समुद्र-मंथन

By admin | Published: January 31, 2017 05:01 AM2017-01-31T05:01:21+5:302017-01-31T05:01:21+5:30

भारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य

Sea-churning | समुद्र-मंथन

समुद्र-मंथन

Next

- डॉ. भूषणकुमार उपाध्याय

भारतीय पौराणिक कथेमध्ये ‘समुद्रमंथन’ हा एक महत्त्वाचा अध्याय आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्र व सर्व देव बलहीन झाले. दानवराज बळीने पृथ्वी व स्वर्गावर आपले राज्य प्रस्थापित केले. त्यानंतर सर्व देव भगवान विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी देवांना राक्षसांच्या साहाय्याने समुद्रमंथन करून अमृत प्राशन करण्याचा सल्ला दिला. अमृत प्राशन केल्यानंतर अमरत्व प्राप्त करून देव असुरांवर विजय प्राप्त करतील, असे भगवान विष्णूंनी देवांना सांगितले. त्यासाठी मंदराचल पवर्ताचा रवि आणि नागराज वासुकीचा दोरीच्या रूपात उपयोग केला गेला. भगवान विष्णू यांनी कासवाचे रूप धारण करून मंदराचल पवर्ताला आधार दिला. समुद्रमंथनातून चौदा रत्नं बाहेर आली. सर्वात प्रथम हलाहल हे विष निघाले. ज्याला प्राशन करून भगवान शंकरांनी ब्रह्मांड वाचविले. त्यानंतर कामधेनु, कल्पवृक्ष, कौस्तुभमणी, ऐरावत हत्ती, उच्चै:श्रवा घोडा, अप्सरा व वारुणी (मद्याची देवता) इ.रत्ने बाहेर पडली. सर्वात शेवटी अमृतकलश हातात घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृतासाठी देवता व राक्षसांमध्ये युद्ध झाले. भगवान विष्णू यांनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसांना भ्रमीत करून अमृत प्राशन केले. त्यामुळे सर्व देव पुन्हा शक्तिशाली झाले. समुद्रमंथनाची व्याख्या विद्वानांनी अनेक प्रकारे केली आहे. त्या सर्व व्याख्या व समुद्रमंथनाचा उद्देश लक्षात घेता असे म्हणता येईल की समुद्र मानवी मनाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे समुद्र अनंत व अगाध आहे, त्याचप्रमाणे मानवी मनालाही समजणे कठीण आहे. जसे समुद्रात सतत असंख्य लाटा उठत असतात, तसेच मनातसुद्धा क्षणाक्षणाला असंख्य विचार उत्पन्न होत असतात. ‘देव’ चांगल्या विचारांचे प्रतीक असून, ‘राक्षस’ वाईट विचारांचे. दोन्ही प्रकारचे विचार माणसाच्या मनात सतत घोळत असतात. या मंथनाचा उद्देश अमरत्व किंवा शाश्वत आनंद प्राप्त करणे हा आहे. समुद्रमंथनात दाखविलेला मंदराचल पर्वत हा गंभीरता व एकाग्रतेचे प्रतीक असून, एकाग्रतेशिवाय मानवी मनात खोलवर आपण पोहचू शकत नाही. कासव हा संयमाचे प्रतीक आहे. तसे पाहिले तर संयमाशिवाय मनाचे मंथनही होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे नागराज वासुकीला बांधून मंदराचल पवर्ताला हलवले गेले, त्याचप्रमाणे साधक जीवन ऊर्जेच्या साहाय्याने एकाग्रतेला धरून ठेवतो. जर ऊर्जेची कमतरता असेल तर एकाग्रता राहणार नाही. अशाप्रकारे मनाच्या मंथनामध्ये साधकाला खूप वेदना होतात. हलाहल विष हे याच त्रासाचे प्रतीक आहे. हा त्रास सोसूनच साधक भगवान शंकराप्रमाणे होतो. जसजशी मन मंथनाची साधना पुढे जाते, तसतशा अनेक सिद्धी रत्नांच्या रूपात प्राप्त होतात आणि शेवटी त्याला अमृत प्राप्त होते. अर्थातच साधक आपल्या शाश्वत रूपाला प्राप्त करतो.

Web Title: Sea-churning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.