‘स्व’राज्यातच मोदींना द्यावी लागेल अग्निपरीक्षा
By admin | Published: August 31, 2016 04:41 AM2016-08-31T04:41:47+5:302016-08-31T04:41:47+5:30
गेल्या दोन दशकांपासून गुजरात राज्यावर आपली एकहाती हुकुमत गाजविणाऱ्या भारतीय जनता पार्टीची आजची अवस्था लक्षात घेता, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत
हरि देसाई, (ज्येष्ठ पत्रकार)
गेल्या दोन दशकांपासून गुजरात राज्यावर आपली एकहाती हुकुमत गाजविणाऱ्या भारतीय जनता पार्टीची आजची अवस्था लक्षात घेता, विधानसभेच्या आगामी निवडणुकीत हा पक्ष पुन्हा सत्ता प्राप्त करु शकेल वा नाही याबाबत आत्तापासूनच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. या राज्यात कधी काळी प्रचारक म्हणून काम करणारे नरेन्द्र मोदी थेट पंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचले खरे, पण आता मात्र येथे पक्षाची जोरदार घसरण सुरु झाली आहे.
कदाचित त्यामुळेच मोदींच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या आनंदीबेन पटेल यांच्यावर तथाकथित अपयशी कारभाराचा ठपका ठेऊन त्यांची मुख्यमंत्रिपदावरुन गच्छंती केल्यावर पुन्हा पटेल समाजातीलच एखाद्याला मुख्यमंत्री करण्याऐवजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे ‘हनुमान’ अशी ओळख असलेल्या विजय रुपानी यांना मुख्यमंत्री बनविले गेले. पण त्याचवेळी पटेल समाज नाराज होऊ नये म्हणून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नितीन पटेल यांना उप मुख्यमंत्री तर मूळ भावनगरचे तरुण आमदार जितू वाघाणी यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आले. आनंदीबेन यांनी पदावरुन हटविण्यात आल्याची नाराजी फेसबुकवर राजीनामा देऊन व्यक्त केली असली तरी मोदी-शाह यांच्या पुढ्यात त्या खूपच कमकुवत ठरल्या. तथापि राज्यपालपद स्वीकारुन गुजरातबाहेर पडण्याऐवजी त्यांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण देत फिरावे लागत आहे.
आनंदीबेन यांनी अत्यंत चांगला कारभार केला, असे वरकरणी विजय रूपानी आणि भाजपातील अन्य नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात ते एव्हाना आनंदीबेन यांना विसरलही आहेत. भविष्यात आनंदीबेन यांनी पक्षासमोर काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर किंवा त्यांच्या नातलगांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून त्यांना अडकविले जाऊ शकते व खुद्द आनंदीबेन यांनाही याची कल्पना आहेच.
जगमित्र म्हणून ओळखले जाणारे रूपानी पक्ष संघटनेत अनेक वर्षांपासून कार्यरत होते. विधानसभेवर पहिल्यांदाच निवडून गेल्यानंतर त्यांना लगोलग मंत्रिपद मिळाले आणि आता तर मोदी-शाह यांच्या कृपेने ते मुख्यमंत्रीही बनले आहेत. जोपर्यंत अमित शाह गुजरातेत मुख्यमंत्री म्हणून येण्याचे ठरत नाही तोपर्यंत ते राज्य करतील. येत्या मार्च महिन्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका आटोपल्यानंतर एप्रिलच्या सुमारास अमित शाह गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील अशी येथील राजकीय वर्तुळातली चर्चा आहे.
गुजरातेत कॉँग्रेसची अवस्थाही खूप काही चांगली आणि भक्कम आहे अशातला भाग नाही. परंतु पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने जे आंदोलन पेटून उठले ते आनंदीबेन पटेल यांना त्या स्वत: पटेल असूनही धड हाताळता आले नाही. याचा कॉँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुरेपूर लाभ उठवता आला. राज्यातल्या ३३ पैकी २३ जिल्हा परिषदा आणि १५० नगरपालिका कॉँग्रेसने जिंकून घेतल्या. त्यामुळे विधानसभेची निवडणूक जिंकण्याचा विश्वास कॉँग्रेसच्या मनात निर्माण झाला आहे. तथापि कॉँग्रेसने आतापासूनच आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला व पक्षशिस्त सांभाळली तर कदाचित तब्बल दोन दशकानंतर तो पक्ष पुन्हा गुजरातच्या सत्तेत येऊ शकतो.
विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्ष नेता आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा मुख्यमंत्रिपदाचा दावा बळकट दिसतो. परंतु ते पूर्वाश्रमीचे संघ परिवारातील असल्यामुळे ही पार्श्वभूमी कदाचित आडवी येऊ शकते. दुसरे एक एक माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र भरतसिंह सध्या प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अद्याप कॉँग्रेस पक्षात कोणताही अंतर्गत वाद उफाळून आलेला नाही. तथापि पक्षाचे सारे लक्ष सोनिया गांधींचे निकटवर्ती व विश्वासू अहमद पटेल यांच्याकडे लागून राहिले आहे. पण पटेल यांचा प्रभाव आणि भाजपाचा अपप्रचार यामुळे तूर्त तरी येथे कॉँग्रेस पक्ष हा मुस्लीमांंचा पक्ष अशी ओळख बनवून बसला आहे.
पाटीदार आंदोलनात जे सहभागी झाले त्यांच्याविषयी आजदेखील राज्य सरकार अढी बाळगून आहे. आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल रोजच भाजपा आणि कॉँग्रेसवर टीका करीत असतात. अगदी अलीकडेच झालेल्या उना दलितकांडानंतर भाजपाच्या सत्ताकाळातील अशाच स्वरुपाची पंधरा हजाराहून अधिक प्रकरणे उजेडात आल्याने दलित विरोधी अशी भाजपाची प्रतिमा बनली आहे.
एकीकडे ओबीसी मंचचे अल्पेश ठाकूर सरकारच्या विरोधात दंड ठोकून उभे राहिले असताना राज्यातील दलित समाजाला एकत्र करण्यासाठी जिग्नेश मेवाणी यांनी ‘आप’चा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसात हार्दिक पटेल (२३), जिग्नेश मेवाणी (३५) आणि अल्पेश ठाकूर (४०) आणि या युवा त्रयीने राज्यात निर्माण केलेल्या राजकीय जागरूकतेमुळे भाजपाच्या नेत्यांना घाम फुटेल पण कॉँग्रेस पक्षाला चांगले दिवस येण्याची जी स्वप्ने पडत आहेत ती साकार करायची झाली पराकोटीचे श्रम घ्यावे लागणार आहेत.