आत्मनिर्भर कुलकर्णीकाकांचा व्हॅलेण्टाइन प्रॉब्लेम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 06:43 AM2021-02-13T06:43:20+5:302021-02-13T06:43:49+5:30

हल्लीतर ‘लग्नाआधी आम्ही दोन वर्षं लिव्ह-इनमध्ये होतो’, असं जाहीर मुलाखतीत सांगतात पोरं. कुलकर्णीकाका काय बोलणार?

Self reliant Kulkarni kakas Valentine Problem | आत्मनिर्भर कुलकर्णीकाकांचा व्हॅलेण्टाइन प्रॉब्लेम

आत्मनिर्भर कुलकर्णीकाकांचा व्हॅलेण्टाइन प्रॉब्लेम

Next

- अपर्णा वेलणकर, फिचर एडिटर, लोकमत

कुलकर्णीकाका कोथरुडला राहातात. हल्ली व्हॅलेण्टाइन ‘डे’ आला, की बाकी कुणाला फरक पडत नाही; पण काकांना उगीच आशा लागते. जर्मनीत राहाणाऱ्या मुलींची त्यांना फार काळजी आहे. एवढी हुशार मुलगी,  तिचं  ‘रिलेशनशिप स्टेटस’ अजून सिंगल असावं?  बर्लीनचा जॉब घेऊन भुर्र उडाली, तेव्हा काकांचा स्वदेशी ऊर अभिमानाने भरून आला होता!  पण आता पंचविशी  सरली लेकीची, निदान तिने कुणा एकाला ‘कमीट’ करावं असं फार त्यांच्या मनात आहे. व्हॅलेण्टाइन डेचे ते लाल बदाम, फुगेबिगे बघितले की हल्ली काकांना दिवसाढवळ्या स्वप्नं दिसतात. आपली लेक लाल ड्रेस  घालून उभी आहे, तिचा बॉयफ्रेण्ड गुलाबाचं फूल देऊन तिला प्रपोझ वैगेरे करतो आहे.. आहा!! काकू परवाच म्हणाल्या, ‘हल्लीची मुलं आता इतकी  ‘ही’ राहिली नाहीत! नाहीतर जाल उगीच ती बदामाच्या फुग्यांची दुकानं फोडायला!’ - तसे काका गप्पच बसले ! काकू नेमक्या वेळी नेमकी खपली काढतात.



वीसेक वर्षांपूर्वी व्हॅलेण्टाइन  डेची थेरं सुरू झाली तेव्हा रक्त उसळलं होतं काकांचं. शिवसेना उभी राहिली या गुलाबी वादळाच्या विरोधात! मग बजरंग दलवाले.  ‘जहां दिखेंगे बाबू शोना, तोड देंगे शरीरका कोनाकोना’ अशा  तेजस्वी घोषणा ऐकून काका थरारले होते. प्रेमाचा बाजार भरवता काय, म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गळे धरले होते सैनिकांनी ! व्हॅलेण्टाइनचे बदाम विकणारी झगमगती दुकानं फोडली, रस्त्यावर राडे घातले. कॉलेजात हातात हात घालून फिरणाऱ्या  जोड्यांचा पाठलाग केला, जरा लगट दिसली की पोरा-पोरींची गचांडी धरली. काका तेव्हा ऐन तिशीत! पदरात पोर पाच-सात वर्षांची!! प्रेमबिम काय ते चार भिंतींच्या आत आणि लग्नानंतरच, हे त्यांना मान्यच होतं तेव्हा. मुख्य म्हणजे आपल्या देशी मुला-मुलींना अशी खुल्लमखुल्ला प्रेमाची परवानगी देणारा हा विदेशी व्हॅलेण्टाइन  कोण उपटसुंभ, याचा राग होता मनात.

मनाने क्रांतिकारी असले तरी वर्तनाने काका मध्यममार्गीच; त्यामुळे बजरंगी सैनिकांचे राडे त्यांनी कोपऱ्यावर  उभे राहून पाहिले होते. पुढे मग सैनिक आणि काकांसारखे त्यांचे संस्कृतिरक्षक समर्थक यांच्याविरोधात कट केल्यासारखी टेक्नॉलॉजीने  सगळ्यांच्याच आयुष्यात घुसखोरी केली आणि रस्त्यावरच्या संस्कृतिरक्षणाची गरजच उरली नाही. काळाबरोबर बदलण्याची समजूत कुलकर्णी काकूंमध्ये असल्याने काकांच्या घरात राडे झाले नाहीत एवढंच! कॉलेजात गेलेल्या लेकीच्या बरोबरीने काकूंनी केसाला कात्री लावली. काकूंच्या पैठणीवर मिसमॅच  स्लीव्हलेस ब्लाऊज आलाय हे बघून तर त्यांना झीटच आली होती; पण काका गप्प राहिले. ग्लोबल तारुण्याने  चर्चेच्या गुऱ्हाळाचा  सोस थांबवून थेट कृतीलाच हात घातल्यावर संस्कृतिरक्षक बेकारच झाले. हल्ली सेम सेक्स रिलेशनशिप आणि लिव्ह-इनचे लढे थेट कोर्टात जाऊन लढतात. लग्नाआधी आम्ही दोन वर्षं लिव्ह-इनमध्ये होतो, असं जाहीर मुलाखतीत सांगतात पोरं.  काय बोलणार?



काकांसारख्यांची घुसमट मोडण्याचं खरं श्रेय मोदीजींचं! ते राज्यावर आले आणि आपलं ते बेमालूम झाकून दुसऱ्याचं  वाकून पाहाण्याला देशप्रेमाचा शिक्का मिळाला, शिवाय संस्कृतिरक्षणाच्या आरोळ्यांना फुकटचे अड्डे ! फेसबुकवर अकाउण्ट उघडल्यापासून, व्हाॅट्सॲपवर  भांडता यायला लागल्यापासून अनेकांच्या ‘स्वदेश-प्रेमा’ची कोंडी एकदम फुटलीच! 

काकांना मोदीजींचं सगळं पटतं. कधी नव्हे तो देशाचा पंतप्रधान देशाला आत्मनिर्भर करायच्या वेडाने झपाटलेला आहे, तर आपण त्याच्या मागे उभं असायला नको का, असा त्यांचा साधा सवाल आहे. फक्त आपल्या लेकीचं लग्न ठरलं पाह्यजे. तिला जर्मन बॉयफ्रेण्ड मिळाला, त्याच्याशीच लग्न झालं तर मग व्हिसाचे प्रश्नही सुटतील तिचे, हेही काकांना पटलंच आहे.  ती आत्ताच  कुणातरी स्पेशल मित्राबरोबर ‘लिव्ह-इन’मध्ये राहात असावी, अशी सुखद शंका काकांना हल्ली येते. बरंचय की! लग्नाआधीच पुरती ओळख असली की नंतरच्या कटकटी टळतील. त्यातून उद्या व्हॅलेण्टाइन डे... त्यांच्यात काही झालं, आणि लेकीचा व्हिडिओ कॉल आला रात्री तर..? - काकांचं स्वदेशी, आत्मनिर्भर हृदय कधीची वाट पाहातं आहे. नाहीतर पासपोर्ट काढला, तो फुकटच जायचा!
aparna.velankar@lokmat.com

Web Title: Self reliant Kulkarni kakas Valentine Problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.