मीमांसा पुरेशी नाही

By admin | Published: August 31, 2015 10:42 PM2015-08-31T22:42:35+5:302015-08-31T22:43:41+5:30

नुकत्याच जाहीर झालेल्या कृषीविषयक खानेसुमारीच्या आकडेवारीने महाराष्ट्रातील शेतीक्षेत्राचे जे चित्र उभे केले आहे, ते फारसे उत्साहवर्धक नाही पण ते तसे असणे धक्कादायक वा अनपेक्षितही नाही

The science is not enough | मीमांसा पुरेशी नाही

मीमांसा पुरेशी नाही

Next

नुकत्याच जाहीर झालेल्या कृषीविषयक खानेसुमारीच्या आकडेवारीने महाराष्ट्रातील शेतीक्षेत्राचे जे चित्र उभे केले आहे, ते फारसे उत्साहवर्धक नाही पण ते तसे असणे धक्कादायक वा अनपेक्षितही नाही. राज्यातील जमीनधारक शेतकरी कुटुंबांच्या संख्येत पाच वर्षांच्या कालावधीत दोन लाखांनी घट झाली असून आता ती १.३५ कोटी झाली आहे. दिवसेंदिवस शेती करणे हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरत चालल्याने वर्षानुवर्षे केवळ शेतीवर अवलंबून असलेले लोक उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करु लागले आहेत. जमीनधारक शेतकरी कुटुंबांपैकी ९० लाख कुटुंबे अल्प वा अत्यल्प भूधारक आहेत व केवळ ४५ लाख कुटुंबांकडेच मध्यम वा मोठ्या आकाराच्या जमिनी आहेत आणि त्यांच्यावरच राज्यातील कृषी उत्पादनाची सारी भिस्त आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि रस्ते, धरणे, रेल्वे यासारखी विकासात्मक कामे यामुळे शेतजमिनीचा संकोच होत चालला आहे व ही प्रकिया अव्याहत सुरुच राहणार आहे. राज्यातील उपजाऊ जमिनीमध्येही घट होताना दिसते आहे. पाच वर्षापूर्वी दोन कोटी हेक्टर्स असलेल्या लागवडीखाली जमिनीत आता तीन लाखांनी घट झाली आहे. या आकडेवारीच्या आधारे जी काही मीमांसा केली जाते आहे, ती मात्र पुरेशी नाही. राज्यातील सिंचनाखालील जमिनीचे प्रमाण केवळ १४ टक्के असल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यात स्वारस्य वाटत नाही, असे एक मीमांसा म्हणते. मुळात देशातील एकूणच शेती पावसाच्या पाण्यावर जास्ती करुन अवलंबून आहे. हा पाऊसदेखील लहरीच आहे. आज जे १४ टक्के सिंचन आहे, ते काही वर्षांपूर्वी पाच टक्क््यांच्या आतच होते. खते, आधुनिक बियाणे, कीडनाशके, दळणवळणाची साधने, वीज या साऱ्यांचा अभावच होता. तरीही लोक सुखाने शेती करीत होते. संपन्न नसतील पण आत्महत्त्याही करीत नव्हते. त्यामुळे आजच्या शेतीच्या स्थितीमागे एक महत्वाचे सामाजिक कारणदेखील आहे. एकत्र वा संयुक्त कुटुंब रचना हे देशाच्या विशेषत: ग्रामीण भागातील समाजाचे एक व्यवच्छेदक लक्षण होते. कुटुंब नियोजनाचे तत्त्वदेखील रुजले गेले नव्हते. तरीही भल्यामोठ्या एकत्र कुटुंबांची गुजराण शेतीवर होत होती. कारण त्यांच्यापाशी अखंड, सलग आणि आकारविल्हे मोठी जमीन असे. कालांतराने विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. छोट्या कुटुंबाची संकल्पनाही स्वीकृत होत गेली. पण प्रत्येक पिढीमागे वाटण्या होत होत जमिनीचा आकार संकुचित होत गेला. अल्प वा अत्यल्प भूधारकांची संख्या ९० लाखांच्या घरात जाण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. दिवसेंदिवस शेती करणे कठीण होत चाललेले असतानाही काही बडे भांडवलदार याच व्यवसायातून संपत्ती निर्माण करीत आहेत. तुरळक प्रमाणातील सामूहिक शेतीचे प्रयोगदेखील यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळेच विद्यमान दुरवस्थाची केली जाणारी मीमांसा अपुरी वाटते.

Web Title: The science is not enough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.