बळीराजाचा राजा... शाहू महाराज शेती व शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 10:55 AM2020-06-26T10:55:19+5:302020-06-26T11:00:12+5:30
शेती हा अपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तेव्हा ‘शेतीचा उद्धार म्हणजे शेतकºयांचा उद्धार,पर्यायाने देशाचा उद्धार,’ हे सूत्र ध्यानात घेऊन राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात शेतीसाठी मूलभूत सुधारणा केल्या
सुजलाम्, सुफलाम् महाराष्ट्रच नव्हे तर सारा देशच गेली काही वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी आक्रंदून गेला आहे. देशात आतापर्यंत तब्बल १ लाख ३५ हजार ५८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती आहे. देशात वर्षाला सरासरी १२ हजार शेतकरी आत्महत्या करतात. एकट्या महाराष्ट्रात एका वर्षात तब्बल ३ हजार शेतकरी जीवन संपवितात. चांगला मान्सून होऊनही जानेवारी ते मार्च २०१७ पर्यंत ६३७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची सरकारचीच माहिती आहे. वाढते कर्जबाजारीपण, हमीभाव मिळण्यात अडचणी, सरकारची अस्थिर धोरणे आणि तोट्यातील शेती ही त्याची प्रमुख कारणे आहेत. यंदाचे वर्षही शेतकºयांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीच्या आंदोलनाने ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘रयतेचा राजा’ अशीच ज्यांची ओळख होती त्या राजर्षी शाहू महाराज यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त हा आढावा. शाहू महाराजांचे शेती, शेतकरी यांच्याबद्दलचे धोरण कसे होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. त्यातून सध्याच्या राज्यकर्त्यांना काही धडा मिळाला तरी शाहूंचा जयजयकार करण्याचा हेतू साध्य झाला, असे समजता येईल.
विश्वास पाटील
कोल्हापूरच्या समृद्धीचे जनक
शेती हा अपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तेव्हा ‘शेतीचा उद्धार म्हणजे शेतकºयांचा उद्धार,पर्यायाने देशाचा उद्धार,’ हे सूत्र ध्यानात घेऊन राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या संस्थानात शेतीसाठी मूलभूत सुधारणा केल्या. त्याला जोड म्हणून नवनवीन उद्योगधंदे सुरू केले आणि या उद्योगधंद्यांना सहकार तत्त्वाची ऊर्जा दिली म्हणूनच महाराष्ट्रात आज कोल्हापूर जिल्हा शेती, सहकार व उद्योगंधदे या तिन्ही क्षेत्रांत आघाडीवर दिसतो. कोल्हापूरच्या या प्रगतीचा पाया शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी घातला.
स्वतंत्र पाटबंधारे धोरण
शाहू महाराजांचे प्रजानन बहुसंख्य शेतकरीच होते आणि त्यांची स्थिती देशातील अन्य भागांतील शेतकºयांहून वेगळी नव्हती. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या पर्वात (सन १८९६-९९), संस्थानात पडलेल्या भयंकर दुष्काळात, महाराजांनी अन्नधान्याचा व गवत चाºयाचा वेळीच पुरवठा केल्यामुळे हजारो लोकांचे व जनावरांचे प्राण वाचले होते. हे खरे पण एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नव्हते. वारंवार पडणाºया दुष्काळासारख्या संकटावर मात करण्यासाठी शाहू महाराजांनी संस्थानासाठी अपूर्व असे ‘सार्वत्रिक पाटबंधारे धोरण’ जाहीर केले. त्यासाठी त्यांनी खास ‘इरिगेशन आॅफिसर’ची नेमणूक केली. या खात्यामार्फत संस्थांनातील प्रत्येक गावाची, पाटबंधाºयाच्या दृष्टीने तपशीलवार पाहणी करण्यात आली. नव्या-जुन्या विहिरी, छोटे-मोठे तलाव, लहान-मोठे बंधारे या सर्वांच्या नोंदी त्यांनी करून, त्यांच्या दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली. नव्या विहिरी,नवे तलाव व छोटे-छोटे बंधारे यांच्या योजना तातडीने अंमलात येऊ लागल्या. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचे धोरण पहिल्यांदा शाहू महाराजांनी राबविले. त्याचे महत्त्व शंभर वर्षांनंतर आपल्याला आता उमगले आहे. शाहू किती पुढचा विचार करत होते याचेच हे उदाहरण.
