सुरक्षेचा पोरखेळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2016 09:03 PM2016-03-08T21:03:58+5:302016-03-08T21:03:58+5:30
मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला
मुंबई शहरावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्याच धर्तीवर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असून भारत-पाक सीमा ओलांडून दहा आत्मघातकी मानवी बॉम्बच्या एका पथकाने भारतात प्रवेश केला आहे, अशी गुप्त वार्ता जेव्हां भारतीय सुरक्षा यंत्रणेला समजली तेव्हां सारे संबंधित सतर्क होणे अगदी स्वाभाविक होते. यंत्रणेला जे संभाषण ऐकावयास मिळाले त्यात ‘गुजरात’चा उल्लेख होता. दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल नासीरखान जांझुआ यांनीदेखील काही अतिरेकी भारतात घुसण्याची शक्यता असल्याच्या गुप्तवार्तेला दुजोरा दिला. सोमवारी देशभर साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीच्या धार्मिक उत्सवाच्या वेळीच घातपात होईल असे गृहीत धरले गेले. परिणामी संपूर्ण देशभर तर सतर्कतेचा इशारा दिला गेलाच पण विशेषत: गुजरात राज्यास अधिकच सतर्क केले गेले. त्या राज्यात येणाऱ्या वा राज्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनाची अगदी कसून तपासणी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात सोमवारी देशात कुठेही गडबड झाली नाही आणि महाशिवरात्रीचा सण नेहमीप्रमाणेच साजरा झाला. दक्षता घेणे केव्हांही चांगलेच. खरे पाहाता घातपाताचा इशारा मिळाल्यानंतर ज्या पद्धतीची तपासणी केली जाते तशी एरवीदेखील करायला काही हरकत नाही. पण तसे सहसा होत नाही. परंतु आता संबंधित सुरक्षा यंत्रणांनीच जी शक्यता व्यक्त केली आहे ती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था म्हणजे पोरखेळ तर नव्हे अशी शंका कोणाच्याही मनात आल्याशिवाय राहाणार नाही. सुरक्षा यंत्रणांनी ऐकलेल्या संभाषणातील गुजरात म्हणजे प्रत्यक्षात गुजरात राज्य नव्हे तर त्याच नावाचे पंजाबातील एक खेडे असावे असा तर्क या यंत्रणांनी बोलून दाखविला आहे. पंजाब सीमेपासून थोड्याच अंतरावर असलेल्या या गुजरात गावात एक प्राचीन शिवमंदीर आहे आणि तिथे शिवरात्रीला म्हणे मोठी गर्दी उसळत असते. गेल्या वर्षभरात ज्या गुरुदासपूर येथून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी केली गेली त्या ठिकाणापासूनही हे गाव अगदी जवळच आहे. अर्थात तिथेही बंदोबस्त होताच आणि कुठलीही संशयास्पद बाब तिथे आढळली नाही. अर्थात अशी सुरक्षा व्यवस्था देशातील बहुतेक सर्वच शिवमंदिरांना पुरविली गेली होती. पण यातील खरा मुद्दा वेगळाच आहे. दक्षता घेतली म्हणूनच काही झाले नाही या समाधानात सुरक्षा यंत्रणेने राहायला काही हरकत नव्हती. परंतु तसे न करता गुजरात या नावावरुन गोंधळ झाला असे जाहीर करुन एकप्रकारे त्यांनी त्यांचाच वेंधळेपणा जगजाहीर केला असेही यातून म्हणता येऊ शकते. शिवाय पाकिस्तानबाबतचा आजवरचा अनुभव लक्षात घेता तिकडून प्राप्त माहितीवर किती विश्वास ठेवायचा हाही एक नेहमीचाच प्रश्न असतो.