नेत्यांचे स्वयंभूपण व संघटनांचे निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:54 AM2018-06-12T00:54:33+5:302018-06-12T00:54:33+5:30
प्रणव मुखर्जींच्या संघवारीने काँग्रेस पक्षातील अनेकांना दिलेला धक्का उपहासाने पाहावा असा नाही. संघटनेतील सगळी सर्वोच्च पदे भूषविलेल्या व सारे आयुष्य आपल्यासोबत राहिलेल्या नेत्याला त्याच्या संघटना व त्यातील कार्यकर्ते गृहित धरत असतात. तो असाच वागेल आणि तसा वागणार नाही अशा त्याच्याविषयीच्या त्यांच्या धारणा पक्क्या असतात.
- सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)
प्रणव मुखर्जींच्या संघवारीने काँग्रेस पक्षातील अनेकांना दिलेला धक्का उपहासाने पाहावा असा नाही. संघटनेतील सगळी सर्वोच्च पदे भूषविलेल्या व सारे आयुष्य आपल्यासोबत राहिलेल्या नेत्याला त्याच्या संघटना व त्यातील कार्यकर्ते गृहित धरत असतात. तो असाच वागेल आणि तसा वागणार नाही अशा त्याच्याविषयीच्या त्यांच्या धारणा पक्क्या असतात. या धारणांमुळे त्या नेत्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर काही मर्यादा येत असल्या तरी संघटनात्मक म्हणावे असे हे वास्तव आहे. अन्यथा नेता म्हणजेच सर्वकाही आणि संघटना म्हणजे काही नाही या भूमिकेवर यावे लागते. प्रणव मुखर्जींची संघवारी सगळ्या काँग्रेसजनांना धक्कादायक वाटली असेल तर तिचे कारण या वास्तवात आहे. त्यांनी त्यांचा संताप व अविश्वास व्यक्त केला असेल तर तो त्यांचा दोष नव्हे. त्यांची नेतृत्वाविषयीची निष्ठा सांगणारी व नेतृत्वानेही संघटनेला विश्वासात घेतले पाहिजे हे शिकविणारी ती बाब आहे.
२००४ च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर उपपंतप्रधान पदावरून विरोधी पक्षनेते पदावर आलेले लालकृष्ण अडवाणी पाकिस्तान भेटीला गेले होते. तेथे बॅ. महम्मद अली जिना यांच्या मजारीवर जाऊन त्यांनी तिच्यावर चादर चढविली व जिना हे सेक्युलर वृत्तीचे नेते होते असे प्रशस्तीपत्रही त्यांना दिले. त्यावेळी भाजपसह साऱ्या संघ परिवारात नेमकी अशीच प्रतिक्रिया उमटली होती. संघाने त्यांचा निषेध केला नाही. मात्र त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून पायउतार व्हायला लावले. तेव्हापासून आजतागायत ते भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून सांगितले जात असले तरी त्यांच्या वाट्याला राजकीय विजनवासच आला आहे. यातून नेत्याचे मतस्वातंत्र्य आणि संघटनेची त्याच्यावर असलेली निष्ठा व बंधने याविषयीचे तारतम्य त्या दोघांनीही राखण्याची गरज स्पष्ट होते. त्याचमुळे प्रणव मुखर्जींचे स्वयंभूपण मान्य केले तरी त्यांचे परवाचे धक्कातंत्र साºयांनाच पचविता येईल हे त्यांनीही समजण्याचे कारण नाही.
शर्मिष्ठा मुखर्जी या त्यांच्या कन्येने त्यांच्या वर्तनावर केलेली टीका पुरेशी बोलकी व त्यांनी दिलेल्या धक्क्याची खरी परिणती सांगणारी आहे. ‘तुम्ही संघाच्या व्यासपीठावर काय बोललात हे काळाच्या प्रवाहात विसरले जाईल. मात्र त्या व्यासपीठावरच्या तुमच्या प्रतिमा काळाच्या व देशाच्याही मनावर कायम राहतील. या प्रतिमाच तुमची निष्ठा धूसर बनवतील’ असे त्या म्हणाल्या आहेत. काँग्रेस आणि भाजप वा संघ यांच्यातील भेद मतभेदांएवढे मर्यादित नाहीत. ते प्रकृतीभेदाच्या पातळीवर जाणारे आहेत. काँग्रेसचा जन्म स्वातंत्र्यासाठी व त्या दिशेने जनतेचे लढे उभारण्यासाठी झाला. तो लढा त्या संघटनेने यशस्वीही केला. तो लढत असतानाच त्याने लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता व सर्वधर्मसमभावावर उभी असलेली बंधुता या मूल्यांचा स्वीकार व जागर केला होता. संघाची वाटचाल नेमकी याच्या उलट आहे. त्याने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला नाही. सांस्कृतिक संघटना म्हणवून घेत त्याने त्या लढ्यापासून स्वत:ला दूर ठेवले. मात्र तसे करताना त्या लढ्याची टवाळी करणे आणि प्रसंगी ब्रिटिश सत्तेला साहाय्य करणे ही कामेही त्याने सोडली नाहीत. राष्ट्रपिता म. गांधींचा खून करणारा गोडसे व त्याचे गुन्हेगार सहकारी यांचा संबंध संघाने कधी नाकारला नाही आणि त्यांच्या कृत्याचा निषेधही केला नाही. गांधी, नेहरू व त्याआधी टिळक, गोखले, रानडे इत्यादींनाही त्याने वेळोवेळी नावे ठेवली. आताचा त्याला आलेला सरदार पटेल व डॉ. आंबेडकर यांच्याविषयीचा राजकीय पुळका वगळला तर त्यांनाही त्याने कधी आपले मानले नाही. काँग्रेसला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे आणि तो आपल्याला नाही याचा न्यूनगंडच मग त्याला कधी सावरकरांशी तर कधी भगतसिंगांशी (त्यांची वैचारिक मते भिन्न असतानाही) नाते सांगताना दिसला. समाजवादाची भूमिका घेणाºया व ब्राह्मणशाही चिरडून नाहिशी करावी असे म्हणणाºया विवेकानंदांचे उपरणेही त्याला त्याचसाठी धरावेसे वाटले.
