ऋत आणि सत्य
By Admin | Published: March 2, 2017 12:03 AM2017-03-02T00:03:23+5:302017-03-02T00:03:23+5:30
जीवन ही सत्यदर्शनाची आणि सत्यशोधनाची एक महान प्रयोगशाळा आहे.
जीवन ही सत्यदर्शनाची आणि सत्यशोधनाची एक महान प्रयोगशाळा आहे. विचारतत्त्वाने सांगितलेले सत्यदर्शन हे प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरविण्यासाठी ही जीवनाची प्रयोगशाळा प्राचीन कालापासून ऋषीमुनी, तत्त्ववेत्ते, समाजचिंतक, साधुसंत आणि विचारवंतांनी अखंड कार्यरत ठेवली आहे. सत्य आणि असत्य यांचेसारखे वाग्युद्ध जुंपलेले असते. भगवद्गीतेत भगवंताला ‘सत्य’ या शब्दावरून नेमके काय सांगायचे आहे? श्रीकृष्णाची सत्य वचनाची प्रतिज्ञा ही ‘ऋ त’ या कल्पनेवर आधारलेली आहे. साधारणपणे ऋत म्हणजेच सत्य असे संबोधले जाते. पण ऋत आणि सत्य या दोन संकल्पना आहेत. ऋत शब्दाचा अर्थ आहे विश्वव्यापक नियम.
विश्वातली व्यवस्था, प्रतिष्ठा, नियमन यांना कारणीभूत असलेले आणि सकल सृष्टीच्या आधी उत्पन्न झालेले तत्त्व म्हणजे ‘ऋत’ होय. आकाशातल्या असंख्य तारका, प्रात:काली उगवणारा सूर्य, एका मागून एक येणारे दिवस-रात्र, ऋतूंचे कालचक्र, सृष्टीतील सुसंबद्धता, सुसूत्रता या सर्व घटनांच्या मागे नित्य-सत्य दडलेले आहे. म्हणजे या घटना घडणारच आहेत आणि त्या नित्य आहेत. हे त्रिवार सत्य आहे. सत्याची ही संकल्पना म्हणजे ‘ऋत’ होय. उपनिषदांमध्ये ऋताच्या सर्व कल्पना या सत्याच्या परिभाषेत मांडल्या आहेत. प्राचीन ऋषींनी उपनिषदकाळात अंतिम सत्य आणि त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी ‘ऋत’ या तत्त्वाचाच आधार घेतला आहे.
‘‘ऋतं सत्यं परं ब्रह्म’’ या उपनिषदातील वचनाप्रमाणे ऋत हे सत्य आणि ब्रह्म म्हणजे अविनाशी म्हणजेच न बदलणारे असे आहे. शाश्वत धर्म आणि विश्वनियामकत्व हे ‘ऋत’ या संकल्पनेचे मूळ आहे. जीवनात ऋताचे पालन करणे म्हणजे सत्य होय. संत एकनाथांनी भागवतात ‘ऋत’ ही संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. ‘‘ऋत म्हणजे ते ऐसे येथ। सत्य वाचा जे श्रोत्यांचे हित। तेही दु:खसंबंधरहित। ऋत निश्चित या नाव।।’’ (नाथ भागवत १९/४६४)
दु:खसंबंधरहित म्हणजे कोणताही पूर्वीचा स्वार्थ, आपलेपणा किंवा इतरही गोष्टींपासून पूर्णपणे त्रयस्थ अशी हित करणारी जी सत्यवाणी तिलाच ‘ऋत’ असे म्हणतात. ऋत हा शब्द आता प्रचारात राहिलेला नाही पण ‘अनृत’ हा शब्द कधी कधी वापरात येतो. भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचा धर्म हा ऋताधिष्ठित आहे. खरे की खोटे यापेक्षा परिणामकारक सत्य काय आहे हे सांगणारे - ‘ऋताधिष्ठित सत्य’ पालनासाठी भगवान श्रीकृष्ण उभा ठाकला आहे. मनुष्याच्या अंत:करणातील नैतिक सत्य आणि विश्वशक्तीच्या अस्तित्वाला आणि व्यापाराला प्रेरक असणारे सत्य एकच असून तेच ‘ऋत’ होय. तेच विश्वात ब्रह्मरूपाने वावरते आहे. ते सर्वव्यापी आहे हे समजणे म्हणजे सत्यशोधन होय.
-डॉ. रामचंद्र देखणे