----------
आपण येथून निघून गेल्यावर, मी सुमारे २० बंधारे बांधले, पण माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली नाही म्हणून मी आता एक मोठा सिंचन प्रकल्प हाती घेणार आहे. संपूर्ण भारतात मोठा असा तो प्रकल्प असणार आहे. त्यासाठी मी माझी पूर्ण शक्ती लावत आहे. ही योजना यशस्वी व्हावी हीच माझी अंतरीची इच्छा आहे.
- राजर्षी शाहू महाराज
(कर्नल फेरिस या इंग्रजी अधिकाºयास लिहिलेल्या पत्रात)
(महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांत २० हजार कोटी रुपये खर्चूनही एक टक्काही सिंचन वाढले नाही. कारण आपल्या राज्यकर्त्यांची मोठ्या पाटबंधारे प्रकल्पाचे काम सुरू करून कसे आपले घर भरेल ही अंतरीची इच्छा राहिली. या वास्तवाकडे पाहिले की शाहूंचे थोरपण नजरेत भरते.)
------------------------------
राधानगरी धरण : देशातील सर्वांत मोठे धरण
शाहू महाराजांनी जगभर प्रवास केला. जगात आपण कुठे जे-जे चांगले पाहू ते आपल्या संस्थानात सुरू करण्यावर त्यांचा भर राहिला. खरा राज्यकर्ता असाच असावा लागतो. शाहू महाराज सन १९०२ ला युरोपला गेले होते. तिथे भौतिक प्रगतीने प्रभावित झाले. निसर्गातील साधनसंपत्ती किती खुबीने समृद्धीसाठी वापरता येते हे तिथे त्यांनी पाहिले. तेथील धरणे पाहून आपणही अशी धरणे का बांधू नयेत, असा विचार त्यांच्या मनात आला. सह्याद्रीच्या माथ्यावर शेकडो इंच पाऊस पडतो. तेथून उगम पावणाºया नद्या पावसाळ््यात दुथडी भरून वाहतात आणि उन्हाळा सुरू झाला की नद्या कोरड्या पडतात. सह्याद्रीत कोसळणाºया पावसाचे पाणी अडवून देशावरच्या काळ््याभोर तृषार्त जमिनीस दिले गेले तर ही भूमी खºया अर्थाने सुजलाम् सुफलाम् होईल असा आशावाद त्यांच्यात निर्माण झाला. याच आशावादातून राधानगरी धरणाची पायाभरणी झाली. कोल्हापूरसारख्या जेमतेम २० ते ३० लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या संस्थानाने अशा मोठ्या धरणाच्या कामास हात घालणे सामान्य गोष्ट नव्हती. आजचा विचार करता एखाद्या जिल्ह्याने कोयना धरण उभारण्यास हात घालण्यासारखे होते. आपले जीवितकार्य म्हणून महाराजांनी या प्रकल्पाकडे पाहिले.
-----------
असे झाले धरण...
राधानगरी धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सन १९०९ ला सुरू झाले. १९१८ सालापर्यंत त्यावर १४ लाख रुपये खर्ची पडले होते. ४० फुटांपर्यंत बांधकाम झाले. या कामावर ३ हजार गवंडी व मजूर काम करत होते. हा प्रकल्प राबविताना महाराजांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले परंतु महाराज डगमगले नाहीत. पुढे निधीच्या कमतरतेमुळे बांधकाम काही काळ थांबले तरी धरणात साठणाºया पाणाच्या साठ्यातून दरवर्षी ६०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ लागले. या धरणाचे काम पुढे १९५७ ला पूर्ण झाले. कोल्हापूर जिल्ह्याच्या हरितक्रांतीची बिजे या धरणाने रूजवली.
