स्कॉटलँड : अपु-या स्वप्नाची अखेर

By Admin | Published: September 24, 2014 05:42 AM2014-09-24T05:42:40+5:302014-09-24T05:42:40+5:30

स्कॉटलँडने ब्रिटनसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या सार्वमतात स्वतंत्र देशासाठी मोहीम चालविणारे स्टॉकिश नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेते अलेक्स सालमंड यांनी आपला पराभव मान्य केला

Scotland: The End of the Dream | स्कॉटलँड : अपु-या स्वप्नाची अखेर

स्कॉटलँड : अपु-या स्वप्नाची अखेर

googlenewsNext

- निरंकार सिंग
ज्येष्ठ स्तंभलेखक

स्कॉटलँडने ब्रिटनसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या सार्वमतात स्वतंत्र देशासाठी मोहीम चालविणारे स्टॉकिश नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेते अलेक्स सालमंड यांनी आपला पराभव मान्य केला. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्कॉटलँड सोबतच इंग्लँड, वेल्श आणि उत्तर आर्यलँड या भागांना अधिक स्वायत्तता देण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रेट ब्रिटन हा देश युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड या नावानेही ओळखला जातो. एकेकाळी या देशाचे एक चतुर्थांश जगावर राज्य होते. भारतावरही थोडेथोडके नव्हे, तर तब्बल दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले. साम्राज्यवादी मनोवृत्तीचा हा देश गेल्या काही वर्षांपासून आपला प्रभाव गमावत चालला आहे. आज तो पूर्वीसारखा शक्तिशाली नाही. ऐतिहासिक, भौगोलिक आणि जातीय दृष्टीनेही ग्रेट ब्रिटन अजिबात एकसंध राहिलेला नाही. २० टक्के लोकसंख्या स्कॉट, वेल्श, आयरिश आणि अल्स्टरी आहे. हे सर्व लोक इंग्रजी बोलतात; पण म्हणून सारेच स्वत:ला इंग्रज समजतात असे नाही. आर्यलँडमधून बळजबरीने ग्रेट ब्रिटनमध्ये टाकलेल्या अल्स्टर (उत्तर आर्यलँड)चे लोक मायदेशी जाण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
स्कॉटलँडच्या जनतेने नुकत्याच झालेल्या सार्वमतात एकीचा कौल दिला. ब्रिटनपासून हे लोक दूर जाऊ इच्छित नाहीत. ४५ विरुद्ध ५५ अशी टक्केवारी राहिली. अर्थात, स्कॉटलँडचे लोक ब्रिटनसोबत राहण्यास सहजासहजी तयार झाले असतील अशातला भाग नाही. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी केलेली धडपड कामाला आली. तसे पाहिले तर इंग्लंड, स्कॉटलँड आणि वेल्श मिळून ग्रेट ब्रिटन तयार झाला होता. सुरुवातील स्कॉटलँड हा स्वतंत्र देश होता. १७०७ मध्ये स्कॉटलँडने इंग्लंडसोबत जाण्याचा निर्णय घेतला. युनायटेड किंग्डम आॅफ ग्रेट ब्रिटन असे या देशाचे नाव पडले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्तेचा दबदबा कमी झाला. स्कॉटलँडवाल्यांच्या मनात स्वातंत्र्याची कल्पना चमकली ती तेव्हापासून. त्यासाठी आंदोलनंही झाली. पण जमले नाही. ब्रिटनपासून फुटून निघावे, असे त्यांना का वाटत होते?
