विखारी प्रचार...

By admin | Published: October 8, 2014 05:06 AM2014-10-08T05:06:18+5:302014-10-08T05:06:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार मोहिमेला उद्धव ठाकरे यांनी ‘अफझलखानाची स्वारी’ म्हटले असेल तर सख्खे भाऊच एकमेकांचे सख्खे वैरी होऊ शकतात हे वचन नव्याने खरे ठरणार आहे

Scattered promotion ... | विखारी प्रचार...

विखारी प्रचार...

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार मोहिमेला उद्धव ठाकरे यांनी ‘अफझलखानाची स्वारी’ म्हटले असेल तर सख्खे भाऊच एकमेकांचे सख्खे वैरी होऊ शकतात हे वचन नव्याने खरे ठरणार आहे. शिवसेना आणि भाजपा यांची मैत्री
२५ वर्षांची जुनी आणि मुरलेली आहे. वाजपेयी, अडवाणी, महाजन व मुंडे हे भाजपाचे आणि बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी व स्वत: उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते तिचे शिल्पकार आहेत. ‘हिंदुत्व हा आमच्या स्नेहाचा धागा आहे आणि त्याने आमच्यात ऐक्य घडविले आहे’ असेच दोन्ही बाजूंनी गेली दोन तपे महाराष्ट्राला व देशाला ऐकविले आहे. आता महाजन-मुंडे नाहीत, अडवाणी अडगळीत तर वाजपेयी निकामी आहेत. तिकडे बाळासाहेब काळाच्या पडद्याआड तर मनोहर जोशी अधिकारविहीन आहेत. आताची ‘मुठभेड’ उद्धव आणि मोदी यांच्यातील आहे. मोदींच्या जागी दुसऱ्या कोणत्याही प्रादेशिक नेत्याचे नाव येथे मुद्दामच घेतले नाही. कारण उद्धव ठाकऱ्यांची सेना प्रादेशिक असली तरी ते स्वत:ला राष्ट्रीय नेते समजतात आणि बाळासाहेबांच्या पश्चात हिंदुहृदयांचे सम्राटपण वंशपरंपरेने आपल्याकडे आले आहे असे मानतात. त्याचमुळे भाजपाचे काही दुय्यम दर्जाचे राष्ट्रीय पुढारी शिवसेनेशी चर्चा करायला मुंबईत आले तेव्हा त्यांच्याशी बोलणी करायला स्वत: न जाता उद्धवरावांनी आपले चिरंजीव आदित्य ठाकरे यांना पाठवून त्या पुढाऱ्यांना त्यांचा व आपलाही दर्जा दाखवून दिला. ते असे ‘राष्ट्रीय’ झाल्याने गडकरी-फडणवीस-खडसे किंवा तावडे यांची दखल घेणे त्यांना कमीपणाचे वाटत असणार. त्याचमुळे त्यांनी थेट मोदींवर निशाणा साधून त्यांना अफझलखान म्हटले असणार. मोदींना अफझलखान ठरविले की ते स्वत:ला शिवराय समजत असतील हे ओघानेच येणारे आहे. निवडणूक प्रचारात उतरताना कोणी कोणत्या पातळीपर्यंत खाली जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. अफझलखान हा दिल्लीहून आला नव्हता. त्याचा गुजरातशीही संबंध नव्हता. तो कर्नाटकातल्या विजापूर दरबारातला एक प्रमुख सरदार होता. शिवाजीचा बंदोबस्त करण्याच्या कामगिरीवर विजापूरच्या बेगमेने त्याची नियुक्ती केली होती. तो प्रतापगडावर राजांना भेटायला आला तेव्हा त्याचा हेतू शुद्ध नव्हता. राजांना मारण्याच्या वा पकडून नेण्याच्या इराद्यानेच तो तेथवर पोहचला होता. शिवरायांनी अत्यंत चतुराईने व चपळाईने त्याच्या पोटात वाघनखे खुपसून त्याचा कोथळा बाहेर काढला व त्याचा मुलगा फाजलखान याला पळवून लावून त्याचा पन्हाळ््यापर्यंत पाठलाग केला होता. उद्धव ठाकरे मोदींना अफझलखान म्हणतात तेव्हा त्यांनाही हा इतिहास पाठच असणार. मोदींनाही तो ठाऊक असणार. कालचा मित्र आजचा शत्रू झाला म्हणजे तो कुठवर पोहचतो याची मोदींसकट भाजपाच्या सगळ््या नेत्यांना चांगली कल्पना आली असणार. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत यांच्यातील हेवेदावे चालतील व नंतर ते पुन्हा एकत्र येतील असा भाबडा आशावाद मनाशी बाळगून असलेल्या युतीच्या सहानुभूतीदारांनी यातून बरेच काही शिकावे. जी भाषा ठाकरे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाठी वापरत नाहीत ती ते मोदी व भाजपासाठी वापरत आहेत हे भविष्यातल्या स्नेहाचे लक्षण नसून सख्ख्या दुष्मनीचे चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक थोर व्यंगचित्रकार होते. त्यांची चित्रे त्यांच्या टीकाविषयाचा कोथळा बाहेर काढणारीच असत. पण मोदींना अफझलखान किंवा भाजपाला विजापूरच्या बादशाहीची सेना समजणे त्यांच्याही मनात कधी आले नसणार. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या पुढे जाणारे की मागे थांबणारे हे यातून आपल्यालाही समजावे. असो, मोदींना त्यांनी अफझलखान म्हटले काय किंवा शाहिस्तेखान म्हटले काय, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला तो नेता महाराष्ट्रात यायचा काही थांबायचा नाही आणि तो तसा येत राहिल्याने सेनेचे सत्तेचे स्वप्नही तिच्याजवळ यायचे नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेला जवळचा वाटेल असा एकही पक्ष उद्धव ठाकरे यांच्या या भाषेने आता उरला नाही हेही यावेळी लक्षात यावे. रामदास आठवले दूर गेले आहेत, जानकर-शेट्टी आणि मेटे जवळ राहिले नाहीत, भाजपाला अफझलखानाची सेना म्हणून ठाकऱ्यांनी थेट शत्रुत्वाच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे. या स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्ष व काही अपक्ष उरणार आहेत. यातील कोणत्याही पक्षाशी शिवसेनेची नवी युती होणार नाही हे उघड आहे आणि सेनेला सत्तेजवळ नेऊ शकतील एवढे अपक्षही नव्या विधानसभेत असण्याची शक्यता कमी आहे. काही का असेना, या निमित्ताने आपण ज्यांना आपले पुढारी म्हणतो ती माणसे कोणत्या पातळीवरची आहेत एवढे जरी जनतेला समजले तरी तो या वादावादीचा एक लाभच मानला पाहिजे.

Web Title: Scattered promotion ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.