शाळा बंद... आता गिरवा दूरचित्रवाणीवरच अभ्यासाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:59 AM2020-05-21T06:59:34+5:302020-05-21T06:59:48+5:30

मार्चमध्ये शाळा बंद झाल्यानंतर अनेक संस्थांनी आॅनलाईन शिक्षण दिले़ विविध अ‍ॅपचा उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची धडपड केली. परंतु, हा प्रयोग सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी यशस्वी होऊ शकत नाही, हे वास्तव आहे.

School closed ... now study lessons only on Girwa television | शाळा बंद... आता गिरवा दूरचित्रवाणीवरच अभ्यासाचे धडे

शाळा बंद... आता गिरवा दूरचित्रवाणीवरच अभ्यासाचे धडे

Next

- धर्मराज हल्लाळे (वृत्त संपादक, लोकमत, लातूर)

कोरोना आपत्ती असली तरी ती शिक्षणासाठी इष्टापत्ती ठरू शकेल का, असा विचार शिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी केला पाहिजे़ सध्या ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ ही मोहीम शिक्षण विभाग चालवीत आहे़ आॅनलाइन, डिजिटल माध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे़ मात्र, त्याला मर्यादा आहेत़ तुलनेने टी़ व्ही़ हे माध्यम अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचलेले आहे़ ज्यामुळे केंद्र सरकारने दूरचित्रवाणी संचाद्वारे पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय टाळेबंदीच्या काळात व्यवहार्य ठरेल़

मार्चमध्ये शाळा बंद झाल्यानंतर अनेक संस्थांनी आॅनलाईन शिक्षण दिले़ विविध अ‍ॅपचा उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची धडपड केली़ परंतु, हा प्रयोग सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांसाठी यशस्वी होऊ शकत नाही, हे वास्तव आहे़ मात्र, टाळेबंदीच्या काळात काहीच न करण्यापेक्षा शासन आणि काही संस्थांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचा आॅनलाईन अभ्यास करून घेतला़ कोणतेही तंत्रज्ञान आणले तरी शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येणार नाही़ ‘अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरम’च्या सर्वेक्षणानुसार केवळ २७ टक्के पालकांकडे इंटरनेटची सुविधा आहे़ त्यामुळे स्वाभाविकच आॅनलाईन डिजिटल माध्यमांना मर्यादा आल्या़ मात्र, त्यांच्याच सर्वेक्षणानुसार, ६३ टक्के विद्यार्थ्यांकडे टी़व्ही़ आहे़, ज्यामुळे टाळेबंदीच्या काळात दूरचित्रवाणीद्वारे शिक्षणाचा लाभ अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो़
केंद्र सरकारने १२ नव्या वाहिन्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र, निर्णयाची होणारी अंमलबजावणी आणि परिणामकारकता या दृष्टिकोनातून नव्या शैक्षणिक व्यवस्थेकडे पाहावे लागेल़ अधिकाधिक विद्यार्थ्यांचे हित साधले गेले पाहिजे़ अजूनही ३७ टक्के लोकांकडे टी़व्ही़ नाही़ अनेक भागात वीजपुरवठा खंडित होतो़ जिथे प्रत्यक्ष अध्यापनाद्वारेही ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह आहे, तिथे दूर शिक्षणाने कितपत आकलन होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित होणार आहेत़

देशात सीबीएसई, तसेच विविध राज्यांची शिक्षण मंडळे अस्तित्वात आहेत़ पहिली ते बारावीसाठी त्यांचे विविध अभ्यासक्रम आहेत़ त्या सर्वांसाठीच शिक्षण मंडळ, अभ्यासक्रमनिहाय दूरचित्रवाणीवर वेळ देता येईल़ सध्या ‘एनसीईआरटी’ची स्वयंप्रभा वाहिनी आहे़ अहमदाबाद, भोपाळ, दिल्ली, चेन्नई, मुंबई येथे स्टुडिओ आहेत़ पुण्याला बालभारतीचा स्टुडिओ आहे़ तिथे ध्वनिमुद्रण, छायाचित्रण होऊ शकेल़ आजची परिस्थिती असाधारण आहे़ शाळा कधी सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक देणे तूर्त शक्य नाही़ जुलैमध्ये काही परीक्षा होणार आहेत़ मात्र, शाळांमधील गर्दी आणखी काही महिने टाळावीच लागणार आहे़ त्यामुळे दूरचित्रवाणी संचाद्वारे शिक्षण हा परवडणारा, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारा पर्याय आहे़ इंग्रजी शाळांमधून शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची आर्थिक स्थिती आणि जिल्हा परिषद अथवा सरकारी शाळांमधील मुलांच्या पालकांची परिस्थिती यात तफावत आहे़ जे ऐपतदार आहेत ते इंटरनेट सुविधा अर्थात आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय सहज आत्मसात करू शकतील़ बहुतांश इंग्रजी शाळांनी तशी तयारीही केली आहे़ परंतु, ग्रामीण भागात दूरचित्रवाणी संचाद्वारे अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचता येईल़ अडचणींवर मात करावी लागेल़ तंत्रज्ञानाच्या मर्यादा मान्य करून शिक्षकांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे निरनिराळे प्रयोग करावे लागतील़ फार पूर्वीपासून अहमदाबादमधून ‘वंदे गुजरात’ ही शैक्षणिक वाहिनी सुरू आहे़ आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने स्वतंत्र वाहिनीची मागणी केली पाहिजे़

राज्यात वाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा सर्वदूर प्रसिद्ध आहे़ जिथे प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी आहे़, त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनावर भर दिला आहे़ शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावेत, ही अपेक्षा आहे़ त्याच धर्तीवर दूरचित्रवाणीवर मार्गदर्शन होईल. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करावे लागेल़ याचा अर्थ शिक्षकांचे काम थांबणार नाही़ दूरचित्रवाणी आणि विद्यार्थी यांच्यातील शिक्षक हाच दुवा राहील़

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण स्वीकारले आहे़ विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनाला, कौशल्याला अधिक वाव आहे़ बहुभाषिकतेचा उच्चार नव्या धोरणात आहे़ मात्र, प्रत्यक्ष अध्यापनात बहुभाषिक शिक्षकांची उणीव होती़ आता दूरचित्रवाणीवरील शिक्षणामुळे देशातील प्रमुख भाषा शिकण्याची संधी चालून आली आहे़ मात्र, जशी आज शाळाबाह्य विद्यार्थी ही समस्या आहे, तशी टी़व्ही़ पोहोचू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांची समस्या राहणार आहे़ ज्यांच्याकडे दूरचित्रवाणी संच आहे, त्या कुटुंबातील विद्यार्थी निर्धारित वेळेला अध्ययन करतील का? याकडे लक्ष ठेवण्यासाठी पालक सजग असावे लागतील़ त्यासाठी शिक्षण विभाग, शाळा व शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे़ विद्यार्थी शिक्षणासाठी टी.व्ही.समोर बसणे, त्यांना आकलन होणे हा चिंतनाचा व अभ्यासाचा विषय आहे़ परंतु, टाळेबंदीच्या काळात जिथे शाळाच बंद आहेत, अजून त्या किती काळ बंद राहतील ते सांगता येत नाही, अशा वेळी जो पर्याय उपलब्ध आहे, तो काटेकोरपणे अमलात आणणे हेच व्यवहार्य आहे़

Web Title: School closed ... now study lessons only on Girwa television

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.