झडते वाद पाहुया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 08:49 PM2018-07-17T20:49:26+5:302018-07-17T20:50:12+5:30
धुळ्यातील मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावरुन भाजपाच्या दोन लोकप्रतिनिधींमध्ये पुन्हा एकदा वाद झडू लागले आहेत. ‘पळती झाडे पाहुया...मामाच्या गावाला जाऊया’ हे धुळकरांचे अनेक वर्षांपासून स्वप्न असले तरी याविषयावर जेवढे चर्वितचर्वण सुरू आहे ते पाहून ‘झडते वाद पाहुया...’ या भूमिकेपर्यंत धुळेकर आलेले आहेत.
धुळ्यातील मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावरुन भाजपाच्या दोन लोकप्रतिनिधींमध्ये पुन्हा एकदा वाद झडू लागले आहेत. ‘पळती झाडे पाहुया...मामाच्या गावाला जाऊया’ हे धुळकरांचे अनेक वर्षांपासून स्वप्न असले तरी याविषयावर जेवढे चर्वितचर्वण सुरू आहे ते पाहून ‘झडते वाद पाहुया...’ या भूमिकेपर्यंत धुळेकर आलेले आहेत. २०१४ च्या मोदी लाटेने भाजपाला केंद्र आणि राज्यात सत्तारुढ केले. मोठ्या अपेक्षांनी जनतेने भाजपाच्या पदरात मतांचे दान दिले. मोठी स्वप्ने दाखविण्यात आली होती. परंतु ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरत नसल्याने जनतेबरोबरच लोकप्रतिनिधींनाही नैराश्याने ग्रासले आहे. त्यामुळे एकमेकांवर दोषारोप करीत असताना विकास कामात खोडा घालण्याची कामेदेखील बिनदिक्कतपणे सुरू आहेत. धुळ्यात भाजपामध्ये आमदार अनिल गोटे विरुध्द केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल अशी उभी फूट पडली आहे. या वर्षाच्या शेवटी जिल्हा परिषद आणि महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर २०१९ चे वर्षदेखील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचेच राहणार आहे.या पार्श्वभूमीवर विकास कामांच्या चर्चेने वेग घेतला आहे. आमदार अनिल गोटे यांचे संपूर्ण लक्ष धुळे शहरावर केंद्रित आहे. पोलीस ठाण्याची इमारत, जिल्हा ग्रंथालयाची इमारत, ४६ मोकळ्या जागांना संरक्षक भिंती, साक्री रस्त्याचे रुंदीकरण, पांझरा नदीच्या दोन्ही किनाऱ्याला रस्ते आणि झुलता पूल या कामांना त्यांनी सुरुवात केली आहे. परंतु पांझरा किनाºयावरील अतिक्रमित मंदिरे, दर्गा हटविण्याच्या कामाला विरोध झाला. रस्त्याच्या कामाला विरोध म्हणून हरित लवादाकडे धाव घेण्यात आली. विकास कामांना होत असलेल्या विरोधाने गोटे संतप्त झाले असून राष्ट्रवादी, शिवसेना आणि स्वपक्षीय भामरे, रावल यांच्याविरोधात त्यांनी आरोपांची मालिका सुरु केली आहे. धुळे महापालिकेत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची सत्ता आहे. धुळ्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या दादा भुसे यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षातील उत्साही आणि इच्छुक नेते आणि कार्यकर्ते गोटे यांच्या कारवायांना प्रत्युत्तर देत असतात. मात्र भाजपाची मंडळी त्यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करीत असे. परंतु अलिकडे डॉ.सुभाष भामरे हे पत्रकार परिषदा घेऊन गोटे यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेऊ लागले आहेत. मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग म्हणजे ‘फेकमफाक एक्सप्रेस’ असल्याचे गोटे यांनी म्हणताच, भामरे यांनी पुढील महिन्यात धुळे ते नरडाणा या रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया निघणार असल्याची घोषणा केली. सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांसाठी भरीव निधी आणल्याचा दावा भामरे यांनी केला आहे. वाद झडत असताना प्रत्यक्ष कामेदेखील दिसायला हवी, अशीच धुळेकरांची अपेक्षा आहे.