टंचाई समजता यावी, काळाबाजार मात्र नको!
By किरण अग्रवाल | Published: May 26, 2024 11:26 AM2024-05-26T11:26:45+5:302024-05-26T11:27:04+5:30
Agriculture : बियाणे टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नाराजीचा सूर उमटणे स्वाभाविक ठरले आहे.
- किरण अग्रवाल
पाणी टंचाईशी झगडणाऱ्या बळीराजाला आता खरीप हंगामाच्या तोंडावर बियाणे टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली असेल तर प्रशासनाचे किंवा कृषी विभागाचे नियोजन चुकल्याचेच म्हणावे लागेल. तेव्हा, ही टंचाई दूर करतानाच तिच्या नावाखाली काळाबाजार होत असेल तर तो रोखला जाणे प्राधान्याचे आहे.
मान्सून अंदमानात येऊन धडकल्याने बळीराजाची खरिपाच्या पेरणीची तयारी सुरू झाली आहे, मात्र प्रारंभातच बियाणे टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नाराजीचा सूर उमटणे स्वाभाविक ठरले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने केवळ इशारे देऊन चालणार नाही, तर टंचाईच्या निमित्ताने काळाबाजार करून स्वतःचे खिसे गरम करू पाहणाऱ्यांना ‘‘गार’’ करण्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.
यंदाच्या मान्सूनची वर्दी मिळून गेली असून, पाऊस समाधानकारक होण्याचे अंदाज वर्तविले गेले आहे, त्यामुळे गतकाळातील अवकाळी व दुष्काळाच्या वेदना दूर सारून नव्या आशेने बळीराजा खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे. अक्षरशः अंग भाजून काढणाऱ्या उन्हाचा चटका सहन करून शेतीची मशागत केली जात आहे, ऐन पेरणीच्या वेळी धावपळ होऊ नये म्हणून आतापासून बियाणे खरेदी करून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे; परंतु काही पिकांच्या वाणाचा तुटवडा प्राथमिक अवस्थेतच जाणवू लागल्याने भीती निर्माण होऊन स्वाभाविकच दुकानांवरच्या रांगा वाढू लागल्या आहेत.
यंदा कापसाचा पेरा वाढणार असल्याचे बोलले जात असून कापसाच्याच एका वाणाची टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे, त्यामुळे ते वाण उपलब्ध असणाऱ्या दुकानदारांना पोलिस संरक्षण घेण्याची वेळ आली आहे. कृषी केंद्र उघडण्यापूर्वीच भल्या पहाटेपासून बियाणे खरेदीसाठी रांगा लागत असून काही ठिकाणी तर रांगेतील नंबरवरून मारामारी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशास्थितीत खरेच संबंधित वाणाची टंचाई आहे, की हेतुत: साठा असूनही ते उपलब्ध करून दिले जात नाही, याची चौकशी कृषी विभागामार्फत होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांवर बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी येऊन चढ्या दराने संबंधित वाणाचे बियाणे खरेदी करत असल्याचा होणारा आरोप पाहता प्रशासनाने याकडे लक्ष पुरविणे अपेक्षित आहे.
मुळात बियाणांची टंचाई समजूनही घेता येणारी आहे, त्यातच खाजगी कंपनीकडून विक्रीला आणल्या गेलेल्या बियाणांबद्दल फार काही करता येणे शक्य नसते हेदेखील खरे; परंतु टंचाई दाखवून काळाबाजार होत असेल तर ते रोखणे प्रशासनाच्या हाती आहे. यासाठी कार्यालयात बसून केवळ इशारे देऊन चालणार नाही, तर भरारी पथकांद्वारे लक्ष ठेवावे लागेल. अकोला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याच संदर्भाने भरारी पथकांनी काय कारवाई केली, असा प्रश्न केला गेला. तेव्हा बळीराजाने अगोदरच निसर्गाचा फटका सहन केला आहे. अशात मनुष्यनिर्मित अडथळ्याला सामोरे जाण्याची वेळ ओढवणार असेल तर त्यासंबंधी रोष निर्माण झाल्याखेरीज राहणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे, एखाद्या बियाणाच्या वाणाची गुणवत्ता चांगली म्हणून त्याच्याच मागे धावण्यापेक्षा तशाच गुणवत्तेच्या अगर प्रतवारीच्या अन्य बियाणांचाही पर्याय म्हणून वापर करण्याचे धाडस बळीराजाला दाखवावे लागेल. निसर्गाचे चक्र अलीकडे बदलते आहे, तसे शेतीचा ''क्राफ्ट पॅटर्न''ही बदलतो आहे. पारंपरिकतेच्या पलीकडे जाऊन वेगळा विचार केल्याखेरीज व नवनवीन पिकांचे प्रयोग केल्याशिवाय उन्नती साधता येणार नाही. कापूस व सोयाबीनच्या शेतीत ड्रॅगन फ्रुट व हळद पीक घेऊन समाधानकारक कमाई करणारे काही आदर्श याच परिसरात आहेत. नव्या दमाच्या तरुण मंडळींनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
सारांशात, खरीप हंगामाच्या प्रारंभीच निर्माण झालेली बियाणांची टंचाई पाहता प्रशासनाने व कृषी विभागाने यातील काळा बाजाराची शक्यता पडताळून बघणे गरजेचे आहे. तसे आढळून आल्यास संबंधित गल्लाभरूंना वठणीवर आणण्यासाठी कडक पावले उचलावयास हवीत.