लाजिरवाणा प्रकार
By admin | Published: March 5, 2017 11:35 PM2017-03-05T23:35:04+5:302017-03-05T23:35:44+5:30
उत्तर प्रदेशमधील एक मंत्री आणि अमेठी मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा उमेदवार एवढीच काय ती त्याची ओळख.
गायत्री प्रजापती हे नाव देशभर माहीत होण्याचे कारण नाही. उत्तर प्रदेशमधील एक मंत्री आणि अमेठी मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा उमेदवार एवढीच काय ती त्याची ओळख. पण तो सध्या गाजतो आहे वेगळ्याच कारणासाठी. त्याच्यावर बलात्कार व विनयभंगाचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करायला उत्तर प्रदेश पोलिसांनी टाळाटाळ केली आणि त्यामुळे हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, तेव्हा तो अमेठी मतदारसंघात उघडपणे प्रचार करताना दिसत होता. मतदान करतानाची त्याची छायाचित्रेही झळकली. पण त्यानंतर तो बेपत्ताच झाला आणि आता तर तो देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी देशातील सर्व विमानतळांवर अलर्टच्या सूचना दिल्या आहेत. नेपाळची सीमा उत्तर प्रदेशला लागून आहे. तो रस्त्याने तिथे पळून जाईल, असा अंदाज असल्याने तेथील सर्व सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. महिलेवर बलात्कार व तिच्या मुलीचा विनयभंग असे गंभीर आरोप असले तरी त्याने सराईतपणे आरोपांचा इन्कार केला आहे. पण तो ज्याप्रकारे गायब झाला, ते पाहता आरोपात तथ्य असण्याची शक्यताच अधिक. अन्यथा अटक टाळण्यासाठी त्याने एवढी पळापळ केली नसती. ऐन निवडणुकांच्या काळात या गायत्री प्रजापतीमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव अडचणीत आले आहेत. त्याने पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मुळात त्याला उमेदवारी देण्याचे कारणच नव्हते. त्याची पक्षातून हकालपट्टीच करायला हवी होती, मंत्री म्हणून अधिकारांचा गैरवापर करून त्याने प्रचंड पैसा कमावला असून, त्याची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. तरीही यादव यांनी त्याला मंत्रिमंडळात ठेवले. पंधरा वर्षांपूर्वी दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती असलेल्या गायत्री प्रजापतीने आता करोडो रुपयांची मालमत्ता कमावली. एवढेच नव्हे, तर त्याने अनेक गुन्हेगार पदरी ठेवले आणि माफियाराज सुरू केले. सध्या भाजपाचे नेते निवडणूक प्रचारात सतत गायत्री प्रजापतीचे नाव घेत उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीचा उल्लेख करीत आहेत. त्याला अखिलेश यादव यांच्याकडून मिळणाऱ्या आश्रय मिळत असल्याचा आरोप करीत आहेत. पण अन्य बाबतीत भाजपाचे आरोप खोडून काढणाऱ्या वा भाजपावर कडाडून टीका करणाऱ्या अखिलेश यादवना या विषयावर गप्प राहावे लागत आहे. तीच अडचण समाजवादी पक्षाशी आघाडी करणाऱ्या काँग्रेसचीही झाली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात बाहुबली हा प्रकार काही नवा नाही. भाजपा, बसपा, काँग्रेस अशा सर्वच पक्षांत ही मंडळी आहेत. पण गायत्री प्रजापतींमुळे समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांची पुरती लाजच गेली आहे.