‘दंगल’ पाहून गोल्डनगर्लला आठवला भूतकाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 08:10 AM2024-07-31T08:10:30+5:302024-07-31T08:11:16+5:30

ऑलिम्पिक पदकापर्यंतचा चेनने केलेला प्रवास हा आमीर खानच्या दंगल चित्रपटाशी नातं सांगणारा आहे.

seeing dangal movie golden girl remember the past | ‘दंगल’ पाहून गोल्डनगर्लला आठवला भूतकाळ!

‘दंगल’ पाहून गोल्डनगर्लला आठवला भूतकाळ!

चेन शी सीन हिने काही वर्षांपूर्वी दंगल चित्रपट पाहिला. तैवानच्या चेनने हा चित्रपट चिनी सबटायटलमधून बघितला. तो बघताना चेनला आपलंच आयुष्य आपण पडद्यावर बघतोय असं वाटून गेलं. चित्रपटातील  गीता फोगटचं कुस्तीत सुवर्णपदक मिळवणं, देशाचं राष्ट्रगीत वाजणं, गीताच्या डोळ्यातले ते आनंदाश्रू बघून चेन तिच्या भूतकाळात निघून जायची.  दंगल चित्रपटासोबतचं तिचं हे वैयक्तिक नातं तिने पॅरिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जगजाहीर केलं आणि चेन पुन्हा प्रकाशात आली. २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकसमध्ये तैवानच्या चेनने तायक्वांदो खेळात आपल्या देशासाठी पहिलं सुवर्णपदक मिळवलं होतं. तिचं हे पदक मिळवणं तैवानसाठी ऐतिहासिक होतं. हे पदक मिळवून तिने तैवानचा ७२ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला होता.  ऑलिम्पिक पदकापर्यंतचा चेनने केलेला प्रवास हा आमीर खानच्या दंगल चित्रपटाशी नातं सांगणारा आहे.


चेन वीई हसीउंग हे चेनचे वडील. चेनच्या वाट्याला वडिलांच्या प्रेमापेक्षा प्रशिक्षकाची शिस्तच जास्त आली. तिचे वडील तायक्वांदो प्रशिक्षक होते. ते खासगी प्रशिक्षण केंद्र चालवायचे. चेन जेव्हा पाच वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला तायक्वांदोचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. केंद्रातील इतर खेळाडूंच्या तुलनेत चेन पटापट शिकत गेली आणि स्पर्धांमध्ये चमकत गेली.  

१९९४ मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी तिने  ब्रिटन वर्ल्डकप स्पर्धा जिंकली. दोन वर्षांनंतर  ब्राझील वर्ल्डकपही जिंकला. चेनने स्पर्धांमागून स्पर्धा जिंकाव्यात, त्यासाठी जराही वेळ न दवडता कसून सराव करावा अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पण वडिलांची कठोर शिस्त, त्यांची जरब, खेळातील परिश्रमाबाबत असलेला त्यांचा आग्रह याला चेन कंटाळली होती. तिला थोडी उसंत हवी असायची; पण वडिलांना ते मान्य नव्हतं. सरावाच्या बाबतीत फारच काटेकोर असणारे वडील आपल्यावर अन्याय करत आहेत,  ते आपल्याला आपलं तारुण्य जगू देत नाही याची जाणीव झालेल्या चेनचे तिच्या वडिलांशी सतत खटके उडू लागले. इतके की वयाच्या अठराव्या वर्षी चेनने बंड पुकारलं. खेळाच्या जाचाला कंटाळून ती घरातून पळून गेली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर तायक्वांदोमध्ये आपली ओळख तयार केलेली चेन अचानक या खेळातून गायब झाली.

आपली माणसं सोडून एका नवख्या जगात चेनने पाऊल टाकलं. चेन रस्त्याच्या कडेला पानाच्या ठेल्यावर उभी राहून पानसुपारी विकू लागली. एकेकाळची जगज्जेती खेळाडू  रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सना आपल्या पान स्टाॅलवरून पानसुपारी घेण्यासाठी आग्रह करू लागली. 

चेनच्या वडिलांनी तिला शोधण्यासाठी जंगजंग पछाडलं. ‘बाळा जिथे कुठे असशील तिथून परत ये, आम्ही तुझी वाट पाहत आहोत’ यासारख्या जाहिराती माध्यमांमध्ये दिल्या, मात्र चेन सापडली नाही. पण केलेल्या कृतीचा पश्चात्ताप वाटून अडीच वर्षांनी चेन आपल्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी परत आली. ती घरी आली तो तायक्वांदोमध्ये पुन्हा परतण्याचा निश्चय करूनच. वडिलांच्या कठोर प्रशिक्षणाखाली चेन पुन्हा तयार होऊ लागली. मधला खूप काळ वाया गेल्याने तो भरून काढण्यासाठी ती दुप्पट सराव करू लागली. तिचं पुन्हा खेळात परतणं हे इतर खेळाडूंना हास्यास्पद वाटत होतं. पण चेनला मात्र खेळात परतण्याचा पूर्ण विश्वास होता. 

२००० च्या सिडनी ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत केवळ तिच्या रेकाॅर्ड्समध्ये सातत्य नाही म्हणून तिला अपात्र ठरवलं गेलं. त्यावर्षी पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये तायक्वांदो या खेळाचा औपचारिकरीत्या समावेश केला गेला होता. चेन दुखावली गेली; पण नाउमेद झाली नाही. १९९९च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, त्यापाठोपाठ २००१ च्या पूर्व आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवत तिने आपला जगज्जेतेपदाचा रुतबा परत आणला आणि २००४ च्या अथेन्स ऑलिम्पिकसाठी तिची निवड झाली.  या स्पर्धेची तयारी करताना चेनने वडिलांच्या सांगण्यावरून पुरुष खेळाडूंसोबत सराव केला. या सरावादरम्यान तिला खूप लागायचं, वेदना व्हायच्या, अनेकदा तर रक्तही निघायचं, पण चेन थांबली नाही. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये चेनने सुवर्णपदक मिळवलं आणि तिच्या संघर्षाची यशस्वी सांगता झाली.

चेन आता कुठे आहे?

पंचविशीनंतर चेनने या खेळातून निवृत्ती घेतली. प्रसिध्दी, लोकप्रियता यापासून चेनला खूप दूर जायचं होतं.  तैवानमधल्या ग्रामीण भागात क्सिनफेंग येथे तिने स्वत:चं तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे. तिचं ऑलिम्पिक पदक तिच्या वडिलांच्या घरी आहे. ते तिने तिथेच ठेवलं.  तिला आता आपल्या विद्यार्थ्यांनी पदक जिंकावं, असं वाटतं. चेनच्या वडिलांनी जे स्वप्न तिच्यासाठी पाहिलं होतं तेच स्वप्न ती आता आपल्या विद्यार्थ्यांसाठी बघते आहे.
 

Web Title: seeing dangal movie golden girl remember the past

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.