आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर रॅशेलच्या मृत्यूचं रहस्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2023 08:06 AM2023-10-28T08:06:59+5:302023-10-28T08:07:17+5:30
न्यूझीलंडसाठी या क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव म्हणजे रॅशेल चेज.
आपला फिटनेस, आपली तब्येत, आपली बॉडी उत्तम असावी, आपण फिट असावं, दिसावं आणि चार-चौघांनी आपल्याकडे पाहून ‘वॉव, तुझा फिटनेस काय जबरी आहे’, असं म्हणावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यात अर्थातच तरुणाईचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. जिममध्ये घाम गाळणारी आजची पिढी पाहिली की त्याचं प्रत्यंतर येतं.
संपूर्ण जगात अमली पदार्थंचं प्रमाण बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात सर्वाधिक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पूर्वीच्या काळी बॉडीबिल्डिंग हे फक्त परुषांचंच क्षेत्र मानलं जायचं, पण काळ बदलला, तसं महिलाही या क्षेत्रात उतरल्या. आता महिलांसाठीही जगभरात आणि अगदी अंतरराष्ट्रीय पातळीवरही बॉडीबिल्डिंग स्पर्धा होतात. अनेक महिला, तरुणी त्यात भागही घेतात.
न्यूझीलंडसाठी या क्षेत्रातलं महत्त्वाचं नाव म्हणजे रॅशेल चेज. लहानपणापासूनच तिला फिटनेसची आवड होती. ही आवड नंतर बॉडीबिल्डिंगमध्ये रूपांतरित झाली. देशातल्या महिलांसाठीच्या सर्व नामांकित बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धांमध्ये तिनं भाग घेतला आणि त्यातल्या बऱ्याचशा तिनं जिंकल्याही. एवढंच काय ‘ऑलिंपिया’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिलांच्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेतही ती सहभागी झाली. संपूर्ण जगभरातील पुरुष आणि स्त्री बाॅडीबिल्डर्ससाठी ही स्पर्धा अतिशय मानाची समजली जाते. न्यूझीलंडतर्फे या स्पर्धेत उतरणारी ती पहिली महिला बाॅडीबिल्डर.
रॅशेलनं आपल्या देशात महिलांमध्ये बॉडीबिल्डिंगची नुसती आवडच रुजविली नाही, तर ती त्यांच्यासाठी रोल मॉडेल ठरली. केवळ महिलांसाठीच नव्हे, तर पुरुषांसाठीही. दिसायलाही ती सुंदर आणि फिटनेस इन्फ्लूएन्सर! सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोअर्स आहेत!
पण नुकतीच अचानक तिच्या मृत्यूची बातमी आली आहे! यामुळे तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना मोठा धक्का बसला आहे. पण त्याहून मोठं गूढ आहे, ते म्हणजे रॅशेलचा मृत्यू नेमका कशानं झाला? त्याबाबत मात्र अद्याप तरी कोणालाच काहीही माहीत नाही. याबाबत प्रत्येक जण फक्त आपापल्या परीनं शंकाकुशंकाच व्यक्त करीत आहे. कोणी म्हणतं अति व्यायामामुळे तिचा मृत्यू झाला, कोणी म्हणतंय, अंमली पदार्थांचा डोस जास्त झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला, तिच्या काही चाहत्यांनी तर घातपाताचाही संशय व्यक्त केलाय, पण खरं काय, ते अजूनही बाहेर आलेलं नाही. रॅशेलचा मृत्यू नेमका कशानं झाला, याची पोलिसही चौकशी करताहेत..
आपल्या आईचा मृत्यू झालाय, याची खबर रॅशेलच्या मुलीनंच सुरुवातीला दिली. रॅशेल सोशल मीडिया स्टार म्हणून फेमस होती. एकट्या फेसबुकवरच तिचे १५ लाख फॉलोअर्स होते. फिटनेसच्या संदर्भातल्या पोस्ट ती कायम सोशल मीडियावर शेअर करायची. या टिप्स फार उपयुक्त आणि महत्त्वाच्या वाटल्यानं चाहत्यांमध्ये ती चांगलीच लोकप्रिय होती. फिटनेस फ्रिक असलेल्या रॅशेलला वयाच्या केवळ ४१ व्या वर्षी मृत्यू यावा, ही वस्तुस्थितीच अजून अनेकांच्या पचनी पडलेली नाही. रॅशेल संपूर्ण जगभरात इतकी लोकप्रिय होती, पण तिच्या अडचणी आणि संघर्षांचाही तिचा स्वत:चा म्हणून एक अतिशय खडतर असा प्रवास होता. ती सिंगल मदर होती. तिला पाच मुलं आहेत.
२००१ मध्ये बाॅडीबिल्डर क्रिस चेज याच्याशी तिचा विवाह झाला. सुरुवातीला दोघांचे संबंध चांगले होते, पण त्यानंतर मात्र या संबंधांत कटुता आली आणि त्यानंतर ते विभक्तही झाले. चौदा वर्षांच्या सहवासानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिचा नवरा क्रिसही अंमली पदार्थांचा शौकिन होता, असं म्हटलं जातं. एवढंच नाही, अंमली पदार्थांच्या तस्करीतही त्याचा हात होता. या आरोपांत तो रंगेहाथ पकडलाही गेला आणि त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली.
त्यानंतर रॅशेल सोशल मीडियावरही महिलांना कायम सचेत करायची.. नात्यांत राहा, पण आपली नाती नेहमी तपासून पाहा. नात्यांच्या आहारी जाऊ नका. प्रेम ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, प्रेमात पडा, पण तरीही त्यात ‘व्यवहार’ पाहा, म्हणजे सावध राहा.. नाहीतर तुमच्या आयुष्याची केव्हा मूठमाती होईल, हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही..
‘ऑक्सिजन’साठी शेवटचं फोटोशूट’
‘सिंगल मदर’ म्हणून मुलांना मोठं करण्यात आपल्याला किती कष्ट लागलेत, हे रॅशेलच्या बोलण्यातून आणि लिहिण्यातून कायम जाणवायचं. निदान मुलांसाठी तरी तुम्ही कोणताही अविचारी निर्णय घेऊ नका, असं तिचं कायम सांगणं असायचं. फेसबुकवर तिनं टाकलेली शेवटची पोस्ट होती ‘ऑक्सिजन’ या मासिकाच्या कव्हरसाठी तिनं केलेलं फोटो शूट! आपल्या आयुष्यात अनेक वेळा, अनेक मासिकांच्या कव्हरवर ती झळकली. हे छायाचित्र त्यातलं शेवटचं!