निवड कौशल्य, मतदारांची कसोटी अन् उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 03:25 AM2019-05-17T03:25:47+5:302019-05-17T03:28:10+5:30

अनेक पर्यायातून एक चांगला पर्याय निवडायचा म्हणजे मतदारांची कसोटी लागणारच.

Selection skill, test and indifference of voters | निवड कौशल्य, मतदारांची कसोटी अन् उदासीनता

निवड कौशल्य, मतदारांची कसोटी अन् उदासीनता

Next

- सविता देव हरकरे (उप वृत्तसंपादक)

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघा आठवड्यावर येऊन ठेपलाय. अखेरच्या टप्प्यातील मतदान तेवढं व्हायचंय. या रणधुमाळीत गेला महिनाभर सारा देश ढवळून निघाला. विविध पक्ष आणि त्यांचे नेते आपलंच प्रॉडक्ट कसं चांगल्या दर्जाचं हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. अर्थात हे करीत असताना दुसरे किती वाईट हे सांगण्यावरच त्यांचा अधिक भर होता. एकमेकांवर लांच्छनं लावली जात होती. या सर्व चिखलफेकीत योग्य निवड करणं म्हणजे कौशल्यच.

अनेक पर्यायातून एक चांगला पर्याय निवडायचा म्हणजे मतदारांची कसोटी लागणारच. तसे बघता निवड करण्याची ही प्रक्रिया माणसांसाठी अजिबातच नवी नाही. समजायला लागल्यापासून माणूस तेच तर करत आलाय. निवड या शब्दाची ओळख त्याला अगदी लहान वयातच होत असते. अलीकडच्या काही पिढ्यांना तर ही कला जन्मत:च अवगत असते. दोन-चार महिन्यांतच त्यांच्या आवडीनिवडी सुरू झालेल्या असतात. आईच्या कुशीतलं बाळ न बोलताच तिच्याकडून आपल्या आवडीनिवडी पूर्ण करून घेत असतं. बोलायला लागल्यावर तर विचारायलाच नको. याचं छोटसं उदाहरण द्यायचं झाल्यास, सर्वच चॉकलेट्स चवीला गोड असतात पण हाती दिलेलं कुठलंही चॉकलेट मूल खात नाही. एकंदरीत काय तर निवडीचा हा अधिकार आम्ही आपल्या बालवयापासूनच वापरत असतो.

सुरुवातीच्या काही वर्षात यामध्ये पालकांचा सहभाग असतो, हे मान्य. पण एरवी तेवढा आई-वडील निवडीचा पर्याय वगळला तर जीवनातील प्रत्येक गोष्टीची निवड माणूस करीत असतो. सुखमय आणि चांगल्या आयुष्यासाठी आम्ही पदोपदी निवडीबाबत जागरूक असतो आणि या निवडीवरच बरेचदा आमचं यशापयश, सुख-दु:ख अवलंबून असतं. विशेषत: हे जेव्हा समजायला लागतं तेव्हा ही निवड करताना माणूस अधिक सजग होतो, अधिक प्रगल्भ होतो.

माणसाचे शिक्षण, अनुभव, जाणीव यांचीही या निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असते. दैनंदिन जीवनातच बघा ना. पहाटे उठल्यापासून निवड सुरू होते. अगदी कुठले कपडे घालायचे, कुठल्या रंगाचे घालायचे इथपासून जेवणात काय असायला हवं हे ठरवणं म्हणजे निवड प्रक्रियेचाच एक भाग नव्हे का? निवडी दोन प्रकारात मोडतात. काही निवडी या बरेचदा सहजपणे फारसा विचार न करता केल्या जातात. पण काही निवडींबाबत प्रत्येक जण गंभीर असतो, सतर्क असतो. लग्नासाठी जीवनसाथीची निवड असो वा डॉक्टरची निवड फार चिकित्सकपणे केली जाते. आजकालच्या काळात ध्येयाची निवड हा तर व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वाचा विषय झालाय.

कदाचित आपल्या देशात सर्वाधिक प्रबोधन केला जाणारा हा एकमेव विषय असावा. काही लोक याही बाबतीत गंभीर नसतात ती गोष्ट वेगळी. तसं बघता ध्येयाची निवड हा प्रत्येक व्यक्तीचा खासगी अधिकार. पण अनेकदा त्याच्या या निवडीवर दृश्यअदृश्य शक्तींचा प्रभाव आपल्याला जाणवतो. त्यामुळे बरेचदा ध्येय निश्चित करताना आपली आवड, कौशल्य, क्षमता, ज्ञान यांचा विचार न करता पैसा, मान प्रतिष्ठेला महत्त्व दिल्या जातं आणि अशात चुकीची निवड केली की जीवनावर त्याचे अत्यंत विपरीत परिणाम होताना दिसतात. निवडीतील चुकांची मोठी किंमत माणूस आयुष्यभर मोजत असतो. म्हणूनच तर या निवडीला मानवी आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे.

आम्ही घेतलेल्या लहानसहान निर्णयांचा केवळ आमच्या जीवनावरच नव्हे तर आमचे आप्तेष्ट आणि व्यवस्थेवरही दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे निवड मग ती कुठलीही असो जबाबदारीने आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवूनच करायची असते. एका अर्थी निवड ही एक अग्निपरीक्षाच असते. पण त्याचा सराव आपण बालवयापासून करत असल्याने तिचे भय वाटत नाही. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमाने आपले संसदेतील प्रतिनिधी निवडण्याची परीक्षा कोट्यवधी भारतीयांनी दिली आहे. दुर्दैवानं असंख्य लोकांना अद्याप या निवडीचं महत्त्व कळलेलं नाही, हे मतदान न करणाऱ्यांची संख्या बघितल्यास लक्षात येतं. या देशातील जवळपास निम्म्या लोकांनी या निवडणुकीत मतदान केलेलं नाही. एखादी आवडणारी गोष्ट आपल्याला मिळतेच असं नव्हे. पण म्हणून ती निवड नाकारणं हा अन्यायच नव्हे का? याचा विचार मतदान न करणाऱ्यांनी निश्चितच केला पाहिजे.

लहानपणापासून अगदी प्रत्येक लहानसहान गोष्टीत आम्ही आपल्या निवडीला प्राधान्य देत असतो. निवडीचा आपला हक्क बजावत असतो. मग जिथे देशाच्या व्यवस्थेचा प्रश्न असतो, तिथेच या अधिकाराचा वापर करताना मागेपुढे का बघितलं जातं? याला लोकांची बेपर्वाई म्हणायचं की उदासीनता? कारण निवड हा शब्द त्यांच्यासाठी नवा नसल्याने त्यांना याची समज नाही असंही म्हणता येणार नाही, ते त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. पण त्यांनी याबाबत जागरूक नक्कीच व्हायला हवं. गेल्या महिनाभर कुणाला मतदान करायचं यासाठी नागरिकांमध्ये जे विचारमंथन सुरू होतं ते आता संपलंय. प्रतीक्षा निकालाची आहे. या देशातील नागरिकांनी कुणाची निवड केलीय आणि त्याचे येथील जनजीवनावर काय परिणाम होणार हे निकट भविष्यात कळेलच!

Web Title: Selection skill, test and indifference of voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.