शाहू महाराजांची इच्छाशक्ती!
By वसंत भोसले | Updated: January 19, 2020 00:27 IST2020-01-19T00:26:18+5:302020-01-19T00:27:54+5:30
राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा हा केवळ इतिहास नाही, तर तो भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. आणखी अनेक वर्षे हा विचार घेऊन चालण्यासाठी बळ देणारी त्यांची स्मारके प्रेरणास्थळे ठरतील, अशी आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कालखंडाकडे पाहताना त्यांनी केलेल्या कार्याचे आजही महत्त्व लक्षात येते.

शाहू महाराजांची इच्छाशक्ती!
वसंत भोसले-
कोल्हापूर, सांगली, सातारा या प्रदेशाने महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठी कामगिरी केली आहे. छत्रपती शिवरायांपासून तो मोजत गेलो तर चार शतकांचा तो इतिहास आहे. राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकाच्या उभारणीच्या निमित्ताने याची पुन्हा एकदा उजळणी होते आहे. ही उजळणी करत असताना राजर्षी शाहूंच्या जयजयकाराबरोबर नव्या समाजासाठी त्यांची विचारकृतीही अनुसरायला हवी !
आपल्या मृत्यूनंतर आपली समाधी नर्सरी बागेत बांधली जावी’’ अशी इच्छा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या मृत्यूपत्रात व्यक्त केली होती. आणखी दोन वर्षांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या मृत्यूस शंभर वर्षे होतील. ६ मे २०२२ रोजी शंभरावी पुण्यतिथी असणार आहे. शाहू महाराज यांना केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांना दीर्घायुष्य लाभले असते, तर भारतीय स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले असते आणि त्या पंचवीस वर्षांत त्यांच्या कार्याची गवसणी आणखी मोठी झाली असती. ते घडले नाही. मात्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्वप्नाचे आणि इच्छेचे प्रतिबिंब करवीर संस्थानाच्या कार्यक्षेत्रात नेहमी उमटत राहो, अशी धडपड त्यांच्यानंतरच्या पिढ्यांनीही सुरू ठेवली आहे. त्यापैकीच त्यांच्या मृत्यूपत्रातील त्यांची इच्छापूर्ती करणारी नवी पिढीदेखील आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा हा केवळ इतिहास नाही, तर तो भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. आणखी अनेक वर्षे हा विचार घेऊन चालण्यासाठी बळ देणारी त्यांची स्मारके प्रेरणास्थळे ठरतील, अशी आहेत.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कालखंडाकडे पाहताना त्यांनी केलेल्या कार्याचे आजही महत्त्व लक्षात येते. दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांना ‘‘शिवाजी कोण होता?’’ असा प्रश्न पडला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठेपण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसाच प्रश्न राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मला नेहमी पडतो. ‘‘शाहू महाराज घडले कसे?’’ याचे कारण असे की, राजर्षी शाहू महाराज यांचा दृष्टिकोन हा जागतिक होता. तो प्रगल्भ होता, पुरोगामी होता. समाजातील समस्यांचे आकलन करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचा विचार त्यात होता. एखाद्या छोट्या प्रसंगातून समाजाची रित, परंपरा, त्यातील अंधश्रद्धा, अडचणी ते जाणून घेत आणि त्यावर केलेली उपाययोजना आज शंभर वर्षांनंतरही लागू पडते, असे विचारमंथन करणारे राजर्षी शाहू महाराज घडले कसे? हे संस्कार त्यांच्यावर कोणत्या प्रकारच्या शिक्षणातून झाले? याचे विश्लेषण केले तर माणूस राज्यकर्ता म्हणून तयार होताना तो कसा असावा, याचे विवेचन समोर येऊ शकते. आजचे राज्यकर्ते असा विचार करीत नाहीत, म्हणून समाजाच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी उपाययोजना होत नाहीत. यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर्श घ्यायचा असतो. त्यासाठी त्यांच्या प्रत्येक कार्याची प्रेरणा देणारी स्मारके उभी करायची असतात.
वास्तविक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कोल्हापुरात राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची गरज आहे. देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, आदी क्षेत्राला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. १९०२ चा आरक्षणाचा निर्णय, १९०७ चा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी, कुस्तीकलेच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न, भारतातील पहिले कुस्तीसाठीचे खासबाग मैदान, शेतीच्या पाण्याच्या सोयीसाठी धरणाची उभारणी, शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी सूतगिरणीची उभारणी, नवीन पीकरचना, चहा-कॉफीच्या मळ्यांचा प्रयोग, धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीविरुद्धचा संघर्ष, नव्या धर्मपीठाची स्थापना, व्यापार-उद्योगासाठी बाजारपेठांची उभारणी, असे असंख्य निर्णय सांगता येतील. जे राजर्षी शाहू महाराज यांनी अखंड भारताच्या इतिहासात प्रथमच केले. असे धोरण आणि निर्णय घेणारे राजे खूपच दुर्मीळ होते. त्यात राजर्षी शाहू महाराज यांचे सर्वोच्च स्थान होते. म्हणून हा राजा घडला कसा? त्यांच्यावर विविध प्रकारच्या जागतिक विचारसरणींचा प्रभाव कसा पडला? आदींचे विचारमंथन अधिक झाले पाहिजे. युरोपची प्रगती ज्या संघर्षातून झाली. त्यातील प्रगल्भ विचारांचा प्रभाव तर होताच पण भारतीय विचारसरणीची जुनी जळमटे फेकून देऊन नव्याचा स्वीकार करून नवा समाज उभा करायला हवा, अशी ती मांडणी होती.
