शाह खरे की भागवत ?

By admin | Published: March 30, 2016 03:17 AM2016-03-30T03:17:14+5:302016-03-30T03:17:14+5:30

खरे तर, वंदे मातरम्, भारत माता की जय किंवा हिंदुस्तान झिंदाबाद या घोषणा वादाचे विषय होणाऱ्या नाहीत. त्यांच्या मागे एक देदीप्यमान व अभिमानास्पद असा इतिहास आहे.

Shah kare ki Bhagwat? | शाह खरे की भागवत ?

शाह खरे की भागवत ?

Next

खरे तर, वंदे मातरम्, भारत माता की जय किंवा हिंदुस्तान झिंदाबाद या घोषणा वादाचे विषय होणाऱ्या नाहीत. त्यांच्या मागे एक देदीप्यमान व अभिमानास्पद असा इतिहास आहे. मात्र साऱ्या इतिहासाचे धर्मासारखेच राजकारण करण्याच्या सत्तारुढ पक्षाच्या व संघ परिवारातील संघटनांच्या दुराग्रहामुळे या घोषणांवरच आता देशाचे राजकारण पेटत असल्याचे दिसू लागले आहे. ‘मी माझ्या देशाची पूजा कशी करायची आणि त्याच्या जयजयकाराची घोषणा कोणती द्यायची हे ठरविणे हा माझा अधिकार आहे आणि तो मला परंपरेएवढाच घटनेनेही दिला आहे. मी अमूकच एक घोषणा दिली पाहिजे आणि ती मी देणार नसेल तर मी देशविरोधी ठरविला जाईल अशी धास्ती मला कधी वाटता कामा नये’ हा प्रत्येकाला वाटत असणारा विश्वासच त्याच्या खऱ्या नागरिकत्वाचे प्रतीक आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एकेकाळी प्राथमिक शाळेपासूनच मुलाना भारत माता की जय असे म्हणण्याची सवय लावली पाहिजे असे म्हटले होते. त्याची जास्तीची री ओढत व्यंकय्या नायडूंपासून अमित शाहपर्यंतचे भाजपाचे पुढारी आता ‘भारत माता की जय म्हणणार नसाल तर आम्ही तुम्हाला देशविरोधी ठरवू आणि तुम्हाला या देशात राहण्याचा अधिकार उरणार नाही’ अशी अतिरेकी भाषा बोलू लागले आहेत. दिल्लीत मोर नाचले की मुंबईतल्या लांडोरही आपोआप नाचू लागतात. महाराष्ट्र सरकारातले एक पोक्त मंत्री एकनाथराव खडसे यांनीही देशात राहायचे असेल तर भारत माता की जय म्हणा अन्यथा आम्ही तुमचा बंदोबस्त करू असा दम पुणेकरांना दिला आहे. एखाद्याने आपली देशभावना कशी व्यक्त करायची हे ठरवण्याचा अधिकार ना सरकारला आहे ना कोणत्या पक्षाला. मात्र संघ परिवारातील अशा अतिरेक्यांच्या दुराग्रहामुळे प्रथम हैदराबाद, मग दिल्ली, नंतर अलाहाबाद, पुढे जाधवपूर आणि आता पुणे इथपर्यंत या वादाने धार्मिक दुहीचे स्वरुप घेऊन विद्यार्थ्यांपासून साऱ्या समाजातच एका तेढीचे स्वरुप धारण केले आहे. दिल्लीत मोदींचे सरकार आल्यापासून देशाचे धार्मिक कसोटीवर विभाजन घडवून आणण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला. जे आमच्यासोबत नाहीत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे एका मंत्र्यानेच सांगून टाकले. मग इतरांनीही आपल्या अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली आणि देशाचे सारे वातावरण धार्मिक तेढीने कधी नव्हे तेवढे ग्रासून टाकले. एका बाजूला सूफी संतांच्या मेळाव्यात भाषण करताना मोदींनी ‘हा साऱ्यांचा देश आहे आणि त्यात सर्व धर्मांचे आणि त्यांच्या संतांचे स्वागत आहे’ असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी ‘भारत माता की जय न म्हणणाऱ्यांना देशाबाहेर हाकलण्याची’ भाषा करायची. अशावेळी सामान्य माणसांना पडणारा खरा प्रश्न, या दोघातले कोण खरे बोलतो आणि त्यांची पक्ष संघटना कोणाच्या निर्देशाप्रमाणे वागते हा आहे. हैदराबाद आणि दिल्लीत झालेला वाद विद्यार्थी परिषद या संघ परिवारातील संघटनेने सुरू केला. त्या वादाला देशभक्त विरुद्ध देशद्रोही असे स्वरुप देण्याच्या प्रयत्नात खोट्या चित्रफिती तयार करून त्या दूरचित्रवाहिनीवर दाखवण्यात आल्या. परिणामी त्या विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला त्याच्या सहकाऱ्यांसोबत देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात डांबले गेले. मात्र त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची न्यायालयाने दीर्घकालीन जामिनावर सुटका केली. हाच प्रकार इतर विद्यापीठातही करण्याचे प्रयत्न झाले. मात्र यातला प्रत्येक प्रयत्न आपल्या अंगलट येतो आणि आपल्या राजकारणाला एकारलेले स्वरुप येऊन इतरांना तो आपल्यापासून दूर करतो हे लक्षात आल्यानंतर प्रत्यक्ष संघानेच आपली भूमिका आता दुरुस्त केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच लखनौ येथे केलेल्या भाषणात भारत माता की जय म्हणण्याची सक्ती कोणावरही केली जाऊ नये, हा देश साऱ्यांचा आहे आणि त्यातल्या प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार या देशाची प्रार्थना करण्याचा हक्क आहे असे सांगून या वादापासून संघ दूर असल्याचे साऱ्यांना बजावले आहे. अशा वेळी पडणारा प्रश्न हा की, भागवतांची पूर्वीची भूमिका खरी की आताची? दुसरा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न, भागवतांची ताजी भूमिका भाजपा, विद्यार्थी परिषद, विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील इतर संघटना व त्यातील कडवे मान्य करणार आहेत काय? एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना राजधर्म सांभाळण्याची व साऱ्या जनतेला आपले मानण्याची संहिता शिकविली होती. मोदींवर तिचा किती परिणाम झाला ते नंतरच्या काळात देशाला दिसलेही. त्यांच्या सरकारने व पक्षाने सत्तेवर आल्यापासून जी भाषा वापरली ती या संहितेत बसणारी नव्हती. जेथे वाजपेयी हरले तेथे मोहन भागवत यशस्वी होतात काय ते आता पाहायचे. भागवतांची परिणामकारकता देशाच्या एकात्मतेसाठी गरजेचीही आहे.

Web Title: Shah kare ki Bhagwat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.