स्वयंशिस्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 12:06 AM2016-01-05T00:06:59+5:302016-01-05T00:06:59+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता

Self-respecting philosophy | स्वयंशिस्तीचे दर्शन

स्वयंशिस्तीचे दर्शन

googlenewsNext

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांतातील स्वयंसेवकांचा पुणे शहरानजीक भरलेला ‘शिवशक्ती संगम’ हा मेळावा म्हणजे संघातील स्वयंशिस्तीचे दर्शन घडविणारा एक आगळा प्रयोग होता. संघाने आपल्या शाखा विस्तारासाठी जे विभिन्न भौगोलिक भाग पाडले आहेत त्या प्रत्येक भागात असे मेळावे घेण्याची संघाची परंपरा असल्याचे सांगितले जात असले तरी ज्या पद्धतीने या संगमाची गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती, ती पाहाता त्याच्या माध्यमातून आपल्या विराट सामर्थ्याचे दर्शन घडविण्याचा हेतू लपून राहिला नव्हता. सुमारे दीड लाख स्वयंसेवक या संगमात सहभागी झाले होते, यात विशेष काही नाही. कारण ते येणारच होते. पण ज्यांचा संघाशी काहीही संबंध नाही, किंबहुना ज्यांच्या मनात संघाविषयी काहीशी शंकेची वा संशयाची भावना आहे अशा लोकानीही आवर्जून उपस्थित राहावे यासाठी संघाचे पदाधिकारी विशेष प्रयत्नशील होते. मुळात या जाणिवेची दखल घेणे आणि आपल्या अंतगृहात बाहेरच्यांना प्रवेश देऊन शक्य झाले तर त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हे म्हटले तर संघ आता कूस बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षण मानावे लागेल. पुणे शहराच्या विस्तारात हिंजवडी परिसर माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित विविध आस्थापनांनी गजबजलेला परिसर. तिथेच संगम घडवून आणण्यामागे त्या परिसरात कार्यरत युवकांवर संघाची मोहिनी टाकण्याचा एक प्रयत्न म्हणूनही त्याकडे बघता येईल. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे एकट्याचे भाषण ठेऊन आणि सारे काही वेळेवर आटोपून सुनियोजनाचा जो वस्तुपाठ संघाने घालून दिला तो राजकीय पक्षांनी आणि त्यातही संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपाने आवर्जून गिरवायला हरकत नाही. कारण अलीकडच्या काळात बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी घडाळाशी जणू फटकून वागण्याचीच शपथ घेतली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा मेळावा. तो होण्यापूर्वी खुद्द संघातीलच काही लोकाना धडधडू लागले होते, कारण भागवत केव्हां, कुठे आणि काय बोलतील याचा म्हणे त्यांना भरवसाच वाटेनासा झाला होता. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर भागवतांनी जातीधारित आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज बोलून दाखविल्यामुळे ते राज्य भाजपाला गमवावे लागले असे भाजपाला वाटते. पण पुण्याच्या ‘संगमा’त भागवतांनी तसे कोणतेही वक्तव्य केले नाही. मूलत: संघाचा विचार लष्करी शिस्तीच्या आणि म्हणून लष्कराच्याही जवळ जाणारा असल्याने भारत जोवर आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवित नाही तोवर त्याची प्रतिष्ठा उंचावणार नाही या त्यांच्या मांडणीत नवे काही नाही. सरकार किंवा सत्ता यांना दुय्यम स्थान देऊन सामाजिक एकोप्याला त्यांनी दिलेले अधिक महत्व म्हणजे संघ ही एक केवळ सांस्कृतिक संघटना असल्याच्या मूळ भूमिकेचा पुनरुच्चार आहे. त्याचा वास्तवातील अर्थ संघ आता सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणारा नाही असा असेल तर भाजपाला ती एक हवीहवीशी वाटणारी संगम भेटचठरु शकेल.

Web Title: Self-respecting philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.