आत्मघातकी अण्णा बॉम्ब !
By सचिन जवळकोटे | Published: November 25, 2018 07:38 AM2018-11-25T07:38:13+5:302018-11-25T07:44:55+5:30
लगाव बत्ती
‘इंद्रभवन’नं आजपावेतो अनेक राजकीय पिढ्या बघितलेल्या. यातल्या प्रत्येक पिढीत एकतरी जिवंत बॉम्ब होताच; मात्र अशा कैक बॉम्बना खिशात टाकून यशस्वी राजकारण करणाऱ्या नेत्यांचे दिवस संपले. आता ‘आत्मघातकी बॉम्ब’चा जमाना आलाय.. हे स्वत: तर उद्ध्वस्त होतातच; आजूबाजूच्यांनाही कामाला लावतात.
सोलापूरच्या ‘इंद्रभवन’नं आजपावेतो जेवढे कलंदर मेंबर बघितले, तेवढेच बिलंदर कार्यकर्तेही अनुभवले. कधीकाळी विकासासाठी धडपडणाºया खºया समाजसेवकांच्या स्पर्शानं इथल्या खुर्च्या जशा मोहरल्या, तशाच क्रिमिनल नेत्यांच्या किळसवाण्या कृत्यांमुळं शरमल्याही. पूर्वी बायोडाटामध्ये ‘समाजकारण हा पेशा’ असं कौतुकानं लिहिणाºया कार्यकर्त्यांची फौज मागं पडली; आता ‘राजकारण हाच धंदा’ असं बिनधास्तपणे सांगणाºया नेत्यांची टोळी निर्माण झाली.
प्रत्येक कामात टक्का मागूनही पोट भरेना. तेव्हा ही कामंच आपल्या बगलबच्च्यांच्या नावावर घेणारे ‘खादीतले कंत्राटदार’ पालिकेत घुसले. ‘मेंबर’च्या डोक्यात ‘टेंडर’ हाच शब्द रात्रन्दिवस वळवळू लागला. आपल्या लोकांनी विकासासाठी पाठविलंय, हे विसरून ‘पैसा कमविण्याचं उत्तम साधन’ एवढ्या एकाच दृष्टिकोनातून काहीजण ‘इंद्रभवन’कडं पाहू लागले. अनेकांच्या घरात ‘लक्ष्मी’ पाणी भरू लागली; मात्र या पाठोपाठ आलेली ‘अवदसा’ पांढºया खादीतल्या सभ्यतेचा ढोंगी मुखवटा टराटरा फाडू लागली. यातलाच एक प्रकार म्हणजे सुरेशअण्णांचा तथाकथित विषप्रयोग.
महापालिकेतल्या ‘पॉलिटिकल क्राईम’चा हा घाणेरडा चेहरा प्रथमच सोलापूरकरांसमोर आला. यापूर्वीही एकमेकांना आयुष्यातून उठविण्याचे अनेक प्रयोग झालेले; मात्र ते एवढे जीवघेणे नव्हते. एखाद्याला मृत्यूच्या दारात पाठविण्याएवढे नव्हते. तब्बल अकरा महिने मृत्यूशी झुंजणाºया सुरेशअण्णांच्या पाटील घराण्यासाठी हा अत्यंत कसोटीचा काळ होता; मात्र त्यातून अण्णा सुखरूप बाहेर आलेत. लवकरात लवकर ते बरे होवोत. स्वत:च्या पायानं चालत पुन्हा पालिकेत रुबाबात येवोत हीच सदिच्छा; मात्र त्यांनी पोलिसांकडं जबाबात दिलेल्या स्फोटक मुद्द्यांची राजकीय चिरफाड करणं तर अत्यंत गरजेचं. तेही केवळ सोलापूरकरांच्या भल्यासाठी.. मग काय...लगाव बत्ती.
जग्गूअण्णांना विचारा, ‘कुठं-कुठं खाल्लं ?’