जाहीरनामा नंबर ४८
३ फेब्रुवारी १०९२ (भाग एक)
करवीर इलाख्यात दुष्काळचा प्रतिबंध करण्यासाठी इरिगेशनचे काम चालू करणेबद्दल मि.शंकर सिताराम गुप्ते यांस इरिगेशन आॅफिसर नेमण्यात आल्याबद्दल वगैरे हुजरून नंबर १०४, तारीख २३ जानेवारी सन १९०२ चे आज्ञेंत आले ते खाली लिहिलेप्रमाणे :
दुष्काळचा प्रतिबंध करण्यास पाट बांधाºयाच्या कामाचा (इरिगेशनचा) फार उपयोग होतो, असे नजरेस आल्यावरून मोठ-मोठ्या तळ््यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. ह्या तळ्यांचा व संस्थानांतील इतर तळ्यांचा व विहिरींचा इरिगेशनचे कामी जास्त उपयोग व्हावा या हेतूने त्याकामी पब्लिक वर्क्स खात्यात इरिगेशन डिव्हीजन निराळी करण्यात येऊन त्यांजवर मि. शंकर सिताराम गुप्ते यांस इरिगेशन आॅफिसर नेमण्यात आले आहे. त्यांनी प्रथमत: खाली लिहिलेले माहितीचा रिपोर्ट सत्वर करणेचा :-
संस्थानात इरिगेशन होणेचे तलाव कोठे आहेत, त्यास पाण्याचा पुरवठा कोठून होतो, वर्षभर प्रत्येक तिमाही किती पाणी येते, किती पाण्याचा उपयोग करता येईल, ताल बांधून पाणी आल्यास गाळ कोणत्या जातीचा येईल, त्यापासून शेतीस फायदा अगर गैरफायदा होईल वगैरे गोष्टींबद्दल माहिती खुलासेवार घ्यावी. असलेल्या तलावाचे पाण्याच्या इरिगेशनचे कामे उपयोग होईल की नाही, होत असल्यास आदमासे किती एकर जमीन भिजेल व त्यास खर्च काय येईल, ज्या तलावाचे इरिगेशनपासून सरकारास थोडे उत्पन्न येऊन रयतेस फायदा लवकर मिळणेजोगा असेल अशा तलावांबद्दल इरिगेशन प्रोजेक्ट लवकर तयार करून पूर्ण हकिकतीचा वेगळा रिपोर्ट करावा.
संस्थानात असलेले तलाव, सरकारी व खासगी विहिरीवर किती एकर जमीन भिजते याचा प्रत्येक तालुक्याचा गाववार निराळा तक्ता तयार करण्यात यावा. या तक्त्यात विहिरीचे पाणी किती मोटास किती दिवस पुरते व त्यावर कोणत्या जातीचे किती एकर पिके दरसाल होतात व विहीर सुधारण्याजोगी आहे की कसे, ही माहिती असावी. तलावाचीही त्याचप्रमाणे माहिती घेऊन निराळा तक्ता करण्यात यावा. तक्त्याचा नमुना आपल्याकडून जावा व त्याची एक प्रत हुजुर पाठवावी.
या डिव्हिजनकडे एक ड्राफ्टस्मन पगार २०, एक मेस्त्री पगार १५, एक कारकून पगार १२ याप्रमाणे व सर्व्हेस लागणारे सामानांकरिता तूर्त ६०० रुपयांची ग्रान्ट मंजूर केली आहे. सदरहूसंबंधी मी गुप्ते व रावसाहेब विचारे यांचा अभिप्राय मागवून तो आपले अभिप्रायासह हुजूर पाठवावा. सदर इरिगेशन आॅफिसर यास प्रत्येक तालुक्यातील रेव्हून्यू आॅफिसरकडून लागेल ती माहिती व जरूर लागल्यास योग्य ती मदत ताबडतोब देण्यात यावी. म्हणून वगैरे आज्ञेंत आले आहे.
