शहीद भगतसिंग : किल्ल्याच्या खंदकावर स्वत:च्या शरीराचे पूल तयार करणारे युवक कोणत्या पोलादापासून बनले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:58 AM2017-10-01T02:58:42+5:302017-10-01T02:58:56+5:30

आज अमेरिकन साम्राज्यशाही अशा अन्यायाविरुद्ध लढणा-या अनेकांचे बळी घेताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. भगतसिंग यांचे विचार आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहेत.

Shaheed Bhagat Singh: The youth who built their own bridge on the ditch of the fort were made of which steel | शहीद भगतसिंग : किल्ल्याच्या खंदकावर स्वत:च्या शरीराचे पूल तयार करणारे युवक कोणत्या पोलादापासून बनले होते

शहीद भगतसिंग : किल्ल्याच्या खंदकावर स्वत:च्या शरीराचे पूल तयार करणारे युवक कोणत्या पोलादापासून बनले होते

Next

- डॉ. मारोती तेगमपुरे

आज अमेरिकन साम्राज्यशाही अशा अन्यायाविरुद्ध लढणा-या अनेकांचे बळी घेताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. भगतसिंग यांचे विचार आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहेत. कारण भारतीय समाजासमोर जात्यांध व धर्मांध शक्तीचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत कुठलातरी मसीहा आपणास वाचवेल अशी भाबडी अपेक्षा न बाळगता, देशातील युवकांनी भगतसिंग यांचा विचार समजून घेऊन धडक कृती करण्याची गरज आहे.

