहोत. वुई आर नॉट अलोन. त्या तिथे पलीकडे कुणीतरी नक्की आहे. फक्त ते कोण आहे, कोणत्या अवस्थेत आहे, याचा शोध काही लागलेला नाही. थोडाबहुत पुरावा आहे तो यूएफओ म्हणजे अनआयडेंटिफाइड फॉरेन ऑब्जेक्टस, अर्थात उडत्या तबकड्या म्हणविल्या जाणाऱ्या वस्तू दिसल्याचा. या तबकड्या अलीकडेच, विज्ञान व तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर दिसल्या असे नाही. आपल्या भारतात छत्तीसगडमधील बस्तरच्या कांकेर जिल्ह्यात चरामा परिसरात प्राचीन रॉक पेंटिंग्ज आहेत. ती किमान दहा हजार वर्षे जुनी असावीत, असे मानले जाते. त्यासाठी नैसर्गिक रंग वापरण्यात आल्यामुळे हजारो वर्षे ती जशीच्या तशीच आहेत आणि त्यामध्ये उडती तबकडी, तिच्यातून उतरणारा परग्रहावरील जीव चितारण्यात आला आहे. चंदेली आणि गोटीटोला या गावांच्या शिवारातील या शैलचित्रांची जगभर चर्चा आहे.

अशा उडत्या तबकड्या पाहिल्याचे शेकडो दावे करण्यात आले आहेत आणि अजूनही होतात. त्यांनी किंवा एलियन्सनी केवळ ॲस्ट्रोबायोलॉजिस्ट, यूएफओलॉजिस्टनाच वेड लावले असे नाही. वीस वर्षांपूर्वीचा ‘कोई मिल गया’ हा सिनेमा आणि त्यातील जादू नावाचा सूर्याच्या प्रकाशावर जीव खालीवर होणारा एलियन हा त्या मसाल्यातूनच आला. असो. गंभीर मुद्दा असा, की मेक्सिकोमधील या सनसनाटी दाव्यानंतर चोवीस तासांच्या आत नासाने यूएफओ किंवा यूएपी म्हणजे अनआयडेंटिफाइड अनामॉलस फिनॉमिनाविषयी एक अहवाल जारी केला. यूएफओ पाहिल्याचे शेकडो लोक सांगत असले तरी वैज्ञानिकदृष्ट्या त्याची पुष्टी करण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध नाही, असे सांगून या ३६ पानी अहवालात एलियन्स पृथ्वीवर उतरल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. तथापि, सूर्यमालेतून प्रवास करीत परग्रहावरील जीव आपल्या ग्रहावर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा सावध पवित्राही नासाने घेतला आहे. यूएपी घटनांविषयी अधिक डेटा संकलित करणे तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंगचा वापर करून त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र संचालक नेमण्याची घोषणा नासाने केली आहे. संचालकांचे नाव मात्र जाहीर केलेले नाही. भीती अशी आहे, की हा इतक्या गहन औत्सुक्याचा, कुतूहलाचा विषय आहे की त्या संचालकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. 
shrimant.mane@lokmat.com

Web Title: ...saying, 'Koi Mil Gaya' from the corpses of a thousand years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.