- आर. व्ही. सबनीस, दिवाण सरकार करवीर
----------------------------------
शेतकी शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज
देशभर व महाराष्ट्रातही कर्जमाफीचे वादळ घोंघावत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीवर सरसकट, तत्त्वत: व निकष लावून अशी टीका होत असताना शाहू महाराजांनी शेतीसाठी अनेक योजना राबविल्याच; परंतु शेतकी शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाºया विद्यार्थ्यास बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यासंबंधीच्या ठरावात महाराज म्हणतात, (ठराव क्रमांक ९९०)
अव्वल. रा. ब. दिवाण नि. सरकार करवीर यांजकडे, रामचंद्र धोंडो शेळके, रा. कोल्हापूर हे मराठे गृहस्थ अॅग्रिकल्चर शिकण्याकरिता अमेरिकेस जाणार असल्याने त्यांचे समक्ष विनंतीवरून यास सदर कामाकरिता १५०० रुपये बिनव्याजी कर्जाऊ अगर तसलमात देणेत यावी. सदरहू इसमाची खुद्द खात्याची मालकीची व वहिवाटीची जमीन एक्लूज पेटा, पन्हाळा येथे आहे, असे ते म्हणतात. करिता सदरची जमीन सदर रकमेचे फेडीस तारण लावून देण्यात यावी. (१५००) रकमेची फेड करण्यास त्यास ६ वर्षांची मुदत द्यावी. रीती प्रो करार लिहून घेऊन रक्कम त्यास देण्यात यावी. पुढील तजवीज व्हावयाची. दि. १० मे १९१४
सही : शाहू छत्रपती
शेतीबरोबर शिक्षणही तितकेच महत्त्वाचे
शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देऊनही शेतकामास व घरकामास प्राधान्य दिले पाहिजे, असेही महाराजांना वाटे. तसा त्यांनी संस्थानात हुकूमच काढला होता. रावबहाद्दर सरसुभे ई, करवीर शा. आ. ७०४/ ५ जून १९१९ प्राथमिक शिक्षणाबद्दल मे. रेसिटेंडसाहेब बहादूर ई, कोल्हापूर यांचे भेटीत त्यांनी चौकशी केली असता त्यात त्यांनी शेतकरी लोकांचे मुलांस शिक्षण देणे, ते शेतकऱ्यांचे मुलास एक किंवा दोन तास द्यावे. बाकीचा वेळ सर्व त्यास शेतकाम किंवा घरकामास मोकळा ठेवावा. याप्रमाणे अभ्यासक्रमाची आखणी करून अंमलबजावणी केल्यास थोड्या खर्चात शिक्षणाचे काम होऊन शेतकरी लोकांची तक्रार राहणार नाही म्हणून वगैरे रावब. ए. इन्स्पेक्टर यांनी लिहिलेला रिपोर्ट सरजा, १४/२९ मे १९१९ चा केल्या खाली सदरी रिपोर्टात लिहिलेला अनुभव आम्हांसही मान्य आहे. सध्याचे शिक्षणाचे शेतकरी वर्गाचे व त्याबरोबर सरकारचेही नुकसान आहे. निकाल हुकुम - आपला अभिप्राय मंजूर केला आहे. दि २७ जुलै १९१९. सही - आर. व्ही. सबनीस
----------------------------
भाजीच्या देठालाही..
स्वत: शाहू महाराज किंवा दरबारातील अधिकारी संस्थानात दौºयावर गेल्यावर तेव्हा शेतकरी व इतर जनतेकडून जिनसा विकत घेतात, त्याचा पैसा संस्थानाकडून नंतर अदा केला जातो; परंतु तो मामलेदाराकडून फौजदाराकडे, फौजदार आपल्या शिपायाकडे, शिपाई गावगन्नांचे पाटलांकडे आणि पाटील ज्या इसमाकडून जिन्नस घेतले त्यास अदा करतात, असा काल्पनिक समज आहे; परंतु याबद्दलच महाराजांना शंका आल्यावर त्यांनी १४ एप्रिल १८९४ रोजी जनरल खाते आदेश काढला आहे. शककर्ते शिवाजी महाराज जसे रयतेच्या देठासही मन दाखवू नये, अशी आज्ञा करायचे तसाच दृष्टिकोन शाहू महाराज यांचाही होता. आदेशात म्हटले आह,े, ...गहू, ज्वारी, डाळ वगैरे धान्ये, पीठ, साखर, मसाला वगैरे सामग्री खुद्द हुजुरचे मुतपाकखान्याकडे यथाशक्य सर्व कोल्हापुराहून नेण्यात यावी. बकरी, कोंबडी, अंडी हा जिन्नसही मुकामाच्या ठिकाणानजीक जो बाजाराचा गाव असेल तेथे जावून मालकास रोख पैसा जेथल्या तिथे देवून घ्यावे. सामग्री जमा करण्याची कामगिरी पोलिस शिपायांस कधीही सांगू नये. स्वारीवर असताना गावांतील कुण्या इसमाकडून दूध विकत घेतल्यास त्या मालकास गावांत जो भाव असेल त्याप्रमाणे तेथल्या तेथे सर्व पैसा चुकवून द्यावा.