एका अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारामागे एक जागतिक परिमाण होते. तसेच भारतीय परंपरेतील थोर संस्कृतीबरोबरच त्यातील अवगुणांचीही जाण होती. त्या अवगुणांवर त्यांनी प्रहार करायला मागे पुढे पाहिले नाही. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या या विचारांना विरोध असणाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचीही हत्या करण्याचा प्रयत्न झाला. एकदा तर त्यांच्या ताफ्यावर गावठी बॉम्बने हल्ला करण्यात आला होता.
जगाचाच इतिहास आहे की, परंपरावाद्यांना विरोध करून नवा समाजनिर्मितीचा विचार मांडणाऱ्यांना संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. नव्या मूल्यनिर्मितीचा आग्रह धरताना हा संघर्ष अपेक्षितही असतो. महात्मा जोतिबा फुले यांच्या असंख्य समाजसुधारणांच्या सूचना आणि उपाय आजच्या समाजातील सर्व प्रकारच्या विचारधारेने स्वीकारल्या आहेत. आजही त्यांना विरोध करणारे स्वत:च्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवत नाहीत. स्त्रियांच्या शिक्षणाचा आग्रह धरून पहिली शाळा काढताना जो संघर्ष महात्मा जोतिबा फुले यांना करावा लागला; त्याच्या उलटा प्रवास करूच शकत नाही. अन्यथा तो तालिबानी दहशतवाद्यांच्या आग्रहासारखा होऊ शकतो. छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते महात्मा गांधी यांच्यापर्यंत थोर पुरुषांनी समाजाच्या परिवर्तनाचा विचार मांडला आणि आपल्या कृतीतून अमलात आणला. आजचा भारत दिसतो आहे, त्याचे श्रेय या महामानवांच्या संघर्षात आहे. त्यांच्या विचारशक्तीत आहे. ती प्रेरणा कायमची राहावी, यासाठी स्मारकांची गरज असते. त्या-त्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी जो वेगळा आणि बंडखोर विचार मांडला गेला, त्याच धर्तीवर आताच्या समस्या सोडविण्यासाठी नवी पिढी विचारप्रवृत्त व्हावी, या अपेक्षेने इतिहास सांगण्याची गरज असते. छत्रपती शिवराय यांच्या नावाने आज जो महाराष्ट्रात गोंधळ चालू आहे. तो त्यांच्या कार्य, विचार आणि देदीप्यमान इतिहासाच्या आदर्श घेण्यावरून नाही.
केवळ शिवरायांच्या नावाचा उदोउदो करून मूळ विचारधारेकडे दुर्लक्ष करण्याची ही पद्धत आहे. शिवाजी महाराज यांच्या विचाराने आजही राज्यकारभार करता येतो. ती प्रेरणा आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची आजही अंमलबजावणी करण्याची गरज आहे. शेती-शेतकरी, पर्यावरण, स्त्रीसन्मान अशा असंख्य बाबीतून रयतेचे स्वराज्य ही संकल्पना विकसित होत जाते. यासाठी स्मारकांची संकल्पना राबविणे आवश्यक आहे.
स्मारक उभारणे म्हणजे पुतळे, इमारती किंवा समाध्या नाहीत. इतिहासाचे दाखले देणारे, त्यामागील विचारांची प्रस्तृती सांगणारे संदेश देणारी स्मारके आवश्यक असतात. अजिंठा-वेरुळ किंवा हंपी-बदामी यांचे संवर्धन कशासाठी करायचे असते? शेकडो वर्षांपूर्वीची संस्कृती, कला, समाजरचना, यांच्या प्रगतीसाठी मानवाने केलेल्या प्रयत्नांचा इतिहास सांगणे हा उद्देश त्यामागे असतो. यासाठीच शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास जतन करण्याची गरज असते. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराची उभारणी सातशेव्या शतकात झाली आहे. अशा प्रकारचे सुंदर मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. हे ज्ञान त्याकाळी मानवी जीवनात अवगत होते. याचा किती मोठा पुरावा आहे. तेराशे वर्षांपूर्वी अशा प्रकारचे मंदिर उभारण्याची कला हे मानवाच्या ज्ञानसाधनेतूनच झाले आहे. श्री अंबाबाई मंदिराच्या वरच्या भागात ध्यानसाधनेची जागा आहे. त्याची रचना म्हणजे स्थापत्यशास्त्राच्या अद्भूत ज्ञानाचा आविष्कारच आहे. हे ज्ञान त्याकाळी कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून मिळाले होते? अशी काही कॉलेजीस् नव्हतीच, मग त्या कलाकारांची परंपरा कोठून आली? हे ज्ञान त्यांना कोठून प्राप्त झाले? त्याचा विस्तार, विकास आणि संवर्धन कसे झाले? याचा शोध घ्यायला हवा. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांचे बंंगलोरमधील म्युझियम पाहताना हा विचार मनात येतो. त्यांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेक प्रयोग केले होते. राधानगरीच्या धरणावर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा त्यांचा प्रयोग याच परंपरेतला आहे.
