शोध श्रीखंड्याचा

By Admin | Published: March 30, 2016 03:00 AM2016-03-30T03:00:18+5:302016-03-30T03:00:18+5:30

जनतेच्या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच

Search | शोध श्रीखंड्याचा

शोध श्रीखंड्याचा

googlenewsNext

- सुधीर महाजन

जनतेच्या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच भरला जात नाही हेच खरे दु:ख आहे.

संतपरंपरेतील एकनाथांकडेच व्यवहारचातुर्य, तसेच प्रशासनाचे कसब होते. शिवाय सर्वांठायी ईश्वर पाहून त्यांनी सामाजिक उत्थानाचा प्रयत्नही त्यांनी इतर संतांप्रमाणे वारंवार केला. ते गाढवाला गंगाजल पाजणे असो, की पितरांच्या श्राद्धात अस्पृश्यांना बोलावणे. माणसाप्रती प्रेम आणि ईश्वरावरील अढळ निष्ठा यामुळेच श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपाने नाथांच्या घरी घरगडी म्हणून राहिला. पडेल ती कामे केली. ज्याक्षणी याचा साक्षात्कार नाथांना झाला, त्यावेळी त्यांना दु:ख झाले ते श्रीकृष्णाला कष्टाची कामे करावी लागली याचे. पुढे नाथांच्या निर्वाणानंतर गावातील नाथांच्या वाड्यातील रांजण नाथषष्ठीला भरण्याची परंपरा सुरू झाली. तुकाराम बीजेपासून हा रांजण भरण्यास सुरुवात होते आणि नाथषष्ठीला तो भरतो. त्यासाठी शेकडो लोक गोदावरीतून पाणी आणतात. ज्याच्या घागरीने तो भरतो त्याला श्रीखंड्याचा मान मिळतो. त्याचा सत्कार केला जातो. त्याच्या ठायी वारकरी श्रीकृष्णाला पाहतात.
याही वर्षी नाथषष्ठीचा सोहळा झाला. नाथांचा रांजण भरला. औरंगाबादच्या श्रीराम कुलकर्ण्यांना श्रीखंड्याचा मान मिळाला; पण तो भरण्यासाठी वारकऱ्यांना आटापिटा करावा लागला. याचे कारण गोदावरी कोरडीठाक पडली आहे. जायकवाडीसारखे धरण अगदी काखेला असताना नाथांच्या पैठणमध्ये ही परिस्थिती. रणरणत्या उन्हात वारकऱ्यांची एक प्रकारे घेतलेली परीक्षाच होती, असे म्हणायला हरकत नाही. नाथांच्या काळात गोदावरीला महामूर पाणी होते. म्हणून श्रीखंड्यापुढे पाणी शोधण्याचा प्रश्न नव्हता; पण आज तो प्रश्न पडला. पाण्याअभावी रांजण भरतानाच त्रास झाला नाही, तर संपूर्ण यात्रेवरच या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचे सावट पडले आहे. एकनाथ आणि श्रीखंड्या हे भक्त आणि भगवंत यांच्या नात्याचे एक सुंदर उदाहरण आहे. मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईने घेरले आहे. ११ पैकी ७ मोठे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. जायकवाडी आणि माजलगाव धरणात मृत साठा उरला आहे. येलदरीमध्ये ५/६ टक्के पाणी आहे. ७३५ मध्यम व लघुप्रकल्पांपैकी ६० टक्के धरणे कोरडीठाक आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढणार. सध्या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्यासाठी १६०० टँकर धावतात. मेमध्ये हा आकडा २५०० वर पोहोचू शकतो.
टँकर काय वाढविता येतील; पण ते भरण्यासाठी पाणी असायला हवे. टंचाई निवारणासाठी सरकारने साडेतीनशे कोटींची तरतूद केली. पाण्यासारखा पैसा वाहणार; पण पाणी मिळणार नाही, ही अवस्था आहे. गेल्या दोन महिन्यात पाण्यासाठी ३१ जणाना जीव गमवावा लागला. लातूर शहराची अवस्था बिकट आहे. पाण्यावरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून १४४ कलम लावले. याचा अर्थ पाणी येथे स्फोटक बनले आहे. लोकानी पाण्याचे टँकर लुटू नयेत, पाणी मिळविण्यासाठी जमाव बेभान होऊ नये यासाठी सरकारलासुद्धा या पातळीवर उपाय योजावे लागले यावरून परिस्थिती किती नाजूक आहे याचा अंदाज येतो. लातूर हे शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. या शहरात शिक्षणासाठी लाख-सव्वा लाख विद्यार्थी आलेले आहेत. त्यांनासुद्धा येथे थांबता येणार नाही अशी स्थिती आहे. पाण्यासाठी यापेक्षा आणखी कोणती परिस्थिती निर्माण होणार?
नाथांचा रांजण भरण्यासाठी श्रीखंड्याच्या रूपात प्रत्यक्ष भगवंत आला होता. नाथ हे सामान्य माणसाचे प्रतीक समजले तर आज राज्यकर्त्यांना श्रीखंड्या समजावे लागेल. कारण या श्रीखंड्यांच्या सत्तेचा आधार जनतेची सेवाच असतो आणि आता श्रीखंड्यांची संख्याही मोठी आहे. हे सर्व श्रीखंडे कोरडा पडलेला जनतेचा रांजण कसा भरणार? कारण या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच भरला जात नाही हेच खरे दु:ख. या जनतेच्या रांजणाला श्रीखंड्या खरंच मिळणार का?

Web Title: Search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.