शेन वॉर्न! कथानक नसलेल्या जादुई गोष्टीतला रॉकस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:39 AM2022-03-07T07:39:12+5:302022-03-07T07:40:38+5:30

तो अजिबातच फिट दिसायचा नाही. जीभ बाहेर काढून बॉलिंग करायचा. पण मैदानावर उतरला की वाटे, हा माणूस भन्नाट काहीतरी करणार आणि तो करायचाही! 

Shane Warne! Rockstar in a non-fiction magical story | शेन वॉर्न! कथानक नसलेल्या जादुई गोष्टीतला रॉकस्टार

शेन वॉर्न! कथानक नसलेल्या जादुई गोष्टीतला रॉकस्टार

Next

- राजदीप सरदेसाई, ख्यातनाम पत्रकार
शेन वॉर्न. त्याचा खेळ पाहायला एक हजार किलोमीटर प्रवास करुन जायची माझी तयारी असायची. कुणाचीही असणारच, त्याचं कारण त्याची मैदानावरची जादू. ती जादू ब्रायन लाराकडे होती, विव्ह रिचर्ड्सकडे होती. वॉर्न उत्तम फिरकीपटू होताच. क्रिकेटपटू म्हणून अफलातून होता, पण त्यापलिकडे तो होता सुपरस्टार - परफॉर्मर - एण्टरटेनर. वॉर्नच्या हातात चेंडू गेला, की वाटायचं, आता काहीतरी खास पाहायला मिळणार.. एखादा कसलेला जादुगार जसा प्रेक्षकांना गुंगवून टाकतो,  ते कसब वॉर्नकडे होतं. एका क्रिकेटपटूची ओळख सांगताना, ‘सुपरस्टार-परफॉर्मर-एण्टरटेनर’ असे शब्द मी वापरतोय. कारण त्या शब्दांना ‘सॅटेलाईट टीव्ही’च्या थेट प्रक्षेपण काळात नवे अर्थ प्राप्त झाले. ज्याकाळात आपल्याकडे सामन्यांचे थेट प्रक्षेपण सुरु झाले, त्याकाळातच सचिन तेंडुलकरचा उदय झाला. त्याचा खेळ लोकांनी जगभर घरात बसून पाहिला. त्याच काळातला वॉर्न. पण तो वेगळा होता. विरेंद्र सेहवाग म्हणाला तसं त्यानं फिरकी गोलंदाजीला ‘कूल’ चेहरा दिला.

कसा होता वॉर्न? तो काही ॲथलेटिक फिट दिसायचा नाही. गोलमटोलच होता. जीभ बाहेर काढून बॉलिंग करायचा. बळी घेतला की, मैदानात आनंद साजरा करायचा, फलंदाजाला डिवचायचा. त्याचा चेहरा, त्याची देहबोली सगळं बोलायचं. खरंतर फिरकीपटू म्हणून अनिल कुंबळे, मुरलीधरन हेही महान खेळाडू आहेत. पण ते शांत. बळी मिळवला, आऊट केलं, आपलं काम झालं... वॉर्नचं तसं नव्हतं. तो मैदानावर असा वावरायचा जणू एखादी अद्भूत जादुई दुनिया त्याक्षणी साकारतो आहे. थेट प्रक्षेपण काळाचा प्रॉडक्ट होता वॉर्न. तो केवळ ऑस्ट्रेलिअन उरला नव्हता, ग्लोबल सुपरस्टार झाला होता.
एकेकाळी भारत - ऑस्ट्रेलिया सामनेही फार होत नसत. कॉमेण्ट्री रेडिओवर ऐकली जायची. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची आक्रमकता लोक ऐकून होते. वॉर्नच्या काळात ती टीव्हीच्या पडद्यावर दिसायला लागली. त्यात वॉर्न दिसायचा एखाद्या रॉकस्टारसारखा. दरम्यान, जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा दबदबा वाढला. क्रिकेट हा सांघिक खेळ. पण, याकाळात तो तेंडुलकर विरुध्द वॉर्न असा बॉक्सिंगसारखा लढला गेला.

वॉर्न होता फिरकीपटू. पण, त्याची आक्रमकता, त्याचा वावर आणि मनोवृत्ती ही वेगवान गोलंदाजांसारखी तेजतर्रार होती. तो मैदानाबाहेरही माइण्ड गेम खेळायचा. मुलाखतीत सांगायचा, मला आता एक नवा चेंडू कळला आहे... तो वेगळा आहे! ते ऐकणारे फलंदाज बुचकळ्यात पडत की, आता काय याचं नवीन? मैदानात चेंडू हातात आला की, तो करामत करायचा, मैदानाबाहेर त्याचं वेगवान गाड्यांचं वेड, त्याच्या अनेक मैत्रिणी, त्याचं पोकर खेळणं, त्यावरुन तो सतत बातम्यांत झळकायचा. ऑस्ट्रेलिअन रितीनं जगायचा, वर्क हार्ड, पार्टी हार्डर. ऑस्ट्रेलिअन माणसांनाही तो ‘आपल्यासारखा’ वाटे.

 क्रिकेट हा फक्त खेळ उरला नाही. ते ‘मनोरंजन’ झालं.  त्या मनोरंजक जगात वॉर्न खऱ्या अर्थानं एण्टरटेनर झाला. तो कथा लिहिल्यासारखा आपला खेळ करायचा. सांगून करायचा की, मी आता अमूक करणार, तमूक करणार. मेलबर्नला ७०० बळींचा टप्पा, घरच्या मैदानात त्यानं पूर्ण केला. हे सारं कथानक असल्यासारखं त्यानं घडवून आणलं. न लिहिलेल्या कथेची ही त्याची जादूभरी गोष्ट होती. भारतातही तो पहिल्या आयपीएलला आला, राजस्थान रॉयलला जिंकवून गेला. ‘जादू का कप्तान’ असल्यासारखी टीम त्यानं बांधली. 
ही जादू तो सतत करायचा. त्याच्या हातात बॉल असो नसो, हा माणूस भन्नाट काहीतरी करणार, भन्नाट जगणार, याची खात्रीच होती प्रेक्षकांची. - त्याची ती जादू कधीच सरणार नाही; ती अमर आहे!

Web Title: Shane Warne! Rockstar in a non-fiction magical story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.