शह-काटशह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:03 PM2019-04-09T13:03:47+5:302019-04-09T13:05:23+5:30
सर्वाधिक चर्चा आपण राजकारण या विषयाचीच
मिलिंद कुलकर्णी
राजकारणाविषयी किती लोक चांगले बोलतात, हा प्रश्न आहेच. सगळे त्याला नावे ठेवत असतात. पण सर्वाधिक चर्चा आपण राजकारण या विषयाचीच करीत असतो, हे मान्य करावे लागेल. ‘डर्टी पॉलिटिक्स’ हा शब्द त्या अर्थाने रुढ झालेला असला तरी ‘राजकारण’ करणे येरा-गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी प्रचंड बुध्दिमत्ता, जनसंपर्क, आकाश-पाताळासह चोहोबाजूकडे सतर्क व सजगतेने पाहण्याची दृष्टी, हवेचा अंदाज, परिस्थितीचे भान, प्रतिस्पर्धी पक्ष आणि सहकाऱ्याच्या हालचालीचा अंदाज घेणे, कार्यकर्त्यांचे जाळे, वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमांमधील चर्चित विषयांची माहिती, स्वत: विषयी, नेत्याविषयी, पक्षाविषयी सुरु असलेल्या चर्चा आणि प्रवाह याविषयी सातत्याने अपडेट राहणे या गोष्टी एका राजकीय व्यक्तीकडून अपेक्षित केल्या जातात. एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या डायरेक्टर किंवा सीईओचेदेखील एवढे प्रोफाईल नसेल तेवढे राजकीय नेत्यामध्ये गुण अपेक्षिले आहेत.
एका जुन्या हिंदी चित्रपटातील प्रसंग आठवतो. त्यात बहुदा कादर खान या अभिनेत्याने एका मंत्र्याची भूमिका वठवली आहे. त्याच्या स्वीय सहायकाला तो सांगतो की, दुष्काळ किंवा महापूर यापैकी काहीही असेल तर आपण हवाई पाहणी करु. दुष्काळ असेल तर त्यांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि गुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करु, अशी प्रतिक्रिया द्या आणि महापूर असेल तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे पोहोचविण्याची आणि अडकलेल्या व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्याची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत, अशी प्रतिक्रिया माध्यमांपर्यंत पोहोचवा. जिथे जी परिस्थिती असले तेथे तशी प्रतिक्रिया द्या, असे सांगायला हा नेता विसरत नाही. आता ही समयसूचकता बुध्दिवान राजकीय नेत्याचा परिचय देत नाही का?
अलिकडचे समयसूचकतेचे उदाहरण बघा. राष्टÑवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुजय विखे, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशावर केलेली मार्मिक टिपणी तूफान लोकप्रिय झाली. ‘मुले पळविणारी टोळी आली आहे’ या प्रतिक्रियेचे पडसाददेखील खूप उमटले. घरात पोषण व्यवस्थित होत नसेल तर मुले इकडे तिकडे जातातच इथपासून तर स्वत:ला मुले होईना, आणि दुसऱ्यांची मुले मांडीवर घ्यायची हौस...इथपर्यंत प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे समर्थक आणि भाजपचे मुंबई महानगराध्यक्ष आशीष शेलार यांच्यातील कलगीतुरा प्रचंड गाजतोय. शिवाजीपार्कच्या बोरी, बारामतीकरांची स्क्रिप्ट असे शेलार ठाकरे समर्थकांना डिवचतायत तर ठाकरे समर्थक ‘हुकलेले मंत्रिपद’ म्हणून शेलारांच्या टीकेला मुद्दलासह प्रतिटीकेने उत्तर देत आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे लाडके पोलीस आयुक्त यांची अखेर निवडणूक आयोगाने बदली केली. याच आयुक्तासाठी बॅनर्जी यांनी कोलकत्यात उपोषण केले होते. सीबीआयने चौकशीचा पवित्रा घेताच बॅनर्जी यांनी आयुक्तांच्या घरी जाऊन ठिय्या मांडला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यापूर्वी सीबीआयच्या अधिकाºयांना चौकशीविना परत पाठवले होते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांची ईडीने कितीदा तरी चौकशी केली. आयकर विभागाने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांवर छापे मारले. २८१ कोटींची बेहिशोबी मालमत्तेचा शोध लावला. केंद्रीय यंत्रणांचा भाजप विरोधकांसाठी पूरेपूर वापर करीत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. अर्थात हे काही पहिल्यांदा होत नाही. आणीबाणीत विरोधकांना झालेली अटक, जनता पक्षाच्या काळात इंदिरा गांधी यांना झालेली अटक, तामिळनाडूत जयललिता व करुणानिधी यांनी सत्ता असताना एकमेकांना केलेली अटक हे शह-काटशहाचे राजकारण होते.
स्थानिक पातळीवर जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांची अश्लिल छायाचित्रे दोन महिने आधी प्रसारीत होणे, त्यांचे तिकीट कापणे, संबंधित महिलेने परस्पर संमतीने संबंध झाल्याची कबुली देत छायाचित्र प्रसारीत करणाºयाविरुध्द फिर्याद देणे, खासदार पाटील यांच्या पुतण्याविरुध्द विनयभंगाची फिर्याद दाखल होणे...हे षडयंत्र असल्याचा पाटील यांनी केलेला आरोप पाहता, राजकारणाची ही पातळी स्थानिक ठिकाणीही दिसून येत आहे. याच मतदारसंघात स्मिता वाघ यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी दाखल केलेली असताना शेवटच्या दिवशी तिकीट कापणे म्हणजे ‘कोल्ड ब्लडेड मर्डर‘ असे वाघ दाम्पत्याने केलेले वर्णन राजकारणी किती पराकोटीच्या संघर्ष पातळीवर पोहोचले आहते, हे अधोरेखित करते. म्हणून, राजकारण हे सामान्य माणसाचे काम नाही. प्रचंड बुध्दिवान मंडळीच या गोष्टी करु शकतात, हे मान्य करावेच लागेल.