‘सेल्फि’शपणा

By admin | Published: January 12, 2016 02:56 AM2016-01-12T02:56:42+5:302016-01-12T02:56:42+5:30

वांद्रे येथील बॅण्डस्टँडच्या दुर्घटनेने सेल्फी पुन्हा एकदा चर्चेत आला. मुळात सेल्फी काढावा की नाही? हा मुद्दा नाही. तर सेल्फी काढताना लगतच्या वातावरणाचे भान का सुटत जाते

'Selfishness' | ‘सेल्फि’शपणा

‘सेल्फि’शपणा

Next

वांद्रे येथील बॅण्डस्टँडच्या दुर्घटनेने सेल्फी पुन्हा एकदा चर्चेत आला. मुळात सेल्फी काढावा की नाही? हा मुद्दा नाही. तर सेल्फी काढताना लगतच्या वातावरणाचे भान का सुटत जाते; हा मुद्दा आहे. वांद्रे येथील घटनेने तरुणाई हेलावली असली, तरी भानावर आलेली नाही हे वास्तव आहे. एकविसाव्या शतकात आपण तंत्रज्ञानाच्या एवढे आहारी गेलो आहोत; की त्याने आपला जीव जातोय, हेही लक्षात येऊ नये? ही स्थिती चिंता वाढवणारी आहे. पण अशा ‘सेल्फी’च्या ‘सेल्फिश’पणाचा ज्वर दिवसेंदिवस वाढतच असून, असे सेल्फी आणखी किती जीव घेणार? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. थोडेसे इतिहासात डोकावून पाहायचे म्हटले, तर १८३९ साली रॉबर्ट कॉर्नेलियस याने जगातील सर्वांत पहिला सेल्फी काढल्याची नोंद आढळते. म्हणजे सुमारे १७५ वर्षांपूर्वी ‘पहिला सेल्फी’ काढण्यात आला. परंतु, सध्याच्या युगात तंत्रज्ञानाने अवघ्या तरुणाईला अक्षरश: झपाटून टाकले आहे. त्यात सेल्फी तर कहर करत आहे. या क्रेझमुळेच की काय ‘सेल्फायटिस’ हा नवा मानसिक आजार असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी जाहीर केले आहे. निधनासारख्या प्रसंगांमध्येही लोक सेल्फी काढून आपल्या ‘विकृती’चे प्रदर्शन करताना दिसतात. चर्चगेटला भल्या पहाटे लोकलचा झालेला अपघात असो वा अन्य काही. लोक सेल्फी काढण्यातच धन्यता मानताना दिसतात. खरे म्हणजे अशावेळी गरज असते ती तातडीने मदतीला धावून जाण्याची. पण तसे होतानाही दिसत नाही. ‘स्मार्ट’ बनण्याच्या नावाखाली आपण विकृतीचे शिकार बनत असल्याची जाणीवही आता हरवत चालली आहे. दिवसेंदिवस वेगवान होणाऱ्या उत्तम दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या व्यसनाची चटक लागलेली दिसून येते. त्यात सोशल नेटवर्क साईट्स भर घालत आहेत. पहिला सेल्फी काढून तो सोशल नेटवर्क साईट्सवर पोस्ट करण्याची केविलवाणी घाईदेखील सुज्ञ मनांची चिंता वाढवणारी आहे. अशाच ‘सेल्फि’शपणाने वांद्र्यात तरुणीचा बळी गेला. सामाजिक जबाबदारीचे भाव ठेवत रमेश वळुंज या तरुणाने दोघा तरुणींना तर वाचवले; पण तिसऱ्या तरुणीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यालाही जिवाला मुकावे लागले. यातून आपण काही धडा घेणार की नाही?

Web Title: 'Selfishness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.