शिवसेनेचे 'मिशन इमोशन'; शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे 'संकटमोचक'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 09:13 AM2022-06-25T09:13:03+5:302022-06-25T09:26:20+5:30

शरद पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले, विधिमंडळ आणि कायद्याची लढाई माझ्यावर सोपवा आणि तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा! 

sharad pawar advice to uddhav thackeray in political crisis in maharashtra | शिवसेनेचे 'मिशन इमोशन'; शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे 'संकटमोचक'

शिवसेनेचे 'मिशन इमोशन'; शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे 'संकटमोचक'

Next

- संजय आवटे

शरद पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले, विधिमंडळ आणि कायद्याची लढाई माझ्यावर सोपवा आणि तुम्ही फक्त रस्त्यावर उतरा! 

शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठी फूट पडल्यानंतर हादरलेली शिवसेना आता सावरली आहे. मुख्य म्हणजे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही आता शिवसेनेसोबत निःसंदिग्धपणे उभे राहिले आहेत. बाकी तांत्रिक चौकटी आणि कायद्याचा अर्थ लावत, बंडखोरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असणार आहेच. मुख्य म्हणजे, यात जास्तीत जास्त वेळ जावा, यासाठीची व्यूहरचनाही आखली जात आहे. पण, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, शिवसेनेने आता 'इमोशन्स'वर काम करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर हा निर्णय झाला आहे. 

'इमोशन्स' हा शिवसेनेचा प्राणवायू आहे. शिवसेनेचे पूर्ण व्यक्तिमत्त्व उभे आहे, ते भावना आणि अस्मितेवर. त्यामुळे भावनिक आवाहन करणारी निवेदने उद्धव ठाकरे यांनी सातत्याने करायची आणि येत्या काही दिवसांत राज्यभर झंझावाती मेळावे घेण्याची योजना तयार केली जात आहे. निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन राज्यातील वातावरण 'इमोशनल' करायचे आणि सहानुभूती-संतापाची भावनिक लाट तयार करायची, असे ठरले आहे. या कालावधीत विधिमंडळातील लढाई लांबवली जाईल. जसजसा वेळ जाईल, तसतशी बंडखोर आमदारांची कोंडी होत जाईल. आणि, शिवसेनेत परतण्याखेरीज त्यांच्यासमोर अन्य मार्ग नसेल. ३७ पेक्षा एकही आमदार कमी असला, तरी शिंदेसेनेचे बंड फसेल, अशी ही रणनीती आहे. 

'विधिमंडळातील आणि कायद्याची लढाई माझ्यावर सोपवा. तुम्ही फक्त रस्त्यावर जा आणि भावनिक आवाहन करत राहा', असे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे समजते. त्यानुसार शिवसेनेचे 'मिशन इमोशन' आता सुरू होत आहे. 

Web Title: sharad pawar advice to uddhav thackeray in political crisis in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.