सुरक्षा महत्त्वाची की...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:14 AM2017-07-19T04:14:19+5:302017-07-19T04:14:19+5:30
चालत्या रेल्वेत चढणे गुन्हा नाही, असा काहीसा अनाकलनीय वाटणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. एक प्रवासी रेल्वे
चालत्या रेल्वेत चढणे गुन्हा नाही, असा काहीसा अनाकलनीय वाटणारा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. एक प्रवासी रेल्वे स्थानकावर टुथब्रश खरेदीसाठी उतरला. दरम्यान, रेल्वेगाडी सुरू झाली. चालत्या रेल्वेगाडीत बसण्याच्या प्रयत्नात तो पाय घसरून खाली पडला. त्यामुळे त्याचा डावा पाय मांडीपासून कापावा लागला. असे हे प्रकरण होते. वरकरणी पाहिले तर यात त्या प्रवाशाने काही गुन्हा केला नव्हता. न्यायालयाने नेमक्या याच बाबीवर बोट ठेवून त्याला रेल्वेकडून नुकसानभारपाई मिळवून दिली. येथे पीडिताला पैसा मिळाला ही चांगलीच गोष्ट झाली पण, रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखून दिलेल्या नियमांचे काय? यावर मात्र न्यायालयाने भाष्य केले नाही. प्रत्येक आस्थापनात सुरक्षेच्या दृष्टीने नियम केले जातात. चालत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे, डब्याच्या छतावरून प्रवास करणे, डब्याच्या पायरीवर उभे राहून प्रवास करणे रेल्वेने निषिद्ध मानले असून त्यासाठी फौजदारी शिक्षेची तरतूदही केली आहे. पण अनेक प्रवासी या नियमांना जुमानत नाहीत. काही अतिउत्साही तरुण तर स्टंटबाजीच्या नादात आपल्यासोबतच इतरांचेही जीव धोक्यात टाकताना दिसतात. एकट्या मुंबईत रेल्वेशी संबंधित अपघातांत दरवर्षी तीन हजारांहून अधिक बळी जातात असा अहवाल आहे. न्यायालयानेच जर नियम न पाळणाऱ्यांना अभय दिले तर बेशिस्त लोकांना रोखणार कोण? योगायोग म्हणजे हा निर्णय झाला त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दहिहंडीच्या संदर्भात एक महत्त्वाचा खुलासा केला. पाच वर्षांच्या मुलाला एवढ्या उंचावर चढविण्यात कसले आले आहे साहस अशा शब्दात कोर्टाने दहिहंडीच्या आयोजकांना आणि त्याचे समर्थन करू पाहणाऱ्या महाराष्ट्र शासनाला चांगलेच फटकारले. दहिहंडीचे मोठमोठे मनोरे रचविले जातात. सर्वात वर लहान मुलांना ठेवले जाते. अशा या ‘साहसी’ खेळात मोठ्यांचे मनोरंजन होते आणि त्या लहान मुलांचा जीव टांगणीला लागतो. हा साहसी क्रीडा प्रकार आहे असे काहीसे सांगून सरकार त्याचे समर्थन करू पाहत आहे. पण न्यायालयाने येथे सुरक्षा महत्त्वाची मानली हे येथे उल्लेखनीय आहे. त्याच्याच नागपूर खंडपीठाने मात्र चालत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे गुन्हा नाही असा निकाल देऊन प्रवाशांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. आता या निकालाच्या अनुषंगाने रेल्वेनेही जाहीर करून टाकावे, ‘चालत्या गाडीत बसणे, उतरणे किंवा टपावर बसून प्रवास करणे गुन्हा नसून ते साहसाचे काम आहे. यात दुर्दैवाने काही घडलेच तर आम्ही नुकसानभरपाई देण्यास बांधील आहोत.’