शहा मास्तरांचा तीन दिवसांचा क्लास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 12:55 AM2017-06-19T00:55:07+5:302017-06-19T00:55:07+5:30

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात

Shah Master's three-day class | शहा मास्तरांचा तीन दिवसांचा क्लास

शहा मास्तरांचा तीन दिवसांचा क्लास

Next

क्लास शांततेत सुरू आहे की नाही, मुले शिकवण्याकडे किती लक्ष देतात आणि मुख्य म्हणे शिक्षक चांगले शिकवत आहेत की नाही, हे बघण्यासाठी हेडमास्तर नेहमीच शाळेचा राऊंड घेत असतात. ते खिडकीबाहेर दिसले तरी मुले लगेच शिकण्यात मग्न असल्याचे भाव चेहऱ्यावर आणतात. हेडमास्तर निघून गेले की चुळबुळ, गोंधळ सुरू होतो. पण हेडमास्तर स्वत: क्लास घ्यायला येणार असतील तर? जाम टेन्शन येतं. असेच टेन्शन गेले तीन दिवस भाजपाच्या नेत्यांनी अनुभवले. हेडमास्तरी खाक्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा तीन दिवसांचा क्लास घेतला. क्लास टीचर देवेंद्र फडणवीस यांच्या शिकवण्यावर (कारभारावर) त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त तर केलेच, शिवाय त्यांच्या नेतृत्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असेही सांगून टाकले. भाजपा श्रेष्ठी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यावरून स्पष्ट झालं. शेतकरी आंदोलन नीट हाताळले नाही, तुरीच्या मुद्यावर सरकारची पंचाईत झाली असे ‘फीलर्स’ दिल्लीत गेले काही दिवस पाठविले जात होते. त्यामागे फडणवीस यांना हटवून अन्य कुणाला मुख्यमंत्री करा, हा उद्देश नव्हता. कारण सहावा मजला आपल्यासाठी दूर आहे, याची जाणीव भाजपातील सर्वांनाच आहे. पण गेल्या काही महिन्यांतील अशांत वातावरणासाठी फडणवीस यांना लक्ष्य करावे आणि त्यानिमित्ताने श्रेष्ठींच्या दरबारी त्यांना किमान नजर तरी लागावी, असा उद्देश होता. शहा यांनी फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे मुंबई भेटीत बिनदिक्कतपणे सांगत सर्वच शक्यतांवर पडदा टाकला. मुख्यमंत्री हे इतर मंत्र्यांना विश्वासात घेत नाहीत. सर्व ठिकाणी फक्त त्यांचेच फोटो असतात, अशा कुरबुरीदेखील दोन मंत्री दबलेल्या आवाजात करीत असतात. मात्र, फडणवीस यांचे टीम वर्क अतिशय चांगले आहे आणि ते सगळ्यांना घेऊन राज्याचा कारभार करीत असल्याचं प्रमाणपत्रही शहा यांनी देऊन फडणवीस यांना शाबासकी दिली. करडी नजर आणि शिस्तीच्या त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुणाची प्रशंसा करणे, हे दुरापास्तच असल्याचे भाजपाचे नेते सांगतात. या पार्श्वभूमीवर शहांनी केलेलं कौतुक महत्त्वाचे ठरते.
राज्यात मध्यावधी निवडणुकीला आम्ही तयार असल्याचे विधान शहांच्या मुंबई भेटीच्या एक दिवस आधी करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. तथापि, मध्यावधी होणार नाही, फडणवीस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे अमित शहांनी त्याच्या तिसऱ्याच दिवशी सांगून टाकले. भाजपाशिवाय मध्यावधी निवडणूक आज कोणत्याही पक्षाला आर्थिकदृष्ट्या सोसणार नाही. आता मध्यावधीची खुमखुमी असलेले शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष उद्या खरेच निवडणूक लागली तर अर्धे रिकामे झालेले दिसतील, हे लिहून ठेवा. एकदाची मध्यावधी निवडणूक घेऊनच टाकावी आणि पूर्ण बहुमत मिळवून शिवसेनेची साथ सोडावी, असे भाजपातील काही नेत्यांच्या मनात आहे. मात्र, मध्यंतरी संघर्ष यात्रेच्या प्रवासात एकमेकांच्या जवळ आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांनी उद्या मॅडम वा साहेब काहीही म्हणोत यापुढे विधानसभेची निवडणूक युती करूनच लढवायची, असे ठरवून टाकले आहे. उद्या मध्यावधी झालीच तर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढतील. भाजपाने सर्वच मतदारसंघांमध्ये ताकद वाढविण्याची भूमिका घेतलेली आहे. याचा अर्थ शिवसेनेशी युती करण्याचा भाजपाचा मूड नाही. १२२ जागा जिंकलेल्या भाजपाला जागावाटपात शिवसेनेपेक्षा कमी वाटा कदापिही मान्य होणार नाही. शिवसेना लहान भाऊ होणे मान्य करणार नाही. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीची शक्यता नाही. म्हणजे हे दोघे एकमेकांविरुद्ध लढतील आणि त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रितपणे लढतील. या दोघांचे एकत्र येणे अपरिहार्य असले तरी त्याचा मोठा फटका भाजपाला बसेल. त्यामुळे आज हा पक्षदेखील मध्यावधीच्या मूडमध्ये नाही. निवडणूक कोणालाही नको आहे, असा त्याचा अर्थ आहे.
- यदु जोशी

Web Title: Shah Master's three-day class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.