‘सेल्फी पॉइंट’ची सेल्फिश कुल्फी
By Admin | Published: March 5, 2017 11:31 PM2017-03-05T23:31:31+5:302017-03-05T23:31:31+5:30
सेल्फीची लाट आली म्हणून राजकारण तिच्यावर स्वार झालं.
सेल्फीची लाट आली म्हणून राजकारण तिच्यावर स्वार झालं. पण जेन-नेक्स्टनं राजकीय पक्षांना अप्रत्यक्ष संदेश दिलाय...नको त्या विषयाचं राजकारण कराल तर तुमचेच चेहरे सेल्फी नव्हे, फोटो काढण्यालायक होतील!
तब्बल एक किलोमीटरचा फेर असलेलं शिवाजी पार्क म्हणजे मध्य मुंबईचं कॅफे आॅक्सिजन! महापालिका निवडणुकीचे सूप वाजले आणि याच जागेभोवती एक नवा राजकीय पॉइंट अधोरेखित झाला. सेल्फी पॉइंटच्या स्वामित्व हक्कावरून राजकारणात होळीच्या आधीच रंग भरले. खरं तर सेल्फी पॉइंटच्या निमित्तानं राजकीय धुळवड सुरू झाली. शिवाजी पार्कलाच असलेल्या महापौर बंगल्यात कोण बसणार, याचा शिवसेना-भाजपात रंगलेला कलगीतुरा सुरू असताना त्यापेक्षाही सेल्फी पॉइंटचा वाद केंद्रबिंदू बनला. सोशल मीडियावर टिवटिव सुरू झाली. महापौर शिवसेनेचाच होणार, हे स्पष्ट होता होता सेल्फी पॉइंट कोणाचाच असणार नाही, हेही स्पष्ट झालं. होऊ दे चर्चाच्या स्टाइलनं वाद रंगला खरा, पण मूळ मुद्दा बाजूला पडला. सेल्फी पॉइंट हा इतका महत्त्वाचा प्रश्न आहे का, तो खरंच तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय आहे का, तो नागरिकांचा प्रश्न आहे की राजकारणाचा विषय आहे, एक ना अनेक!
जिंदा दिल राहू पाहणाऱ्या मुंबईकरांना जगण्यासाठी उमेद देत राहण्याचा वसा घेतलेलं हे मैदान. त्याच्या कुशीत सेल्फी पॉइंटचं राजकारण रंगलं. शिवाजी पार्कच्या अंतरंगाला इतिहास आहे, अन्् बाह्यरंगाला वर्तमान! इथल्या बाह्यरंगाला ना वयाचं बंधन आहे, ना वेळेचं. इथं फिरायला येणं हा जितका परिपाठ आहे, तितकाच सोहळाही. हाफ पॅण्ट किंवा ट्रॅक सूटमध्ये फिरायला, धावायला येणाऱ्यांच्या अदा बघण्याजोग्या असतात. आरोग्याचं म्हणाल, तर रामप्रहरी कडू कारल्यापासून अनेक आरोग्यवर्धक ज्यूस विकणारे न चुकता इथे धंदा करतात. पण संध्याकाळी वसईकरांच्या भजी-पावचा वास दरवळतो. कुठल्यातरी मशहूर कुल्फीच्या गाड्या उभ्या राहतात.
महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत शिवाजी पार्क परिसरानं राज ठाकरेंच्या पक्षाला मनसे मतदान केलं. इथं निवडून आलेल्या संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कच्या परिघात रंगीबेरंगी छत्र्या लावून एक सेल्फी पॉइंट तयार केला. त्यासाठी झाडांचे बुंधेही रंगात न्हाऊन निघाले. मुंबई किंवा दादरच्या बाहेरून आलेल्यांच्या माना त्याकडे बघण्यासाठी आपसूक वळायला लागल्या. अनेकांनी आपल्या छबी इथंच सेल्फीबंद केल्या.
यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निकालाने राजकीय चित्र बदलले. शिवसेना भवनासमोर, शिवाजी पार्कच्या पट्ट्यात शिवसेनेचे फटाके वाजले. आणि अल्पावधीतच निधीच्या अभावाचे कारण देत मनसेने हा सेल्फी पॉइंट बंद करून टाकला. लागलीच, लौकरच भेटू भाजपाच्या सेल्फी पॉइंटवर असं सांगत पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दंड थोपटले. मग साऱ्यांनाच हुरूप आला. मनसे म्हणाली आमचा पॉइंट, सेना म्हणाली विजय आमचा, पॉइंटही आमचाच. पण शिवाजी पार्क पट्ट्यातल्या नागरिकांची अडचण होत असल्याच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सगळ्याच पक्षांना परवानगी नाकारून वादावर पडदा टाकला.
तरुणाईला सेल्फी काढताना नेपथ्याची गरज असतेच कुठे? पूर्वी मंडळी स्टुडिओत जाऊन आलिशान मोटारीच्या कटआउट सोबत रुबाबदार फोटो काढून घ्यायची. पण डिजिटल क्रांतीमुळं ती हौस थेट आपल्या हाती आली. आता आपणच आपले फोटो काढायचे, आपणच एडिट करायचे. हौस आपल्या हाती आल्याचा साक्षात्कार तरुणाईला खूप आधी झाला. सेल्फी पॉइंटच्या नेपथ्यात ही तरुणाई नव्हे तर राजकीय मंडळी रंगली. हे नेपथ्य राजकीय सोयीतून साकारलं. सेल्फीची लाट आली म्हणून राजकारण तिच्यावर स्वार झालं. पण प्रत्यक्षात याच जेन-नेक्स्टनं राजकीय पक्षांना अप्रत्यक्ष संदेश दिलाय...उगाच आमच्या अंतरंगात डोकावू नका. नको त्या विषयाचं राजकारण कराल तर तुमचेच चेहरे सेल्फी नव्हे, फोटो काढण्यालायक होतील! हे न समजलेले राजकीय पक्ष सेल्फिश सेल्फीची कुल्फी काढायला निघाले होते. ती विरघळताच सांभाळणे कठीण झालं आहे.
धूल चेहरे पे थी, हम आइना साफ करते रहे... सेल्फीचे राजकारण करणाऱ्यांना याचा अन्वयार्थ कळलाच नाही ना!
- चंद्रशेखर कुलकर्णी