------------------------------------
‘आम्ही शेतकरी किंवा सैनिकच होवून राहावे ही स्थिती आम्हांला समाधानकारक नाही. म्हणून व्यापार-धंदे व इतर उच्चप्रतीचे व्यवसाय यात आम्हांस शिरण्याची जरुरी आहे. शेतकीच्या व्यवसायामध्ये जरी आमच्यातील बहुतेक लोक गुंतले आहेत, तथापि त्यातसुद्धा शिक्षणाची आम्हांला जरुरी आहे.शिक्षणाची जरुरी नाही अशी कोणतीही चळवळ नाही. हल्लीच्या काळी शेतकी इतकी पद्धतशीर झाली आहे की ज्याला त्यात यश मिळवायचे आहे, त्याला त्या विषयातील पुस्तके वाचता आली पाहिजेत व समजली पाहिजेत.’
----- शाहू छत्रपती
-------------------------------
पारंपरिक शेतीला फाटा..
शाहू महाराज यांच्या कार्याचे द्रष्टेपण त्यांच्या प्रत्येक पावलामध्ये दिसून येते. कोणतेही काम करताना त्यांनी कायम पुढील शेकडो वर्षांचा विचार केला. शेतीकडेही त्यांनी कधीच पारंपरिक दृष्टीने पाहिले नाही. माझा शेतकरी शहाणा झाला पाहिजे, त्याने नवनवीन पिके घेतली पाहिजेत असा त्यांचा अट्टहास होता. म्हणूनच त्यावेळी त्यांनी अनेक नवीन पिकांच्या लागवडीचे प्रयोग केले. त्यामध्ये त्यांनी स्वत: जातीने लक्ष घातले. त्यांनी रेशीम, वेलदोडे, कोकोआ, इंडियन रबर, ताग, अंबाडी, बेळगावी बटाटे, लाख, शिंगाडे, टॅपिओका, (शाबू), कंबोडियन कापूस अशा अनेक पिकांची लागवड व प्रक्रिया करण्याचे प्रयोग केले. पन्हाळ्याजवळ त्यांनी कॉफी व चहाची लागवड केली. या मळ्यातील चहा त्यावेळी पन्हाळा नंबर ४ या ब्रॅँडने विकला जात होता. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांसह अनेकांना शाहू महाराज हा चहा पाठवीत असत व त्यांना तो आवडत असे.
----------------------------------
शेतकºयांना पोलादी नांगर देणारा राजा
पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना पोलादाचा तुटवडा भासू लागला. त्यावेळी इंग्रजांनी हिंदुस्थानातील तोफा वितळून त्यांचा उपयोग शस्त्रास्त्रे करण्यासाठी करून घेतला. शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील तोफा इंग्रजांनी नेऊन त्याची शस्त्रास्त्रे तयार करू नयेत म्हणून त्या तोफा शेतकºयांसाठी पोलादी नांगर तयार करणाºया किर्लोस्कर कंपनीला दिल्या.
------------
शेतकी शाळा
शेतकºयांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण मिळावे म्हणून शाहू महाराजांनी शेतकी शाळा सुरू केल्या होत्या. शेतीतील आधुनिक शेतीचे तंत्र समजावे यासाठी शेती व पशुपक्ष्यांची भव्य प्रदर्शने महाराज भरवीत असत. असेच शेतीविषयी माहिती देणारे एक वस्तुसंग्रहालय असावे, अशी महाराजांची इच्छा होती. यातूनच ही शेतीच्या संग्रहालयाची पहिली इमारत शाहूउत्तरकाळात झाली. आज या इमारतीत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आहे. संस्थानात सुधारित शेती पद्धतीचा प्रसार करण्यासाठी १९१२ साली त्यांनी कोल्हापुरात ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ ही संस्था स्थापन केली.
