राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्यामागचे रहस्य!

By संदीप प्रधान | Published: March 6, 2021 05:28 AM2021-03-06T05:28:00+5:302021-03-06T08:58:35+5:30

मास्कचे मराठीत भाषांतर ‘मुखपट्टी’; राज यांना ते मुस्कटदाबीसारखे वाटत असावे. मीच (का म्हणून) जबाबदार?- असा प्रश्नच त्यांना सरकारला विचारायचा असावा! 

The secret behind not wearing mask of Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्यामागचे रहस्य!

राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्यामागचे रहस्य!

Next

- संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत

कोरोना परवडला; पण मास्क (मुखपट्टी) नको, अशी गेल्या वर्षभरात अस्मादिकांची अवस्था झाली आहे. राज्यातील सरकारने ‘मीच जबाबदार’ अशी गर्जना करून हात झटकल्याने कोरोना आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता आम्हाला मास्कची समृद्ध अडगळ वागवणे अनिवार्य झाले आहे. परंतु, रस्त्यातून झपाझप पावले टाकताना, रेल्वेचे जिने चढताना तोंडावर मास्क लावल्याने आमच्या छातीचा भाता तारसप्तकातील सूर लावल्यासारखा वरखाली होतो. 


तोंडावर मास्क लावल्यावर उच्छ्वास सोडताच आमच्या चष्म्यावर उष्ण हवेचा दाट पडदा तयार होतो. अशावेळी पाऊल वाकडं पडण्याचा मोठा धोका असतो. परवाच्या दिवशी रस्त्यात अशाच चष्म्यावरील दाट पडद्यामुळे आम्ही कुणावर तरी धडकलो. तेव्हा आम्हाला ‘मेरे महबूब’मधील ‘जब तेरा हुस्न मेरे इश्क से टकराया था और फिर राह में बिखरे थे हजारों नगमे,’ या पंक्तीची आठवण झाली होती. परंतु, समोरच्या व्यक्तीने कोमल आवाजात हासडलेल्या शिव्या ऐकल्यावर तोंडावरील मास्क भिरकावून देण्याची अतीव इच्छा झाली होती. मास्कच्या या जाचातून सुटका व्हावी, याकरिता दररोज देवाचा धावा करीत असताना दोन-चार दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या सोहळ्यात तोंडावर मास्क परिधान न केलेले राज ठाकरे आम्ही पाहिले. पत्रकारांशी बोलतांना राज म्हणाले, ‘मी पहिल्यापासून मास्क लावत नाही आणि तुम्हालाही सांगतो...’ राज यांच्या या वक्तव्याने आमच्या पायात दहा हत्तींचे बळ आले. आम्ही मास्क दूर कोपऱ्यात भिरकावला. मास्कचे मराठीत भाषांतर ‘मुखपट्टी’ केल्याने बहुधा राज यांना ते मुस्कटदाबीसारखे वाटत असेल व मुख्यमंत्रीपदावरील ‘दादू’लाही आपली मुस्कटदाबी करू देणार नाही, असा निर्धार त्यांनी केलेला असावा. कोरोनाने महाराष्ट्रात डोके वर काढले, तेव्हा राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज हे मास्क न घालताच गेले होते. त्या वेळी मंत्रालयाच्या दरवाजात त्यांना मास्कबाबत विचारले असता, “आपण मास्क घालत नाही,” असेच त्यांनी ठणकावून सांगितले होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर पत्रकार परिषदेत राज हे मास्क वापरत नसल्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष पत्रकारांनी वेधले असता, त्यांनी कोपरापासून दोन्ही हात जोडले व राज यांना शुभेच्छा दिल्या. काल-परवा राज हे मुख्यमंत्र्यांना भेटायला विधान भवनात जाणार होते. मात्र, अर्ध्या रस्त्यातून त्यांना घरी परत जावे लागले, अशा बातम्या आल्या.

विधान भवनात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जायचे झाले, तर मास्क घालावा लागेल; आणि प्रवेशद्वारावर कोरोनाची टेस्ट करून घ्यावी लागेल, असे कळल्याने राज यांनी घरीच बसणे पसंत केले, अशी चर्चा रंगली. मागे राज हे रोरोसेवेतून रायगड जिल्ह्यात जात असताना मास्क परिधान न केल्याबद्दल त्यांच्याकडून एक हजार रुपये दंड वसूल केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अर्थात, राज यांनी त्याचा इन्कार केला व मास्क न लावल्याबद्दल माझ्याकडून कोण दंड वसूल करणार, असा प्रतिसवाल केला. राज यांना अयोध्येचा दौरा करायचा आहे. परंतु, तेथेही हीच अडचण असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांनी कोरोना टेस्ट अनिवार्य केली असून, तिकडे मास्क वापरण्याखेरीज गत्यंतर नाही. (नाहीतर, “लाव रे तो व्हिडिओ” अशी आरोळी योगीच ठोकतील) समजा, राज लवाजमा घेऊन उत्तर प्रदेशात गेले व तेथे त्यांना दंडबिंड केला आणि त्यामुळे मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला, तर त्याचे पडसाद उत्तर प्रदेश व महाराष्ट्र दोन्हीकडे उमटायचे, ही भीती आहे. 

काही महिन्यांपूर्वी राज यांनी पहाटे उठून सायकल चालवण्याचा, जिम करण्याचा निर्धार केला होता. मात्र, दोन-चार महिन्यांनंतर तो त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्धारासारखा बारगळला. मास्क न लावण्याचा निर्धार असाच बारगळेल, अशी अपेक्षा आहे. राज यांनी मास्कवर फुली मारल्यावर त्यांच्या पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी तर विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याकरिता कोरोना वाढल्याची आवई उठवली गेल्याचा दावा केला. म्हणजे, कोरोना हे मिथक असल्याचेच मनसेने उक्ती-कृतीतून दाखवले आहे. मात्र, मास्क परिधान न करता आम्ही रस्त्यावर फिरल्याने आमची गचांडी पोलिसाने धरली व आमच्याकडून दंड वसूल केला. राज हे मास्क परिधान करीत नाहीत, याकडे आम्ही पोलिसाचे लक्ष वेधले असता तो हसत म्हणाला, “तू तर पोलिसालाही घाबरतोस! राज हे कोरोनाच्या भयमुक्तीचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत!”

Web Title: The secret behind not wearing mask of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.