उथळ राजकारण हा देशाला लागलेला रोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:51 AM2020-07-06T03:51:01+5:302020-07-06T03:51:12+5:30

खरे तर टीकाटिप्पणी आणि चर्चा हा लोकशाहीचा पंचप्राण आहे. मात्र ही चर्चा कोणत्या विषयांची, कोणत्या दर्जाची किंवा कोणत्या पातळीवर जाऊन केली जाते, यावरच त्या समाजातील किंवा देशातील लोकशाहीचे किंवा तिला येणाऱ्या यशापयशाचे गणित अवलंबून असते, हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही.

Shallow politics is a disease of the country! | उथळ राजकारण हा देशाला लागलेला रोग!

उथळ राजकारण हा देशाला लागलेला रोग!

Next

- डॉ. रविनंद होवाळ 
(प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान)

सुमारे सहा महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांसमवेत निवडणूक प्रचारात उतरलेल्या आणि वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून आमदारकी मिळविलेल्या एका भाजप सदस्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालेले आहे. खरे तर टीकाटिप्पणी आणि चर्चा हा लोकशाहीचा पंचप्राण आहे. ‘चर्चेतून चालणारे शासन म्हणजे लोकशाही’ असे लोकशाहीबाबत आपण मोठ्या अभिमानाने सांगतो! मात्र ही चर्चा कोणत्या विषयांची, कोणत्या दर्जाची किंवा कोणत्या पातळीवर जाऊन केली जाते, यावरच त्या समाजातील किंवा देशातील लोकशाहीचे किंवा तिला येणाऱ्या यशापयशाचे गणित अवलंबून असते, हे आपण लक्षात घेतलेले दिसत नाही.

शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना, असे मत संबंधित सदस्याने व्यक्तकेलेले आहे. त्यांचे हे मत कितपत खरे आणि कितपत खोटे, हे शोधण्याचा कोणताही फुलप्रूफ मार्ग आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र, कोणत्याही एका समाजात केवळ एखादीच व्यक्ती कोणत्याही संपूर्ण दोषाला जबाबदार ठरू शकत नाही. जर ती व्यक्ती दोषी असेल, तर तिच्या आजूबाजूची, तिचे समर्थन करणारी व तिचा विरोध करणारी अशी विविध प्रकारची माणसे, संस्था, संघटना असे अनेकजण अशा दोषात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असतात. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की दुर्दैवाने आपल्या भारतीय समाजाची एकंदर रचनाच अशा प्रकारची झालेली आहे, की कोणत्याही एका विचाराला, एका मार्गाला, एका व्यक्तीला किंवा एका संघटनेला आपल्या सर्वांचे समर्थन लाभू शकत नाही. अशा परिस्थितीत समाजकारण किंवा राजकारणात पडलेला कोणताही माणूस एकच एक भूमिका घेऊन सतत चालू शकत नाही. परिस्थितीप्रमाणे कधी इकडे, तर कधी तिकडे त्याला उडी मारावी लागते. अशा वेळी अनेकदा माणूस नव्हे, तर त्याच्या आजूबाजूला उत्पन्न झालेल्या परिस्थितीकडे खरा दोष जातो. त्यामुळे समाजकारण किंवा राजकारणातील कोणत्याही व्यक्तीबाबत जाहीर विधाने करताना आपण सर्वांनी काही किमान मर्यादा ही पाळलीच पाहिजे.

महाराष्ट्रातील काय किंवा देशभरातील काय, सध्याचे राजकारण हे मोठ्या प्रमाणात उथळपणाकडे झुकलेले आहे. एकेकाळी या देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, बॅ. चित्तरंजन दास, सुभाषचंद्र बोस, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे यांच्यासारख्या अत्यंत विद्वान आणि प्रगल्भ राजकारण्यांचे व समाजकारण्यांचे राजकारण आणि समाजकारण पाहिलेले आहे. यांच्यातील अनेकांच्या विचारांकडे आणि कार्याकडे पाहताना यांना राजकारणी म्हणावे की समाजकारणी, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत असे! आजही पडतो! हा काळ खरे तर फार जुना झालेला नाही. फार तर पाऊण किंवा एखाद्या शतकापूर्वीचा आहे.

केवळ पाचपन्नास किंवा शंभरेक वर्षांत एखाद्या देशातील राजकारणाची इतकी मोठी अधोगती होऊ शकते, यावर आपल्या देशाबाहेरील कोणाचा कदाचित विश्वासही बसणार नाही; पण हे सत्य आहे आणि याला आपण सर्वजण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार ठरलेलो आहोत! लोकशाही ही तशीही सामूहिक जबाबदारी स्वीकारणारी शासनपद्धती किंवा जीवनपद्धती असते, हे तर आपल्या सर्वांना मान्य आहेच! माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘शरद पवार हे आमचे विरोधक आहेत; शत्रू नाहीत!’ अशी जाहीर भूमिका या अनुषंगाने व्यक्तकेलेली आहे. ही भूमिका अत्यंत योग्य आणि निरोगी अशी आहे. एकेकाळी आपण सर्वजण एकमेकांशी मोठे वैर धरत असू! पारतंत्र्य, मागासलेपणा, कमकुवतपणा अशा अनेक अनिष्ट गोष्टी यातून आपल्या वाट्याला आल्या. अनिष्ट गोष्टींची ही अनिष्ट फळे भोगल्यानंतर आता आपण एक स्वतंत्र आणि सार्वभौम समाज किंवा देश म्हणून उदयास आलेलो आहोत! अशा परिस्थितीत आपण आता एकमेकांचे शत्रू राहिलेलो नसून, फार तर काही मुद्द्यांच्या अनुषंगाने एकमेकांचे ‘वैचारिक’ विरोधक उरलेलो आहोत.

देशातील सर्व लोक, सर्वच नेते, कार्यकर्ते, पक्ष, संस्था, संघटना आदींनी हे सत्य आता ओळखले पाहिजे व एकमेकांबाबत न्याय्य भूमिका घेतली पाहिजे! मात्र केवळ समोरच्याचे तोंड बंद करण्यासाठी, वेळ मारून नेण्यासाठी किंवा राजकारणातील एक ट्रिक म्हणून आपण अशा गोष्टी करता कामा नयेत! एकमेकांच्या चांगल्या कार्याला मनापासून दाद देण्यात, चुकलेल्या गोष्टींबाबत निर्भीड मतप्रदर्शन करण्यात, ते करताना मर्यादांचे भान ठेवण्यात आणि मुख्य म्हणजे महत्त्वाच्या प्रश्नांची अभ्यासपूर्वक सखोल चर्चा करण्यात व त्यातून सामंजस्याने मार्ग काढण्यातच आपले सर्वांचे शाश्वत हित सामावलेले आहे.

Web Title: Shallow politics is a disease of the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.