अण्णांनी ‘आजपर्यंत आपण कुठं कुठं जेवलो,’ हे सांगितलंय. त्यानुसार पोलीस शोध घेत पुढे पुढे निघालेत. एखाद्या ‘नेत्याच्या खाण्याचा तपास’ करण्याचा हा ‘खाकी’चा पहिलाच अनुभव. खरंतर, त्यांनी तुळजापूर वेशीतल्या ‘जगूअण्णां’शी संपर्क साधला तर लगेच कळेल की, ‘आजपर्यंत अण्णांनी कुठं कुठं किती खाल्लं?’.. कारण एकेकाळी ही जोडी पालिकेत फेमस. हातात हात घालून साºया अधिकाºयांना कामाला लावायची. सभागृहात आरडाओरडा करून नंतर अकस्मात गप्प व्हायची. सुरुवातीला एखादा विषय उचलून नंतर हळूच सोडून द्यायची. नंतर तो विषय कसा अन् कितीत मिटला, याचाही शोध घ्यायचा असेल ‘खाकी’नं भवानीपेठेतल्या अण्णांच्या आलिशान बंगल्यात जावं. मात्र सध्या ‘अण्णांचं खाणं’ हा मुद्दा महत्त्वाचं नाही...विषय आहे ‘अण्णांचं जेवण’. आलं का लक्षात.. लगाव बत्ती !
मटक्यात भागीदारीचा संगम..
..नंतर नाव म्हणे ‘क्लोेज’ !
सुरेशअण्णांनी पोलिसांकडं ‘कामाठींचा मटका’ही ओपन केलाय. व्वाऽऽ ग्रेट. शिस्तबद्ध अन् सुसंस्कृत ‘कमळ’वाल्यांचे हे दोन मेंबर. यांचा म्हणे पूर्वी पूर्वभागातल्या पान टपरीवर ‘संगम’. यांच्या आकड्यातल्या भागीदारीचा बभ्रा आता अख्ख्या गावभर. खरंतर, दोन नंबर धंद्यात म्हणे ‘प्रामाणिकपणा’ खूप पाळला जातो. तरीही मोठ्या व्यवहारात अण्णांचं नाव ‘क्लोज’ करण्याचा गेम झाला असेल, तर थेट पोटावर पायच की...परंतु ‘पोटात विष’ अन् ‘पोटावर पाय’ या दोन्हीमध्ये प्रत्यक्षात खूप फरक. आता या दोन शब्दातील फरक शोधत बसतील बिच्चारे ‘खाकी’वाले. त्या ‘केडगें’ना कुणीतरी मराठी व्याकरण शब्दकोष आणून द्या रेऽऽ.
आजपर्यंत अण्णांच्या पोटात काय काय गेलं असावं, याचाही शोध पोलीस घेताहेत. दोन पानवाले कामाला लागलेत. आपल्याला या प्रकरणात बिनकामाचा ‘चुना’ लागतोय की काय, याचंही टेन्शन त्यांना वाटू लागलंय. काही हॉटेलवाल्यांच्याही पोटात भीतीचा रस्ता रटऽऽरट शिजू लागलाय. आता तर म्हणे, तपास आंध्रातल्या ‘यादगिरीगुट्टा’पर्यंत पोहोचतोय. तिथल्या ‘ताडी’च्या बनात आठवडाभर राहून माठातल्या ‘कल्लू’त ‘कोंबडीच्या नळ्या’ मिसळून घेतलेली टेस्ट लई भारीऽ म्हणं; मात्र या असल्या विचित्र मिश्रणातून ‘थेलियम’ची निर्मिती होण्याची शक्यता कमीच.
महेश अण्णांच्या खाल्ल्या मिठाला
जागलेले कोठे आहेत ?
सुरेशअण्णांनी जबाबात महेशअण्णांच्या घरातल्या जेवणाचाही उल्लेख केलाय. पूर्वी मुरारजी पेठेतल्या या बंगल्यात नेहमीच लोकांची वर्दळ असायची. पक्षनेत्यांपासून महापौरांपर्यंत अनेकांचे पाय तिथं नेहमी लागायचे. मुजरे केले जायचे. पायाची धूळ स्पर्शिली जायची. ‘स्टँडिंग’मधल्या कामाचा ‘स्टँड’ इथंच घेतला जायचा. पालिकेतला रिमोटही इथूनच हलायचा. निवडणुकीत खाल्ल्या मिठाला जागायची शपथही मतदानाच्या आदल्या रात्री घेतली जायची. यात कधी-कधी कट्टर विरोधकही असायचे. वाटल्यास पुरुषोत्तमभाऊंना हळूच ‘जय महाराष्ट्र’ म्हणा...ते कधीतरी मूडमध्ये सांगतीलच.
असो. सुरेशअण्णांच्या जेवणात कुणी विष कालवलं, याबाबत महेशअण्णांचाही जबाब पोलीस घेताहेत. खरंतर, आता अण्णांच्याच घराण्यात एवढं ताट वाढून ठेवलंय, ते कशाला दुसऱ्याच्या भानगडीत पडतील, असाही सहानुभूतीचा सूर पूर्वभागात ऐकायला मिळतोय.
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)