शरद बनसोडे भाजपचेच खासदार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:23 AM2018-06-13T00:23:46+5:302018-06-13T00:23:46+5:30

सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता असताना मनपाच्या कामकाजावर जनता नाराज असल्याची टीका करणारे भाजपचेच खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आपल्याही मतदारसंघातील विकास कामाचे मूल्यमापन करावे. पालकमंत्री- सहकारमंत्री यांची गटबाजी चर्चेत असताना आता बनसोडे यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

 Sharad Bansode is BJP's MP? | शरद बनसोडे भाजपचेच खासदार का?

शरद बनसोडे भाजपचेच खासदार का?

googlenewsNext

- बाळासाहेब बोचरे
सोलापूरचे अ‍ॅड. शरद बनसोडे हे मराठी चित्रपटातील एक नायक म्हणून अवघ्या महाराष्टÑाला माहीत आहेत. शिवाय ते वकील आहेत आणि मनी मार्केटचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. मोदी लाटेत भाजपच्या तिकिटावर सोलापुरातून निवडून आले म्हणून नव्हे तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत केल्यामुळे नावारूपाला आलेले खासदार शरद बनसोडे यांनी भाजपच्याच कार्यशैलीवर तोंडसुख घेतल्याने भाजपला तोंड लपवायला आणि सारवासारव करण्याला जागा उरली नाही. लोकसभेची सोलापूरची जागा जिंकण्याबरोबरच भाजप-सेना युतीने सोलापूर महापालिकेतही सत्ता मिळवली. मात्र महापालिकेत दोन मंत्र्यांचे दोन गट कार्यरत असल्याने निवडणुका होऊन दीड वर्षे उलटले तरी जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होत नाही.
निधी न मिळाल्याने नगरसेवकांचा थयथयाट सुरू आहे. स्थायी समिती सभापतीची निवड न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. खासदार बनसोडे हे चार महिन्यांपूर्वी महापालिकेत एका कार्यक्रमास आले तेव्हा त्यांनी गट तट विसरून जनतेसाठी काम करण्याचा सल्ला दिला होता. आता तर त्यांनी मनपातील भाजपच्या कार्यपध्दतीवर जनता वैतागली आहे, अशी टीका केली. काँग्रेससारख्या विरोधी पक्षाने भाजपवर टीका केली तर ती राजकीय समजली जाईल पण बनसोडे हे भाजपचेच खासदार असल्याने आणि त्यांनी मनपातील कामाबद्दल नाराजी व्यक्त करणे म्हणजे आश्चर्यकारक आहे. वास्तविक बनसोडे बोलले त्यात चुकीचे काहीच नाही. मनपा आयुक्त ढाकणे हे सक्षम अधिकारी आहेतच. मात्र त्यांना काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा जो एकोपा लागतो तो सोलापुरात दिसत नाही.
विरोधी पक्षाचे सोडा पण सत्तारूढ पक्षातही एकोपा नाही. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी कुणाचा दोस्ताना नाही. सगळी डोकी नुसती मोजण्यासाठीच आहेत. जनतेने देशात सत्तांतर केले, राज्यात केले आणि मनपातही केले. जिल्हा परिषदेतही भाजपच्या पाठबळावर संजय शिंदे अध्यक्ष झाले. खासदार म्हणून बनसोडे यांनी सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न धसास लावावा, रेल्वे दुहेरीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, लोणंद -पंढरपूर लोहमार्ग या विषयाचा पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. सोलापूर-मुंबई रेल्वे कर्नाटकला दिली. पण बनसोडे यांनी मनपाच्या कामकाजावर उघडपणे पत्रकारांशी बोलून नाराजी व्यक्त केली.
आपल्या मतदारसंघातील जनतेने आपल्याला लक्षात ठेवावे असे कोणते काम बनसोडे यांनी केले आहे. शिवाय ते सार्वजनिक कार्यक्रमातही फारसे दिसत नाहीत. रेल्वे, विमान, महामार्ग खात्याच्या कार्यक्रमातही दिसत नाहीत. त्यांना मनपाच्या कामकाजाची आताच आठवण का यावी? आणि आयुक्त ढाकणे यांची बदली होईल अशी शंका तरी मनात का यावी? पालकमंत्री व सहकारमंत्री यांच्या गटबाजीत सोलापूर महापालिकेच्या कामकाजाला जनता वैतागली असल्याची टीका करणारे खासदार बनसोडे स्वत:च्या मतदार संघातील कामाचे मूल्यमापन कसे करणार ?

Web Title:  Sharad Bansode is BJP's MP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.