व्यवसायासोबत वर्तनातही आत्मनिर्भरता हवी!
By किरण अग्रवाल | Published: May 14, 2020 10:42 AM2020-05-14T10:42:11+5:302020-05-14T10:43:01+5:30
या संकल्पनेतील सध्याचा मार्ग आपल्या स्वत:पासून सुरू होणारा असल्याने त्यात पारंपरिक सवयींची त्याज्यता तसेच आचरणातील बदलाचा अंगीकार निहीत आहे, हे विसरता येऊ नये.
किरण अग्रवाल
स्वावलंबी भारताचा निर्धार व्यक्त करताना त्यासाठी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्यावर आता त्यासंबंधीची चिकित्सा सुरू झाली आहे. मोदी यांनी उच्चारलेल्या आत्मनिर्भर शब्दाचा अर्थही शोधला जात आहे; परंतु केवळ आर्थिक अगर व्यावहारिक अंगाने त्याचा विचार न करता व्यक्तिगत वर्तनाच्या दृष्टीनेही तो केला जाण्याची अपेक्षा गैर ठरू नये. कारण या संकल्पनेतील साध्याचा मार्ग आपल्या स्वत:पासून सुरू होणारा असल्याने त्यात पारंपरिक सवयींची त्याज्यता तसेच आचरणातील बदलाचा अंगीकार निहीत आहे, हे विसरता येऊ नये.
सध्या आपण सारेच एका मोठय़ा संकटकाळातून मार्गक्रमण करीत आहोत. यापूर्वीही अनेक संकटे येऊन गेलीत व त्यातून बाहेर पडून आपण सक्षमपणो उठून उभे राहिलो आहोत; परंतु ‘कोरोना’चे संकट किती काळ राहील आणि त्यातून होत असलेल्या परिणामातून सावरायला नेमका किती काळ जाऊ द्यावा लागेल, याचा अंदाज आजघडीला बांधता येणो मुश्कील आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भरतेचा संदेश देत देशाच्या ढोबळ उत्पादनाच्या, म्हणजे ‘जीडीपी’च्या 10 टक्के होणा:या तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणाही केली आहे. सरकारच्या एक वर्षाच्या कमाईपेक्षाही ही रक्कम मोठी असून, सामान्य माणूस तर विसावर किती शून्य; याची आकडेवारी मांडण्यातच गुंगून गेला आहे. अर्थात, यासंबंधीची व्यावहारिक पातळीवरील चर्चा अर्थशास्रींकडून व त्याक्षेत्रतील मान्यवरांकडून होत आहेच, त्या खोलात जाण्याचे प्रयोजन येथे नाही. परंतु या अनुषंगाने व्यवहाराखेरीज वर्तनात आत्मनिर्भरता, स्वावलंबन कसे अंगीकारता येईल हा विचारात घ्यावयाचा मुद्दा आहे. ‘लोकल’ला ‘व्होकल’ करणो व आपल्याच ब्रॅण्डचा आपण अभिमान बाळगणो हे गरजेचे आहेच, त्यातून स्वदेशीला चालना मिळून देशाच्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम घडून येईल व आपलाच खिसा मजबूत या अर्थाने, जड होईल; परंतु आपली कामे आपणच करून त्याबद्दलचा दुराभिमान टाळणोही यानिमित्ताने शक्य झाले तर ते दुग्धशर्करेचे ठरेल. आत्मनिर्भरतेकडे त्यादृष्टीने पाहिले जावयास हवे.
‘कोरोना’च्या काळात बहुतेक पुरुष मंडळी घरात आहे. जे नोकरी-धंद्यानिमित्त ‘वर्क फ्रॉम होम’ आहेत त्यांचे एकवेळ जाऊ द्या; परंतु हाताला काम नसलेले जे घरात बसून आहेत अशांकडे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार वाढत असल्याच्या वार्ता आता येऊ लागल्या आहेत. भलेही मारहाण अगर पोलीस स्टेशन्सची पायरी गाठण्यार्पयतची मजल गेली नसेल; परंतु कुचंबणा, मानसिक त्रस, उपमर्द, अधिकाराचे हनन, स्री-पुरुष समानतेची ऐसीतैसी यासारखे जेही काही असते; त्याचा प्रत्यय अनेक माता-भगिनींच्या नशिबी याकाळात मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे वास्तविक वर्तमान आहे. कशातून घडून येते हे, असा विचार केला तर पारंपरिकपणो प्रस्थापित असलेले समज याला कारणीभूत असल्याचे सहज लक्षात येते. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातील ‘बापू ने अपून को आत्मनिर्भर बनने को कहा है..’ हे ऐकून व बघून आपण विषय सोडून देतो, मात्र यातून घ्यावयाचा संकेत वा संदेश कृतीत उतरतच नाही. बापूंच्या, म्हणजे म. गांधींच्या या तत्त्वाचीच तर वेगळ्या संदर्भाने पंतप्रधान मोदी यांनी उजळणी केली आहे. त्याच दृष्टीने उद्योगात स्वयंपूर्णता साधण्याबरोबरच खासगीतील वर्तनातही आत्मनिर्भरतेची अपेक्षा आहे.
साधी बाब आहे, घरात चहा प्यायचा तर तो गृहिणीनेच करून देणो अपेक्षिले जाते. पाणी भरण्यापासून ते स्वयंपाकार्पयत अनेक कामे ही जणू केवळ आणि केवळ महिलांचीच आहेत असेच गृहीत धरले जाते. ‘जेंडर इक्वॉलिटी’च्या गप्पा करणारेही घरात अशाच अपेक्षेने वागताना दिसतात. आता ‘कोरोना’मुळे हौस म्हणून काहीजण स्वयंपाकगृहात डोकावून थोडे फार काही करतातही, पण ते केवळ सोशल माध्यमांवर टाकून कौतुक करवून घेण्यासाठी! एरव्ही सदोदित या कार्यास वाहून घेतलेल्या महिलावर्गाला आराम करायचे सांगून किती पुरुषांनी गृहस्वच्छतेसाठी हाती झाडू घेतला असेल किंवा त्यांच्या वाटय़ाला येणारी कामे केली असतील, तर तुरळक उदाहरणो समोर यावीत. कारण ही कामे आपली नाहीत, अशीच मानसिकता पुरुषांमध्ये रुजलेली आहे. तेव्हा, या कामात स्वयंपूर्णता, स्वावलंबन अथवा आत्मनिर्भरतेचा विचार करणो गैर कसे ठरावे? घरातल्या किमान किरकोळ कामांसाठी गृहिणींवर निर्भर राहण्याऐवजी पुरुष मंडळी आत्मनिर्भर बनली, तर किती बरे होईल! अर्थातच, पुरुषांकडून अपेक्षिल्या जाणा:या अनेक कामात महिला पुढे आल्याचे पाहता त्यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसून येत आहेच. आता वेळ आहे, पुरुषांच्या आत्मनिर्भरतेची. तेव्हा पंतप्रधान मोदी यांचा आत्मनिर्भर भारतचा निर्धार याहीदृष्टीने अंमलबजावणीत उतरावा इतकेच यानिमित्ताने. बापूंनाही तेच अभिप्रेत होते.