शाळेतील पॉर्नबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:44 AM2017-07-18T03:44:29+5:302017-07-18T03:44:29+5:30
पॉर्नबंदीसाठी शाळेच्या आवारात जॅमर बसवण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे़ विशेष म्हणजे ही माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे़ स्कूल
पॉर्नबंदीसाठी शाळेच्या आवारात जॅमर बसवण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे़ विशेष म्हणजे ही माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे़ स्कूल बसमध्येही जॅमर बसवण्याचा सरकारचा विचार होता़, पण ते शक्य नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले़ मात्र जॅमर बसवल्याने विद्यार्थी शाळेत पॉर्न साईट्स बघणारच नाही, असे ठामपणे सांगणे कठीण आहे़ मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांना दिलेल्या टॅबचा वापर गेम खेळण्यासाठी होतो, यामुळे टॅब देऊ नये, अशी विनंती काही पालकांनी नुकतीच केली आहे़ अभ्यासासाठी दिलेल्या टॅबमध्ये गेम आले कोठून? ते कोणी दिले? हा सर्व चौकशीचा विषय आहे़ टॅबमध्ये गेम येऊ शकतात़, तेथे पॉर्न व्हिडीओ येणे अशक्य अजिबात नाही़ त्यातही शाळेच्या आवारात जॅमर बसवण्याचा निर्णय स्वागतार्हच मानायला हवा. मात्र मुलांच्या हातात मोबाईल देणाऱ्या पालकांना कोण आवरणार? किंबहुना प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणाऱ्या मोबाईलमध्ये पॉर्न आहे की नाही हे कोण तपासणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे़ दिल्लीतील निर्भया व मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पॉर्नसाईट्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती, पण नंतर ती थंडावली. विद्यार्थ्यांना पॉर्न बघता येणार नाही, यासाठी काळजी घ्या, असा सूर काहींनी तेव्हा लावला होता. आता पुन्हा एकदा सरकारने शाळेच्या आवारात पॉर्नबंदीसाठी जॅमर बसवण्याचा निर्णय जाहीर केला आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत याची चर्चाही रंगेल़ मात्र हा विषय चर्चेपुरता न राहता, सरकारने शालेय मुलांना शाळेत पॉर्न बघता येणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी. यासाठी ठोस पावले उचलायला हवीत, एवढीच अपेक्षा़़़