प्रणव मुखर्जी संघाएवढेच त्याच्या विचारांपासूनही दूर राहिलेले नेते आहेत. आपले वेगळेपण त्यांनी संघात केलेल्या भाषणातही अधोरेखित केले. हा देश त्यात राहणाºया सर्व नागरिकांचा आहे. तो हिंदूंचा, मुसलमानांचा व सर्व अल्पसंख्यकांचाही आहे. त्याने धर्मनिरपेक्षतेचे मूल्य स्वीकारले आहे. धार्मिक हिंसाचाराला व विद्वेषाला येथे थारा नाही इ.इ. असे ते बरेच बोलले. मात्र त्यांच्याआधी केलेल्या आपल्या भाषणात सरसंघचालक मोहन भागवत यांनी उच्चारलेले एक वाक्य त्यांनी ध्यानात घेतले की नाही हे कळायला मार्ग नाही. ‘आम्ही सर्वांचे ऐकतो आणि आपली वाटचाल सुरू ठेवतो’ असे ते म्हणाले. थोडक्यात ‘तुम्ही या, बोला, सांगा व शिकवण्याचा प्रयत्न करा. आम्ही मात्र आमच्या भूमिकेवर ठाम आहोत’ हा त्याचा अर्थ आहे. चर्चा व संवाद हे लोकशाहीचे लक्षण आहे. मात्र संवाद समोरचा माणूस बोलत व ऐकत असेल तरच साधता येतो. भिंतींशी संवाद करता येत नाही. तुम्ही काहीही म्हणा, आम्ही आहोत तसेच राहू ही संघाची पाऊणशे वर्षांची भूमिका प्रणव मुखर्जींना ठाऊक नाही असे कोण म्हणेल? गांधीजींच्या खुनानंतर सरदार पटेलांनी (गृहमंत्री) संघावर बंदी घातली. त्यावेळी मध्यप्रांत व व-हाडचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांनी संघातील अनेकजण त्यासाठी माफी मागायला तयार असल्याचे सांगणारे पत्र नेहरूंना सादर केले. त्यावर विचार करून ही बंदी उठवण्याची विनंतीही त्यांनी नेहरूंना केली. नेहरूंनी मात्र ‘हा प्रश्न सर्वस्वी गृहमंत्रालयाच्या अधीन असून सरदारच त्याविषयीचा योग्य तो निर्णय यथाकाळ घेतील’ असे त्यांना दि. २७ फेब्रुवारी १९४८ या दिवशी लिहिलेल्या पत्रात कळविले. मात्र त्याच पत्रात ‘संघ बोलतो एक आणि करतो दुसरेच’ असेही त्यांनी रविशंकरजींना कळविले. प्रणव मुखर्जींनी नेहरूंचा अभ्यास केला असल्याने त्यांना ही घटना ठाऊक असावी. त्यामुळे यात कोण कुणाची फसवणूक करतो हाच प्रश्न साºयांना पडावा. त्यांचे भाषण सुरू होण्याआधी व त्यांचे लक्ष काहीसे विचलित दिसत असताना मोहन भागवत त्यांच्याकडे ज्या विजयी मुद्रेने पाहात होते ती बाबही या संदर्भात जाणकारांनी लक्षात घ्यावी अशी आहे. प्रणव मुखर्जींनी धर्मनिरपेक्षता सांगितली. मात्र सध्या देशात बहुसंख्याकवादाने घातलेले थैमान, त्यामुळे धास्तावलेले अल्पसंख्य आणि त्या साºयाला असलेली सरकारची साथ व संघाची मान्यता याविषयी ते बोलले नाहीत. जेथे काही गोष्टी स्पष्ट व परखडपणे सांगायच्या तेथे तत्त्वज्ञाची सुभाषिते उपयोगी पडत नाहीत.
असो, मुखर्जींना संघात वा त्याच्या आसपास स्थान नाही आणि त्यांनी काँग्रेसशी असलेले संबंधही नको तेवढे ताणून घेतले आहेत. माजी राष्ट्रपती हा त्यांचा सन्मान त्यांना यापुढेही मिळणार आहे. त्यांच्यावर उघडपणे टीका कुणी करणारही नाही. मात्र यापुढचे त्यांचे स्थान भाजपात अडवाणींचे आहे तसे राहील. अडवाणी आहेत आणि नाहीतही. नेमके तेच प्राक्तन प्रणवदांच्या वाट्याला येणे हे त्यांच्यासाठी जेवढे दु:खकारक तेवढेच ते आपले स्वयंभूपण नको तेवढे ताणत नेणाºया सर्वच पक्षातील पुढाºयांना मार्गदर्शक ठरणारे आहे.