इतर युरोपिय देशांच्या तुलनेत ग्रेट ब्रिटनने फारआधी भांडवलवादाची कास धरली होती. अठराव्या शतकात ते प्रमुख व्यापारी राष्ट्र असल्याचा दावा करीत होते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला जगाचा एक चतुर्थांश भाग त्याच्या ताब्यात होता. दबंगगिरीच्या जोरावरच त्याने हे केले; पण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटन पार कोलमडून गेले. शक्तिशाली भांडवलशाही देश म्हणून अमेरिका उदयास आली. त्या धक्क्यातून ब्रिटन अजूनही सावरलेला नाही. जपान आणि जर्मनीसारखे देश त्याच्या पुढे निघून गेले आहेत. वसाहती हातच्या गेल्याने शोषणातून येणारा पैसा बंद झाला. लष्करी खर्च वाढला त्या तुलनेत ब्रिटनचे उत्पन्न वाढले नाही. नाटो संघटना आणि इतर साम्राज्यवादी आक्रमक गटांचा सदस्य असल्याने ग्रेट ब्रिटन आजही आपल्या अर्थसंकल्पातला फार मोठा वाटा लष्करावर खर्च करतो.
उद्योगधंद्यात मागे पडल्याने विदेशी बाजारपेठेत ब्रिटिश उत्पादनांची स्पर्धा क्षमता घटली. तयार मालाच्या निर्यातीतही तो घसरला; पण आयात कुठेही कमी झाली नाही. उलट सारखी वाढत होती. याचा परिणाम असा झाला की, विदेश व्यापार नुकसानीत गेला. सत्ता दुबळी झाल्याने देशांतर्गत आंदोलनं होऊ लागली. ब्रिटिश कामगार पगारवाढीच्या मागणीसाठी रस्त्यावर येऊ लागले आहेत. आर्थिक मंदी, बेरोजगारी, चलनफुगवटा हे प्रश्नं आज ब्रिटनला सतावत आहेत. ग्रेट ब्रिटन हा तसा मोठा देश नाही. अवघ्या अडीच लाख चौरस किलोमीटरच्या या देशाची लोकसंख्या ६ कोटी २० लाख आहे. म्हणजे जर्मन प्रजासत्ताकाएवढा. मात्र, फ्रान्सपेक्षा लहान. ग्रेट ब्रिटनमध्ये सर्व भागाचा समतोल विकास झालेला दिसत नाही. स्कॉटलँड हा मागासलेला भाग आहे. ब्रिटिश अर्थव्यवस्था ही बरिचशी विदेश व्यापारावर अवलंबून आहे. बहुतेक उद्योग निर्यातीसाठी माल बनवतात. इथे शेतीही होते; पण कमी प्रमाणात. शेतमालाची निम्मीच गरज पूर्ण होते. ब्रिटिश अर्थव्यवस्थेवर खऱ्या अर्थाने खासगी भांडवलादारांचेच प्रभुत्व आहे. १८० बड्या कंपन्यांच्या हाती ब्रिटिश उद्योग आहे. यातल्या
२० कंपन्या जगातल्या टॉपच्या शंभर कंपन्यांमध्ये मोडतात. आॅटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक, तेल आणि रसायन उद्योगात या कंपन्या आहेत. त्यांच्यात बराचसा अमेरिकेचाच पैसा लागला आहे.
एवढा जुना देश असूनही ब्रिटनचा विकास समान आणि समतोल झालेला नाही. काही भागात झगमगाट आहे, तर काही भागात अंधारसदृश परिस्थिती. बहुतेक उद्योग ग्रेट लंडनच्या भागात आहेत. लंडन ही या देशाची राजधानी. या देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि व्यापारी हालचालींचे मुख्य केंद्रही लंडनच आहे. मँचेस्टरमध्ये कापड उद्योग आहे. नैसर्गिक संसाधनांमध्ये स्कॉटलँड समृद्ध आहे. ब्रिटनचे ९० टक्के तेल उत्पादन स्कॉटलँडमधून होते. स्कॉटलँड म्हणा किंवा वेल्श किंवा अल्स्टर म्हणा, औद्योगिक दृष्टीने मागासलेले हे गरीब प्रदेश आहेत. त्यांनी हवा बदलवण्याचे स्वप्न पाहिले. पण ते अर्धवट राहिले....

Web Title: Scotland: The End of the Dream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.