आपल्या भागातील दुसरा एक मोठा संघर्ष सातारच्या प्रतिसरकारचा आहे. त्यामागील विचार हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांची परंपरा पुढे घेऊन जाणारा आहे. रयतेच्या मुलांनी स्वकीयांच्या दहशतवादाबरोबरच इंग्रजांच्या सत्तेविरुद्ध केलेला तो संघर्ष होता. तो काही पुस्तकांच्या रूपानेच शिल्लक आहे. सातारा ही शिवरायांच्या घराण्याची राजधानी आहे. शिवरायांपासून प्रेरणा घेऊन लढलेल्या रयतेच्या मुलांनी नवा इतिहास घडविला. त्याचे इतिहासरूपी संवर्धन
होण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हायला हवे होते, ते झाले नाहीत. ही मोठी खंत आहे. सातारला येणारा प्रत्येक माणूस हा इतिहास पाहून पुढे जाईल, अशा स्वरूपाचे प्रतिसरकारचे स्मारक उभारण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच या प्रतिसरकारच्या स्थापनेला पंच्च्याहत्तर वर्षे झाली. आणखीन चोवीस वर्षांनी शंभर वर्षे होतील. तेव्हा या प्रतिसरकारचा इतिहास सांगणारे कोणी असणारही नाहीत. या प्रतिसरकारचे प्रमुख क्रांतिसिंह नाना पाटील यांना पाहिलेली, ऐकलेली पिढीही आणखी पंचवीस वर्षानी असणार नाही. तेव्हा याचे जतन कोण करणार? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमीकाव्याच्या युद्ध शास्त्राचा वापर करून इंग्रजांविरुद्ध लढलेले ते एक प्रकारचे युद्धच होते. त्याचा इतिहास विविध अंगांनी अभ्यासता येऊ शकतो. त्याचा वैचारिक संघर्ष तपासता येतो आणि तो इतिहास आपणास प्रेरणादायी ठरू शकतो. आपल्या आजूबाजूच्या प्रेरणाशक्तींचे जतन करायचे नाही तर इतिहासाचे महत्त्व तरी कशाला सांगत बसायचे?
कोल्हापूर, सांगली, सातारा या प्रदेशाने महाराष्ट्राच्या इतिहासात फार मोठी कामगिरी केली आहे. छत्रपती शिवरायांपासून जरी तो मोजत गेलो तर चार शतकांचा तो इतिहास आहे. महात्मा जोतिबा फुलेंचा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविणारा इतिहास आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व, अब्दुल करिम खाँ, अब्दुल आबालाल रेहमान अशी असंख्य रत्ने तयार करणारा तो इतिहास आहे. राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारकाच्या उभारणीच्या निमित्ताने याची पुन्हा एकदा उजळणी होते आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाच्या मानाने कोल्हापुरात उभारलेले शाहू स्मारक खूपच छोटे आहे. आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सांगणारे नाही. शाहू मिलच्या जागेवर आतातरी भव्यदिव्य स्मारक उभारले जावे. ज्या ठिकाणी इतिहास मांडता येईल, सभागृह, कलादालन, ग्रंथालय, आदींच्या रूपाने नव्या अपेक्षांची सोय होईल. शाहू महाराज यांनी पॅलेस थिएटरच्या रूपाने उभारलेले सध्याचे केशवराव भोसले हे एकमेव नाट्यगृह आहे. शंभर वर्षांत आपण त्यात भर घातली नाही.
शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात कोल्हापूरच्या कुस्तीचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक कुस्ती केंद्र बांधायला हवे आहे. आजही संपूर्ण महाराष्ट्रातून एक हजार मुले कोल्हापुरात कुस्तीचे प्रशिक्षण घ्यायला येतात. राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्याचा अभ्यासही करण्यासारखा आहे. यासाठी शाहूंच्या जयजयकाराबरोबर नव्या समाजासाठी त्यांची विचारकृतीही हवी!