सेनेचे पाप, भाजपचे माफ? अजित पवारांसोबत भाजपने गुपचूप शपथविधी उरकला, तो धोका नव्हता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 11:45 AM2022-09-07T11:45:28+5:302022-09-07T11:46:08+5:30
अजित पवार यांच्या समवेत पुरेसे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत म्हणून तीनच दिवसांत राजीनामा देऊन सत्ता साेडावी लागली. चाळीस आमदारांचा गट बनवून अजित पवार भाजपला मिळाले असते तर ताे धाेका नव्हता का?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी आघाडी करून शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, महाराष्ट्राच्या जनतेचा काैल अवमानित केला आणि हिंदुत्ववादी विचारांना धाेका दिला, असा आरोप करीत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बरीच टोलेबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना हाताशी धरून महाराष्ट्र जागा हाेण्यापूर्वी भाजपने गुपचूप शपथविधी उरकून घेतला हाेता, ताे हिंदुत्ववादी विचारांना धाेका नव्हता का? अजित पवार यांच्या समवेत पुरेसे आमदार पक्षातून बाहेर पडले नाहीत म्हणून तीनच दिवसांत राजीनामा देऊन सत्ता साेडावी लागली. चाळीस आमदारांचा गट बनवून अजित पवार भाजपला मिळाले असते तर ताे धाेका नव्हता का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडत नाही म्हणून अखेर शिवसेनेवर आघात करण्यात आला. गाेवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, अरुणाचल आदी राज्यांत ताेडफाेड करूनच भाजपने सत्ता स्थापन केल्याचा गेल्या आठ वर्षांतील इतिहास आहे. उद्धव ठाकरे यांना शब्द दिला नसेल; पण म्हणून शिवसेनेने दुय्यम भूमिकाच घ्यावी, असे थाेडेच आहे? १९९० पूर्वी महाराष्ट्रात भाजपची स्वबळावर निवडून येण्याची क्षमता पंचवीस आमदारांचीच हाेती. शिवसेनेबराेबर युती झाल्यावर महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यात भाजपचा स्वीकार सहज झाला. तत्पूर्वी जनसंघ किंवा भाजपनेही तत्त्वहीन आघाड्या केल्याच आहेत. बिहारमध्ये भाजपचे ७५ आमदार असताना केवळ पंचेचाळीस आमदार असणाऱ्या संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपद बहाल केलेच हाेते. बिहारमध्ये एका रात्रीत आघाडीतील घटक पक्ष बदलतात, तेव्हा काेण काेणाला धाेका देते हे जनतेला समजणेच कठीण हाेऊन जाते. महाराष्ट्र हे आर्थिक आघाडीवरचे राज्य आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या तुलनेत अहमदाबादचे महत्त्व वाढविण्याचे प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. शिवसेनेने मराठी माणसांच्या अस्मितेसाठीची लढाई सदैव केली आहे. त्याच पक्षात फूट पाडून शिवसेनेला संपवून टाकण्याची खेळी भाजपने केली. मुंबई महापालिकेची सत्ता एखाद्या राज्याएवढी बलदंड आहे. ती मिळविण्यासाठी आता धडपड चालू आहे.
राजकारणात सर्व काही माफ असले तरी शिवसेनेने केले ते पाप ठरते आणि भाजपने केले ते माफ कसे? तीन दिवसांसाठी का असेना, अजित पवार यांच्याबरोबर आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न भाजपने केला, तो शरद पवारांच्या राजकीय, नैतिक वजनामुळे आमदार माघारी फिरल्याने बारगळला. अशा तत्त्वहीन राजकारणाचा मार्ग भाजपने अनेकदा पत्करला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती महमद सईद यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी पक्षाबराेबर आघाडी केली, तेव्हा भाजपवर बरीच टीका झाली हाेती. जम्मू-काश्मीरमध्ये अशाप्रकारे सत्ता मिळवून काय साध्य करायचे हाेते? अमित शहा यांच्या दौऱ्यात मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे अखेरचा लढा समजून भिडा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले, त्याहीवरून आता वादंग उभे राहणार आहे. शिवसेनेतच फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांचे नैतिक बळ घसरले आहे. ते स्वत: मुख्यमंत्री असताना सत्ता जावी, हे माेठे धक्कातंत्र भाजपने वापरले. दुसरीकडे आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, ही सुडाची भाषा उचित नाही. केंद्रात सलग दाेनवेळा भाजपला बहुमत मिळाल्यानंतर प्रादेशिक किंवा घटक पक्षांची आता गरज उरलेली राहिली नाही, असे भाजपला वाटते आहे.
नरेंद्र माेदी यांच्या प्रतिमेवर महाराष्ट्राने कौल दिला हाेता, असे त्यांचे मत आहे. मात्र, ते पूर्ण सत्य नाही. नरेंद्र माेदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय हाेण्यापूर्वीच शिवसेना-भाजप युतीने महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली हाेतीच. असे अनेक राज्यांत झाले आहे. ओडिशामध्ये बिजू जनता दलाने एक निवडणूक भाजपशी आघाडी करून जिंकली हाेती. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने भाजपशी आघाडी केली हाेती. अकाली दलाने पंजाबमध्ये नेहमीच भाजपशी आघाडी करीत राजकारण केले आहे. राजकीय वातावरण बदलले तसे अनेक प्रादेशिक पक्ष दुरावले. त्या सर्व पक्षांनी भाजपला धाेका दिला, असे झालेले नाही. काही पक्षांना भाजपनेही धाेका दिला आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविताना मराठी अस्मितेचा विषयही पुढे येऊ शकताे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने बंगाली अस्मितेमुळे भाजपवर मात केली हे विसरून कसे चालेल?