सेवा हाच ध्यास मनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:59 PM2019-02-02T14:59:30+5:302019-02-02T15:00:13+5:30
सेवाकार्याला नवा परिमाण आणि परिभाषा ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ आणि त्यांच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी दिली आहे.
मिलिंद कुलकर्णी
सेवा हाच ध्यास मनी
तैसेची कर्म जीवनी
वर्णू तयांची कौतुके
परंपरेचे पाईक होऊनी
हे ब्रीद ठेवत कार्य करणाऱ्या जळगावच्या केशवस्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता सहकारी बँकेनेतर्फे गेल्या ७ वर्षांपासून सेवाकार्य करणाºया व्यक्ती आणि संस्थांचा डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. सेवाभावी वृत्तीने कार्य करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या दोन्ही संस्थांनी सेवाकार्याचे मुकुटमणी असलेल्या डॉ.अविनाश आचार्य यांची स्मृती जपण्यासाठी सुरु केलेला हा पुरस्कार हा खºया अर्थाने सेवाकार्याचा सन्मान आहे. यापूर्वी हा पुरस्कार आरोग्यदूत रामेश्वर नाईक, समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव, नगरच्या स्रेहालयचे गिरीष कुळकर्णी यांच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांना देण्यात आला. त्यामुळे अल्पावधीत या पुरस्काराची उंची वाढली आहे. या दोन्ही संस्थांचे वैशिष्टय असे की, कोणतेही अर्ज, शिफारसी न मागवता संबंधितांचे कार्य पाहून, खातरजमा करुन पुरस्कारार्र्थींची निवड केली जाते. स्वत:चे २० ते २५ सेवा प्रकल्प सुरु असतानाही पुरस्कारप्राप्त मंडळींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन, त्यांच्या मार्गदर्शनाने तसा प्रकल्प जळगावात सुरु करण्याचा पायंडा हा प्रशंसनीय आणि अनुकरणीय असाच आहे. ‘समतोल’च्या विजय जाधव यांच्यापासून प्रेरणा घेत जळगावातही रेल्वे स्टेशनवर फिरणाºया मुलांना सुखरुपपणे घरी पोहोचविण्याचा प्रकल्प सुरु झाला. ‘स्नेहालय’ची प्रेरणा घेत मतिमंद मुलांसाठी ‘आश्रय’ नावाचे केंद्र सुरु केले. ‘आनंदाश्रम’ नावाच्या केंद्रात घरातील अडचणींमुळे वृध्दांना काही काळ याठिकाणी ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. सुमारे १००-१२५ ज्येष्ठ नागरिक काही काळानंतर परत आपल्या घरी गेलेले आहेत. सेवाकार्याला नवा परिमाण आणि परिभाषा ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ आणि त्यांच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी दिली आहे.
यंदाचे पुरस्काराथीदेखील तितक्याच तोलामोलाचे आहेत. नियती किंवा निष्ठुर समाजाने टाकून दिलेल्या अनाथ बालकांचे संगोपन आणि दत्तक पध्दतीने हक्काचे घर मिळवून देण्याचे कार्य करणाºया औरंगाबादच्या ‘साकार’ या संस्थेला गौरविले गेले. संस्थेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून यावर्षी होणाºया सन्मानाला विशेष महत्त्व आहे. आतापर्यंत ३३२ बालकांना हक्काचे घर मिळवून देण्यात आले. डॉ.पानट यांच्यासह समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत महिलांनी पुढाकार घेत ही संस्था चालविली आहे. समाजातील ही अनिष्ठ प्रथा बंद झाली तर ‘साकार’ संस्थेला कुलूप लावायला आम्हाला आनंद होईल. तो सुदिन लवकर येवो, अशी प्रांजळ भावना डॉ.पानट यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. त्यातून समाजातील हे भीषण वास्तव आणि या क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना यानिमित्ताने समाजासमोर आल्या.
गेवराई (जि.बीड) येथील सहारा अनाथालय, बालग्रामचे संतोष गर्जे हे दुसरे पुरस्कारार्थी होते. संवेदनशील हृदयाच्या संतोष गर्जे यांना बहिणीच्या मृत्यूनंतर अनाथ झालेल्या भाचीची हेळसांड अस्वस्थ करीत होती. त्यातच वडील परागंदा झाले. कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली असताना भाचीसह अशीच अवस्था असलेल्या इतर बालकांसासाठी अनाथालय सुरु केले. अवघ्या १९ व्या वर्षी हे कार्य करणाºया गर्जे यांनी आतापर्यंत १८० मुलांचे पुनर्वसन केले आहे. तर सध्या ९० मुले त्यांच्या ‘बालग्राम’ मध्ये राहात आहेत. दोन्ही पुरस्कारार्र्थींचा यथोचित गौरव आणि त्यांची हृदयाला हात घालणारी मनोगते ऐकून जळगावकर भावविभोर झाले.
रा.स्व.संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जळगावात प्रचारक म्हणून कार्य केलेल्या जोशी यांनी आयोजक संस्था, डॉ.आचार्य यांचे कर्तृत्व याविषयी गौरव करीत असताना मातृहृदयी व्यक्तीच चांगले सेवाकार्य उभे करु शकतात असे म्हणत पुरस्कारार्र्थींच्या कार्याचा सन्मान केला.