‘‘जगाच्या इतिहासाची पानं उघडून पाहा, युवकांच्या रक्ताने लिहिलेले अमर संदेश आढळतील! जगातल्या सगळ्या क्रांतींची, स्वातंत्र्य युद्धांची वर्णनं पाहा, त्यात केवळ ते युवकच भेटतील, ज्यांना बुद्धिवंतांनी माथेफिरू, वाट चुकलेले म्हणून हीनवले आहे. पण जे सुरक्षित किल्ल्यात बसले आहेत त्यांना काय कळणार किल्ल्याच्या खंदकावर स्वत:च्या शरीराचे पूल तयार करणारे युवक कोणत्या पोलादापासून बनले होते!’’ या वाक्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे २८ सप्टेंबर रोजी साजरी झालेली भगतसिंग यांची जयंती. उपरोक्त वाक्य त्यांचेच. हसत फासावर जाणाºया या शहिदांनी नेमकेपणे कोणत्या स्वप्नांसाठी आपले आत्मबलिदान दिले आणि आज देशाची स्थिती काय आहे हे समजून घेऊन त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणे हेच खºया अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.
आज देशातील विशिष्ट समाजगट वैचारिक पातळीवर ज्यांच्याशी त्यांचे कधी पटले नाही, अशा महामानवांच्या विचाराच्या पूर्णत: विरोधी कृत्ये ज्यांची राहिलेली आहेत, तेही महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग यांच्यावर हक्क सांगू लागले आहेत. या महामानवांच्या विचार आणि जीवनकार्यात सरमिसळ करून मांडणी करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भगतसिंगांचे क्रांतीविषयक विचार काय आहेत हे समजून घेणे औचित्याचे ठरेल. भगतसिंगांचे जीवनकार्य आणि विचार यामधील चार सुस्पष्ट आणि सामर्थ्यशाली पैलू -
१. साम्राज्यवादाविरुद्ध विनातडजोड संघर्ष
२. धर्मांधता व जातपातवादाशी कायमचे शत्रुत्व
३. भांडवलदार-जमीनदार वर्गाच्या राजवटीला ठाम विरोध आणि महत्त्वपूर्ण म्हणजे
४. मार्क्सवाद व समाजवाद हा देशासमोरील एकमेव पर्याय असल्याची डोळस निष्ठा. भगतसिंगांना अभिवादन करताना या विचारसूत्राकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे भगतसिंगांचे नामस्मरण करणाºयांनी लक्षात घेतले पाहिजे.
‘अखेरच्या संदेशात’ (२ फेब्रुवारी १९३१) क्रांतीविषयी शहीद भगतसिंग म्हणतात, ‘क्रांती म्हणजे सध्या अस्तित्वात असणारी समाज व्यवस्था संपूर्णपणे उलथवून टाकून तिच्या जागी समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे, या ध्येयाच्या पूर्तीसाठी आपले ताबडतोबीचे उदिष्ट्य आहे सत्ता हस्तगत करणे. वस्तुस्थिती अशी आहे की, राज्यसंस्था, शासकीय यंत्रणा हे एक सत्ताधारी वर्गाच्या हातातले स्वत:चे हितसंबंध राखण्यासाठी व जोपासण्यासाठी वापरायचे हत्यार आहे. आम्हाला ते हिसकावून घेऊन आमच्या ध्येयपूर्तीसाठी हाताळायचे आहे, वापरायचे आहे. आमचे ध्येय आहे एका नव्या पायावर, मार्क्सवादाच्या पायावर समाजाची पुनर्रचना करणे.’ अशा स्वरूपाची स्पष्ट भूमिका घेऊन कार्य करणाºया क्रांतिकारकास केवळ तेवीस वर्षे आठ महिन्यांचेच आयुष्य उपभोगता आले. ब्रिटिश साम्राज्यशाहीने त्यांचा बळी घेतला. आज अमेरिकन साम्राज्यशाही अशा अन्यायाविरुद्ध लढणाºया अनेकांचे बळी घेताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. भगतसिंग यांचे विचार आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहेत. कारण भारतीय समाजासमोर जात्यांध व धर्मांध शक्तीचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत कुठलातरी मसीहा आपणास वाचवेल अशी भाबडी अपेक्षा न बाळगता, देशातील युवकांनी भगतसिंगांचा विचार समजून घेऊन कृती करण्याची गरज आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील ७७ टक्के लोकांना दिवसाकाठी २० रुपयांपेक्षाही कमी उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह (असंघटित क्षेत्रातील) करावा लागत असल्याचे अर्थतज्ज्ञ अर्जुन सेन गुप्ता कमिटीने मधल्या काळात सिद्ध केले आहे. हे विदारक वास्तव आणखी किती दिवस आपण गोंजारणार आहोत? अलीकडील काळात तर देशातील नियोजन मंडळच रद्द करून नीति आयोगाची निर्मिती केली असून, अजून तरी दारिद्र्य निर्मुलनासंदर्भात नीती स्पष्ट झालेली नाही. आज आम्ही पाहतो आहोत देशातील ६८ टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. केवळ एका खोलीत उदरनिर्वाह करणाºयांचे प्रमाण ३७ टक्के इतके मोठे आहे. अजूनही देशातील एक तृतीयांश घरांत विजेची जोडणंी नाही. जवळपास २० कोटींहून अधिक तरुणांच्या हाताला काम नाही. ज्यांच्या हातात काम होते त्या ४० लाखांपेक्षा अधिक लोकांना निश्चलीकरणानंतरच्या काळात रोजगार गमवावा लागला आहे. दरवर्षी एक कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन हे आश्वासनच राहिले आहे. याबरोबरच दुसºया पातळीवर वैश्विक साम्राज्यवादाच्या वाढत्या आक्रमणाने जगभरात भूक, दारिद्र्य, बेरोजगारी आणि सर्वांगीण पातळीवरील विषमतेचे विष वेगाने फैलावत चालले आहे. या वेळी भगतसिंगांनी दिलेल्या त्या गगनभेदी घोषणेची आठवण होते आहे.
‘‘साम्राज्यवाद हो बर्बाद-इन्कलाब जिंदाबाद!’’
अनेक जुलमी कायद्यांच्या विरोधात भगतसिंग यांना प्राणपणाने लढावे लागले. त्या पद्धतीचे जनमानस उद्ध्वस्त करणारे मोठ्या प्रमाणात कायदे केले जात असताना आपण मात्र शांतच आहोत. बेरोजगारांची फौज वाढत असताना नोकरभरती मात्र बंद आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाचे दाम पडूनही (५४ डॉलर प्रति बॅरल इतके कमी होऊनही) सामान्य देशवासीयांना त्याचा लाभ होत नाही. त्यांना आजही ८० रुपयांपेक्षा अधिक
किंमत मोजावी लागते. यावर प्रधानसेवक कोणतेही भाष्य ठेवत नाहीत. ‘मेक इन इंडिया’सारख्या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात असली तरी प्रत्यक्ष हाताला अजून तरी काहीही लागले नाही.
एकूण काय तर भगतसिंगांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावयाचा असेल, सर्वांना समान पातळीवरील सन्मानजनक जीवनमान द्यावयाचे असेल तर व्यक्तिकेंद्रित नेत्यांची देशाला गरज नसून नवउदारवादी धोरणांना तिलांजली देणाºया व सामान्यांचे कल्याण साधणाºया भगतसिंगांच्या समाजवादी नीतीची देशाला गरज आहे. याप्रसंगी भगतसिंगांच्या त्या वाक्याची आठवण करून देणे सयुक्तिक ठरेल.
‘‘अगर कोई सरकार जनता को, उसके मूलभूत अधिकारोंसे वंचित रखती है, तो उस देश की जनता का यह अधिकारही नही, बल्की आवश्यक कर्तव्य बनता है की, एैसी सरकार को तबाह कर दे!’’
(लेखक महाविद्यालयात
अर्थशास्त्र विभागप्रमुख आहेत.)

Web Title: Shaheed Bhagat Singh: The youth who built their own bridge on the ditch of the fort were made of which steel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.