हार्दिकच्या अनुपस्थितीत शाह यांचा पराभव
By admin | Published: September 12, 2016 12:29 AM2016-09-12T00:29:22+5:302016-09-12T00:29:22+5:30
सु रत या नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात अमित शाह यांनी पटेल समाजात फूट पाडण्यासाठी आयोजित केलेली सभा पटेलांना आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांनी उधळून लावली
सुरत या नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात अमित शाह यांनी पटेल समाजात फूट पाडण्यासाठी आयोजित केलेली सभा पटेलांना आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांनी उधळून लावली असेल तर ते गुजरातमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे एक पूर्वचिन्ह समजले पाहिजे. पटेल समाजातील धनवंतांना एकत्र करून त्यांचा हा मेळावा गुजरातचे हिऱ्याचे व्यापारी महेश सावनी यांनी आयोजित केला होता. त्याला अमित शाह यांच्यासह गुजरातचे नवे मुख्यमंत्री विजय रुपानी, जुन्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, अनेक केंद्रीय मंत्री व राज्य विधानसभेचे ४४ पटेल आमदार उपस्थित होते. पटेलांचा वर्ग हार्दिक पटेल या तरुण आंदोलकासोबत नसून आमच्यासोबत आहे हे दाखविणे हा या मेळाव्याचा व त्यातील पुढाऱ्यांच्या सत्काराच्या सोहळ्याचा खरा उद्देश होता. हिरे, सोने, जमिनी, खाणी, कापड व मोठा व्यापार यात प्रचंड कमाई केलेल्या धनवंत पटेलांची अर्थातच त्यात मोठी गर्दी होती. मोदींचा तो बहुचर्चित सूट या मेळाव्यात नव्याने लिलावात काढला जायचा होता. भाजपामधील धनाढ्यांंचे हे प्रकरण प्रत्यक्षात पटेल समाजात गरीब विरुद्ध श्रीमंत अशी फूट पाडण्यासाठी आहे आणि त्यातला श्रीमंतांचा वर्ग मोदी आणि शाह यांच्या बाजूने आहे हे उघड होताच, पटेलांसाठी आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांचा वर्गही संघटित होऊन सभास्थानी आला. त्याने सभा उधळली, खुर्च्या फेकल्या, व्यासपीठाची मोडतोड केली आणि कोणत्याही पुढाऱ्याला पाच ते दहा मिनिटापलीकडे त्याचे भाषण त्यानी करू दिले नाही. सारा काळ आंदोलकांचा वर्ग ‘हार्दिक हार्दिक’ अशा घोषणा आपल्या नेत्याच्या नावाने देत होता. हार्दिक पटेल हा नेता यावेळी उदयपूर विभागात त्याच्यावर असलेली जामिनाची बंधने सांभाळून थांबला आहे. सुरतमधील त्याचे अनुयायी ‘जय सरदार, जय पाटीदार’ अशा घोषणा देत होते आणि त्या घोषणांच्या जोरापुढे व्यासपीठावरून दिली जाणारी ‘मोदी की जय’ ही घोषणा पार फिकी पडली होती. हा सारा प्रकार एवढ्या सविस्तरपणे सांगण्याचे खरे कारण देशातील जनमानसाचे बदलते स्वरूप लक्षात घेणे हे आहे. नेते असतात, ते येतात, ते बोलतात, त्यांच्या आश्वासनांचे फुगे हवेत उडत राहतात मात्र त्या साऱ्याचा जनतेच्या जमिनीवरच्या जीवनाशी काहीएक संबंध नसतो. लोक आपले प्रश्न उराशी कवटाळून असतात आणि ते सुटावे याची प्रतीक्षा करीत असतात. नेते पाकिस्तानवर बोलतात, काश्मीरवर बोलतात, देश, धर्म, राम आणि अन्य देवतांवर बोलतात. लोकांच्या प्रश्नांबाबत मात्र बोलत नाहीत. शिवाय एकेकाळच्या काँग्रेसमधील मध्यम प्रतीच्या पुढाऱ्यांसारखे ते लोकांतही मिसळत नाहीत. त्यांचे रथ जमिनीवरून न चालता हवेतून फिरत असावे आणि त्यांच्या माथ्यांचा संबंध पायांशी उरला नसावा अशीच त्यांची वागणूक व बोलणे असते. परिणामी आपल्यात राहणारा, आपल्यासारखेच बोलणारा व वागणारा हार्दिक हा २२ वर्षे वयाचा मुलगा लोकांना आपला प्रतिनिधी वाटू लागतो. लोकांशी संबंध न राखणारे आणि आपल्याच हवेत राहणारे पुढारी फार लवकर लोकातून बाद होतात. आनंदीबेन पटेल हे त्याचे लक्षणीय उदाहरण आहे. देशातील शेतकऱ्यांचा पहिला व आजवरचा सर्वात मोठा लढा वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वात १९२० च्या दशकात व गुजरातमध्ये झाला. सरकारने शेतकऱ्यांना तुरुंगात डांबले, त्यांच्या जमिनी जप्त केल्या. पण जप्त केलेल्या जमिनींच्या लिलावात बोली बोलायला देशातला एकही जण पुढे आला नाही. पटेल समुदायाच्या संघटित शक्तीची ताकद तेव्हा प्रथमच ब्रिटिशांच्या व भारताच्याही लक्षात आली. त्याच लढ्याने वल्लभभार्इंना सरदार हा जनतेचा किताब मिळवून दिला. पटेल समुदायाच्या सध्याच्या आंदोलनातील मुलांना तुरुंगात डांबून आणि त्यांच्यावर देशद्रोहाचे खटले (तसा कोणताही कायदा वा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नसताना) लादून त्या समाजाला दाबून टाकता येईल हा सरकारचा भ्रम आहे. त्यातले हिरेवाले आणि मोतीवाले धनवंत जमवून त्यात फूट पाडता येईल हाही त्याचा गैरसमज आहे. अखेर हिरेवाले आणि धनवंत यांचा कोणताही पक्ष नसतो. त्यांना कोणतीही राजकीय निष्ठा नसते. तो वर्ग नेहमी सत्तेच्या बाजूने व तिच्या आश्रयाने उभे होण्यात आपली सुरक्षितता शोधत असतो. परवापर्यंत काँग्रेस सत्तेत होती त्यामुळे हा वर्ग काँग्रेससोबत होता. आता सत्ता भाजपाच्या हाती आहे म्हणून तो भाजपाकडे वळला एवढेच यातले सत्य. गरीब माणसे आपल्या राजकीय निष्ठा जेवढ्या जपतात तेवढ्या त्या या धनवंत वर्गाला त्याच्या हितसंबंधांपायी जपता येत नाहीत हे यातले वास्तव शाह आणि त्यांचे सूटवाले सहकारी जेवढ्या लवकर समजून घेतील तेवढे ते त्यांच्या हिताचे ठरणार आहे. देशातला सामान्य माणूसच तेवढा राजकीयदृष्ट्या शाबूत व स्थिर असतो. इतरांच्या स्थैर्याला हितसंबंधांची जोड असल्याने ते फारसे न टिकणारे असते. ही भारतातीलच नव्हे तर साऱ्या जगातील राजकीय अवस्था आहे व ती किमान सत्ताधारी असणाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. हार्दिक पटेल हा एकटा तरुण सुरतेच्या व्यासपीठावर जमलेल्या सगळ्या भाजपाच्या राष्ट्रीय व प्रादेशिक पुढाऱ्यांना तेथे हजर न राहताही भारी पडला याचा अर्थ याहून वेगळा असत नाही.