शेतकी प्रदर्शन
शेतकरी वर्गास आधुनिक शेतीची गोडी लागावी म्हणून संस्थानात अंबाबाईचा रथोत्सव, जोतिबा यात्रा अशा ठिकाणी व गावोगावी जेव्हा जत्रा-यात्रा असतात तेव्हा तिथे त्यांनी शेतकी प्रदर्शने भरविली. अशा प्रदर्शनांतून शेतीची आधुनिक साधने, उत्कृष्ट उत्पादनाच्या धान्याचे नमुने, माहितीपत्रके, आदींची मांडणी केलेली असे. उत्तम पैदाशींच्या जनावरांचेही प्रदर्शन भरविले जाई.
--------------
गूळ व्यापारपेठ
नुसती चांगली शेती करण्यावरच शाहू महाराजांचा भर नव्हता; तर येथे त्याला बाजारपेठही उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. त्या काळी संस्थानात उत्पादित होणारा उत्कृष्ट प्रतीचा गूळ सह्याद्रीच्या पलीकडे घाट उतरून कोकणात राजापूरच्या बाजारपेठेत जाई व तेथून तो मुंबईला वगैरे पाठविला जाई. हा गूळ त्याकाळी ‘राजापुरी गूळ’ म्हणून प्रसिद्ध पावला होता. म्हणजे गूळ कोल्हापूरचा व नाव राजापुरचे. महाराजांनी ही परिस्थिती बदलण्याचे ठरविले. राज्यारोहणानंतरच्या दुसºयाच वर्षी रेल्वे स्टेशनजवळच्या जमिनीवर ‘शाहूपुरी’ ही नवी बाजारपेठ वसविण्याचे कार्य हाती घेण्यात आले. कोल्हापूर, कागल, निपाणी येथील व्यापाºयांना खास सवलती देऊन त्यांनी वखारी घालण्यास प्रोत्साहन दिले. अवघ्या पाच-सहा वर्षांत ही नवी बाजारपेठ जोमाने उभी राहिली. संस्थानामधील शेतीमालास संस्थानाची बाजारपेठ मिळाली.
---------
मधुमक्षिकापालन उद्योग
मधुमक्षिकापालन उद्योग हा असाच एक अभिनव प्रयोग होता. संस्थानातील पश्चिम भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगांवरील वनश्री बारमाही फुलाफळांनी नटलेली होती. यामुळे संस्थानात शेतीला जोडधंदा म्हणून मधुमक्षिकापालन उद्योग सुरू करता येईल, असा विचार महाराजांनी केला. या उद्योगाची माहिती घेण्यासाठी त्यांनी चिटणीस नावाच्या आपल्या अधिकाºयाला थेट कोलकात्यास डायरेक्टर आॅफ अॅग्रिकल्चरकडे पाठविले; परंतु तिथेच नव्हे तर देशात कुठेच यासंबंधीचे शास्त्रीय ज्ञान उपलब्ध झाले नाही; परंतु म्हणून शाहू महाराज गप्प बसले नाहीत. त्यांनी हा उद्योग जिद्दीने सुरू करून व पुढे तो चालवून दाखविला. कोलकात्यापर्यंत माणूस पाठवून त्याचे ज्ञान मिळविण्याची धडपड म्हणजे शाहू महाराज कोणत्याही कामाकडे किती चौकसपणे व अभ्यासपूर्ण दृष्टीने पाहत होते, याचीच साक्ष देतात.
-----------------
करवीर संस्थानचे क्षेत्रफळ : ३२१७.१ चौरस मैल
१९२१ च्या खानेसुमारीनुसार लोकसंख्या : ८ लाख ३३ हजार ७१६
वार्षिक उत्पन्न : सुमारे २० लाख
--------------------------------------
(संदर्भ : राजर्षि शाहू गौरव ग्रंथ : संपादक डॉ जयसिंगराव पवार, प्रकाशक महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी २) राजर्षि शाहू गौरव ग्रंथ सुधारित तिसरी आवृत्ती : संपादक डॉ रमेश जाधव प्रकाशक महाराष्ट्र शासन राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई व ३) राजर्षि शाहू छत्रपती : रयतेच्या साभार)