स्त्रिया आपली संधी हिरावून घेतात, असे पुरुषांना वाटू शकते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 07:42 AM2024-07-29T07:42:01+5:302024-07-29T07:44:23+5:30

सर्वपक्षीय महिला नेत्यांशी केलेल्या संवादाची मालिका : नेत्री ! या प्रकल्पात माजी खासदार सुनीता दुग्गल यांच्याशी केलेली बातचीत.

shaina n c interview of former bjp mp sunita duggal | स्त्रिया आपली संधी हिरावून घेतात, असे पुरुषांना वाटू शकते...

स्त्रिया आपली संधी हिरावून घेतात, असे पुरुषांना वाटू शकते...

शायना एन. सी., भाजप नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या

महसूल सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपण राजकारणात आलात. केवळ हरयाणातीलच नव्हे, तर देशातील महिलांसाठी आपण एक प्रेरक व्यक्तिमत्त्व आहात. हरयाणातील महिलांना आपण काय सांगाल? 

महिला, मुलींना काही सांगण्यासाठीच मला राजकारणात यावे लागले. माझ्याकडे पाहून, माझे उदाहरण समोर ठेवून त्या पुढे जाऊ शकतात. आपण चुकत नसू, तर कोणी तुमच्याकडे बोट दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. आपले चारित्र्य उत्तम असेल आणि आपल्याकडे आत्मविश्वास असेल, तर आपल्याला कोणी काही म्हणू शकत नाही. कुटुंबाचा पाठिंबा मात्र आवश्यक आहे. आपण जर एखादे चांगले काम हाती घेतले असेल, तर भोवतालची प्रत्येक गोष्ट आपल्या पाठीशी उभी राहते. महिलांना थोडा जास्त संघर्ष करावा लागतो. समाज पुरुषसत्ताक आहे. राजकारणातही पुरुषांचे वर्चस्व आहे. स्त्रिया आपली संधी हिरावून घेत आहेत, असे पुरुषांना वाटू शकते, पण त्यामुळे विचलित न होता आपण कामावर लक्ष केंद्रित करून पुढे गेले पाहिजे.

राजकारणात येणे हेच आपले लक्ष्य होते की, एखादा अनुभव या निर्णयाच्या मागे होता? 

महसुली सेवेत काम करत असताना, मी अनेक सामाजिक कार्यांशी जोडलेले होते. मग, ते रक्तदान शिबिर असो वा प्रौढशिक्षण कार्यक्रम. या कामातून मला प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि नंतर केंद्रामध्ये केलेले काम पाहून मी प्रभावित झाले आणि राजकारणाकडे वळले.

हरयाणाच्या संदर्भात प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झालेला आहे. राज्यात आणि केंद्रात तुमच्या पक्षाचे सरकार असताना, या विषयाच्या बाबतीत काय केले पाहिजे? 

पर्यावरणाच्या बाबतीत पुष्कळ काही करता येण्यासारखे आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. तसे पाहिले, तर प्रदूषणाच्या संदर्भात भारताची परिस्थिती पुष्कळ चांगली आहे. लोकांमध्ये या विषयावर जागृतीही दिसते. पंतप्रधानांनी कच्छमध्ये १८,००० मेगावाट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला. असे प्रकल्प वाढत गेले, शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचा वापर सुरू केला, तर त्यांना पुष्कळ फायदा होऊ शकतो. पर्यावरण रक्षणाचे काम सगळ्यांचेच आहे.

केंद्राच्या कोणत्या योजना हरयाणात महिलांसाठी राबवल्या जातात? 

हरयाणात महिला बचत गटांचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. पंतप्रधानांनी ‘अटल किसान मजदूर कँटीन’ योजना आणली. अनेक जिल्ह्यांत ती सुरू आहे. तालुका पातळीवर अशी कँटिन्स सुरू व्हावीत, असा आमचा प्रयत्न आहे. केवळ १० रुपयांत चार पोळ्या, भात, भाजी या कँटीनमध्ये उपलब्ध करून दिली जाते. अन्न शिजवण्यापासून वाढण्यापर्यंत महिला काम करतात. अशा विविध योजनांतून महिला आत्मनिर्भर होत आहेत. देश आत्मनिर्भर होण्यात महिलांचा मोठा वाटा असेल.

२०१४ साली विधानसभा निवडणूक हरल्यानंतर २०१९ साली आपण लोकसभेसाठी दिग्गज उमेदवाराविरुद्ध निवडून आलात. काय अनुभव होता?

२०१४ साली मी महसुली सेवेचा राजीनामा दिला, तेव्हाच सिरसा मतदारसंघातून मी लोकसभेला उभी राहणार होते, परंतु राजीनामा मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब झाल्याने माझी संधी हुकली. थोडक्यात माझे तिकीट आणि नोकरी दोन्ही गेले होते, परंतु मला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. पण, केवळ ४३५ मतांनी मी पराभूत झाले. पुढे सिरसातून लोकसभा निवडणूक लढताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माझ्याविरुद्ध उभे होते. मला असे वाटते कोणीही दिग्गज नसतं. लोक तुम्हाला दिग्गज करतात. लोक माझ्याबरोबर असल्यामुळे माझ्यावर कुठलेही दडपण नव्हते. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे होते. लोकांमध्ये उत्साह होता. मी निवडून आले.

 

Web Title: shaina n c interview of former bjp mp sunita duggal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.